Wednesday, 26 July 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 26.07.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 26 July 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

इराकमध्ये मोसूल इथं अडकलेल्या पंजाबमधल्या नागरिकांचा शोध अद्याप सुरू असून, हे नागरिक मारले गेल्याचा किंवा तुरुंगात कैद असल्याचा, कोणताही पुरावा अद्याप मिळाला नसल्याचं, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं, या संदर्भात लोकसभेत निवेदन करताना, स्वराज यांनी इराक सरकारशी यासंदर्भात बोलणी सुरू असून, पुराव्यानिशी माहिती मिळताच ती जाहीर केली जाईल, असं स्पष्ट केलं.

दरम्यान लोकसभेत दुपारच्या सत्रात, काँग्रेसच्या सहा सदस्यांचं निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेस सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं.

****

तीस वर्ष जुन्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट अर्थात संरचनात्मक परीक्षण होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज विधानसभेत घाटकोपर इमारत दुर्घटनेसंदर्भात निवेदन करताना, मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचं धोरण व्यापक होणार असून, घर दुरुस्तीची परवानगी प्रक्रिया ऑनलाईन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

दरम्यान, घाटकोपर इमारत दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.



लातूर जिल्ह्यात निलंगा इथं तसंच अलिबाग इथं मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या  दुर्घटनेप्रकरणी स्वतंत्र चौकशी सुरू असून, चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. काँग्रेस गटनेते शरद रणपिसे यांनी यासंदर्भात विचारलेल्या तारांकित प्रश्नला ते उत्तर देत होते.

****

राज्यपालांनी दिलेल्या निर्देशानुसार मुंबई विद्यापीठाचे लांबलेले निकाल ३१ जुलै पर्यंत जाहीर होतील आणि एकाही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही, अशी ग्वाही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत दिली. काँग्रेस गटनेते शरद रणपिसे यांनी निकालाबाबत अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

****

प्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांचं आज मुंबई इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते. भव्यदिव्य गणेशमूर्ती साकारण्यात त्यांच्या हातखंडा होता. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या फाईन आर्ट्‌स आणि लोककला विभागाच्या संचालक मंडळावर ते कार्यरत होते.

****

धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास भोज याला लाचलूचपत प्रतिबंथक विभागानं आज एक हजार ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. एका तक्रारदाराला आरोपपत्राची छायाप्रत देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

उस्मानाबाद इथं आज कारगिल विजय दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनींनी या यात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. चीनी बनावटीच्या वस्तू वापरण्याऐवजी स्वदेशी बनावटीच्या वस्तू वापरण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं.

****

जलवायू विशेष परिवर्तन रेल्वे - सायन्स एक्सप्रेस आज धुळे रेल्वेस्थानकात दाखल झाली. हे प्रदर्शन पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली आहे. धुळ्याच्या महापौर कल्पना महाले अणि जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते आज सकाळी या विज्ञान प्रदर्शनाचं औपचारीक उद्घाटन करण्यात आलं. यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

****

शासनानं राज्यातल्या उघड्यावर शौचापासून मुक्त शहरांची यादी जाहीर केली असून, त्यात धुळे महापालिकेचा समावेश आहे. गेल्या आठवडयात केंद्रीय समितीनं धुळे शहरात स्वच्छता कामांची पाहणी केली होती. या समितीनं दिलेल्या अहवालानंतर शासनाकडून धुळे शहर उघड्यावर शौचापासून मुक्त म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

****

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे गेले तीन दिवस देशव्यापी आंदोलन करण्यात आलं. याचाच एक भाग म्हणून आज औरंगाबाद पुणे महामार्गावर लिंबे जळगाव इथं रास्ता रोको करण्यात आला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाचा अहवाल स्वीकारावा, शेती मालाला हमी द्यावी, आदी मागण्यांचं निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आलं. सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे रस्त्यावर दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना श्रीलंकेतल्या गॉल इथं सुरु आहे. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं शिखर धवन आणि चेतेश्वर पुजाराच्या शतकी खेळीच्या बळावर ८८ षटकांत ३ बाद ३९३ धावा केल्या. धवननं १९०, अभिनव मुकुंदनं १२ आणि कर्णधार विराट कोहलीनं तीन धावा केल्या. चेतेश्वर पुजारा १४१ आणि अजिंक्य रहाणे ३६ धावांवर खेळत आहे.

****

No comments: