Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 July 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना संसदेतर्फे आज निरोप; नवे राष्ट्रपती मंगळवार
पदभार स्वीकारणार
** माजी सहकार मंत्री शिवाजीराव पाटील यांचं निधन; उद्या अंत्यसंस्कार
** मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पाऊस;
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा २५ टक्क्यांवर
** आर्थिक उदारीकरण ग्रामीण भागात न पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या
होत असल्याचं शेतकरी प्रश्नांचे अभ्यासक अमर हबीब यांचं मत
आणि
** महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि इंग्लड यांच्यात अंतिम सामना
****
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ उद्या संपत असून, संसदेतर्फे त्यांना
आज निरोप देण्यात येणार आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती मोहम्मद हमीद अन्सारी,
पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह संसदेचे सर्व
सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद
मंगळवारी राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्याची राष्ट्रपती भवनात तयारी सुरू
आहे.
****
कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर नक्कीच ताण येईल, पण त्यामुळे विकास कामे
थांबणार नाहीत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते मुंबई इथं एका
खासगी वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. विकास कामांच्या अंमलबजावणीसाठी वेगळं
धोरण आखण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कर्जमाफीनंतर शेती क्षेत्रात गुंतवणुकीचा ओघ
थांबायला नको, हे सरकारपुढे एक आव्हान असल्याचं ते म्हणाले. खोरे आणि उपखोरे यांचा
एकात्मिक आराखडा तयार करून शेतीला शाश्वत सिंचन करण्याचा विचार मुख्यमंत्र्यांनी यावेळी
व्यक्त केला.
****
आयकर विभागानं हाँगकाँग आणि शांघाय बँकींग कॉर्पोरेशन - एच एस बी सी च्या खातेधारक
आणि इतर काही व्यक्तींच्या चौकशांमध्ये, १९ हजार कोटी रुपयांच्या काळ्या पैशाच्या व्यवहारांचा
शोध लावला असल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत सांगितलं. आंतरराष्ट्रीय
शोध पत्रकार संघानं याबाबतची माहिती उघड केल्यानंतर आयकर विभागानं यामध्ये चौकशी सुरू
केली होती. या तपासात सुमारे ७०० भारतीयांनी परकीय देशांमध्ये सुमारे ११ हजार कोटी,
तर एचएसबीसी बॅंकेतल्या ६२८ खातेधारकांनी आठ हजार ४३७ कोटी रुपये वळते केले असल्याचं
उघड झालं आहे.
****
कॅन्सरसारख्या आजारांवर पारंपारिक औषधांचा शोध घेणं आणि त्यांचा विकास करण्यासाठी
भारत हा अमेरिकेशी सहकार्य करार करत असल्याची माहिती आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद
नाईक यांनी दिली आहे. पहिल्यांदाच भारत या पारंपारिक औषधांचा विकास करण्यासाठी अमेरिकेबरोबर
यशस्वीरित्या काम करत असल्याचं ते म्हणाले.
****
राज्य शासनानं केलेल्या दारूबंदी कायद्याची अमंलबजावणी करण्यासाठी ग्रामरक्षक
दल स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, पहिला दल अहमदनगर जिल्ह्यात स्थापन करणार असल्याचं उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
यांनी सांगितलं. ते काल अहमदनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्र व्यसनमुक्त
करावा तसंच राज्यातली अवैध दारूविक्री बंद करावी यासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
यांनी राज्य शासनाला अशा ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्याची सूचना केली होती. ३० ऑगस्टपर्यंत
या दलाची स्थापना करण्यात येणार आहे.
****
माजी सहकार मंत्री शिवाजीराव पाटील यांचं काल पहाटे मुंबईत निधन झालं, ते ९२
वर्षांचे होते. पाटील यांनी सहकार मंत्री म्हणूनही काम केलं होतं. २०१३ मध्ये त्यांना
पद्मभूषण पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं होतं. १९६७, १९७२ आणि १९७८ अशा सलग तीन वेळा
त्यांनी विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या होत्या. पाटील हे दिवंगत अभिनेत्री स्मिता
पाटील यांचे वडील होत.
पाटील यांची लोकप्रतिनिधी म्हणून राज्य विधिमंडळातली आणि राज्यसभेतली राजकीय
कारकीर्द नेहमीच समाजाभिमुख राहीली असल्याचं सांगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
शरद पवार यांनी, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पाटील यांच्या निधनानं सहकार चळवळीचा एक ज्येष्ठ मार्गदर्शक गमावला आहे, अशा
शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
पाटील यांच्या पार्थिव देहावर उद्या धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथं अंत्यसंस्कार
करण्यात येणार आहेत.
****
मुंबईसह राज्याच्या अनेक भागात काल पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईत सकाळपासून
पाऊस सुरु असून, अनेक भागात पाणी साचलं आहे. तसंच वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. रायगड
जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातल्या आषाने धबधब्यावर दोन जण वाहून गेल्याची घटना काल
दुपारी घडली.कोल्हापूर इथंही पावसाचा जोर कायम होता, पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी
ओलांडली असून जिल्ह्यातले ८५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात ५० टक्के
पाणीसाठा झाला असून सर्वच नद्यांना पूर आला आहे.
नाशिक जिल्ह्यातही पाऊस सुरु असून, गंगापूर, दारणा, कडवा, नांदूर मधमेश्वर आणि
होळकर पूल धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
पावसाचा जोर कायम असल्यानं काल रात्रीपासून गंगापूर धरणातून ५ हजार ७०० प्रति सेकंद घनफूट असा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
या शिवाय दारणा धरणातून १३ हजार ९८०, कडवा
धरणातून ६ हजार आठशे चौतीस, नांदूर मधमेश्वर धरणातून ३० हजार नऊशे पंचेचाळीस प्रति
सेकंद घनफूट पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जायकवाडी
धरणात एकूण १८ हजार १०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, धरणात २५
टक्क्यापेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे.
औरंगाबाद शहर आणि परिसरात काल कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही
उपलब्ध आहे.
****
आर्थिक उदारीकरण ग्रामीण भागात न पोहोचल्यानं आलेला ताण हे शेतकरी आत्महत्यांचं
मूळ कारण असल्याचं शेतकरी प्रश्नांचे अभ्यासक अमर हबीब यांनी म्हटलं आहे. मराठवाडा
साहित्य परिषदेच्यावतीनं आयोजित न शे पोहनेरकर व्याख्यानमालेत ‘शेतकरी प्रश्नांचे आकलन’
या विषयावर ते काल बोलत होते. सावकारी कर्ज, व्यसनाधीनता, कौटुंबिक कलह आणि जागतिकीकरण
ही शेतकरी आत्महत्येची मूळ कारणं नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शेतकरी संप
ही कल्पना जरी चांगली असली, तरी जून महिना हा शेतकरी आंदोलनाचा नाही, मात्र कामगार
संघटना चालवणाऱ्यांच्या ते लक्षात आलं नाही, या शब्दांत त्यांनी नुकत्याच झालेल्या
शेतकरी आंदोलनावर टीका केली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड च्या रुपाने
शेतकरी प्रश्नाला सर्वप्रथम वैचारिक अधिष्ठान मिळवून दिलं, असं हबीब यांनी यावेळी नमूद
केलं.
****
स्वच्छ भारत मिशन या अभियानाअंतर्गत ग्रामीण भागातल्या नागरिकांनी आपलं गांव
निर्मल करण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी
केलं आहे. जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण बैठकीत औरंगाबाद इथं काल ते बोलत होते.
या योजनेसाठी निधीची कमतरता पडणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
गोरक्षकांकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ औरंगाबाद इथं मजलिस ए इत्तेहादुल
मुस्लिमिन -एम आय एम पक्षाच्या वतीनं काल शहरातल्या आझाद चौक ते भडकल गेट दरम्यान मूक
मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येनं
मुस्लिम आणि दलित महिला, युवक तसंच नागरीक सहभागी झाले होते. या मोर्चानंतर एम आय एमचे खासदार असदुद्दीन ओवेसी
यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले. सबका साथ सबका विकास पेक्षा सर्वांची सुरक्षा
महत्वाची असल्याचं ओवेसी यांनी यावेळी सांगितलं. झुंडशाही विरुद्ध कायदा करण्यात यावा
अशी मागणीही ओवेसी यांनी यावेळी केली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजाभवानी यात्रा अनुदान आणि घरकुल घोटाळा प्रकरणी
नगरपालिकेचा माजी गटनेता नारायण राजे गवळीला काल अटक करण्यात आली. दीड कोटी रुपयांच्या
या घोटाळा प्रकरणात गवळी यानं ८ लाख ६३ हजार रुपयांचा अपहार केलाचं पोलीस तपासात समोर
आलं आहे. दोषी आढळलेला आरोपी नारायण राजे गवळी
गेल्या ३ महिन्यांपासून फरार होता. गवळीला तुळजापूर न्यायालयानं येत्या २६ तारखेपर्यंत
न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घोटाळ्यातल्या आरोपींचं अटकसत्र सुरु असल्याची माहिती
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी काल दिली.
****
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि इंग्लड यांच्यात अंतिम सामना होणार
आहे. इंग्लड इथल्या लॉर्डस मैदानावर दुपारी तीन वाजता सामन्याला सुरूवात होणार असून
भारतानं दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. याआधी २००५ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया
यांच्यात अंतिन सामना झाला होता. त्यावेळेस भारताला उपविजेतेपद मिळाले होते.
****
कुटुंबातली स्त्री जर आरोग्य संपन्न असेल तर सर्व कुटुंबाचं आरोग्य चांगले राहील,
स्त्रियांनी शारिरीक आरोग्यासासोबत मानसिक स्वास्थाकडे लक्ष देऊन आनंदी जीवन जगावं असं प्रतिपादन डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केलं
आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात आरोग्य व्यवस्थापन या विषयावरील कार्यशाळेत मार्गदर्शन
करताना काल ते बोलत होते. प्रत्येक महिलेनं स्वत:च्या आरोग्याबाबत सजग राहणं आवश्यक
असून चाळीशीनंतर प्रत्येक वर्षी आरोग्य तपासण्या करुन घेणं आवश्यक आहे, या सर्व तपासण्या
शासकीय दवाखान्यांमधे नाममात्र दरात उपलब्ध असल्याचं औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय आणि रूग्णालय- घाटीच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांनी यावेळी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली इथं दोन वाहनांचा अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू
झाला तर चार जण जखमी झाले. यापैकी दोघे सिंगापूर
दौऱ्यावरुन हैदराबाद मार्गे नांदेडकडे येत होते. काल पहाटे ही घटना घडली.
****
बीड जिल्ह्यात काल झालेल्या वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार तर १८ जण जखमी झाले.
अहमदनगर जिल्ह्यातल्या अरण इथून हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमानिमित्त ज्योत आणण्यासाठी
गेलेल्या आष्टी तालुक्यातल्या दोन तरूणांचा ट्रकनं धडक दिल्यानं मृत्यू झाला तर एक
जण जखमी झाला, एका अन्य अपघातात केज इथं शाळेच्या बसमधून खाली उतरतांना त्याच बसखाली
चेंगरून एका बालकाचा मृत्यू झाला तर धारूर तालुक्यातल्या मोहखेड घाटात दोन मित्रांच्या दुचाकीची धडक होवून
झालेल्या अपघातात शिक्षक़ असणाऱ्या मित्राचा मृत्यू झाला. अंबेजोगाईहून होळकडे जाणाऱ्या
मजुरांच्या रिक्षाला समोरून येणाऱ्या दुधाच्या टँकरनं हुलकावणी दिल्यानं रिक्षा खड्ड्यात पडल्यानं १७ मजूर जखमी झाले.
****
No comments:
Post a Comment