Saturday, 22 July 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 22.07.2017 - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 July 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ जुलै २०१ दुपारी .००वा.

****

धुळ्याचे माजी खासदार शिवाजीराव पाटील यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते. पाटील हे महाराष्ट्र सरकारमध्येही मंत्री होते. २०१३ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं होतं. १९६७, १९७२ आणि १९७८ अशा सलग तीन निवडणूका त्यांनी जिंकल्या होत्या. पाटील हे दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचे वडील होत.

पाटील यांची लोकप्रतिनिधी म्हणून राज्य विधिमंडळातली आणि राज्यसभेतली राजकीय कारकीर्द नेहमीच समाजाभिमुख राहीली असल्याचं सांगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यातल्या सुंदरबानी सेक्टर इथं पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यावेळी झालेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला, तर एक जवान जखमी झाला. काल रात्रीच्या सुमारास ही चकमक झाली.

****

उपभोक्त्याचा डेटा वापरण्याचा सुरक्षिततेचा अधिकार, हा घटनेनं अबाधित केलेल्या जगण्याचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचाच अविभाज्य भाग असल्याचं, केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठासमोर, २०१६ च्या व्हॉट्सॲपच्या खासगी धोरणाबाबतच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारनं आपलं म्हणणं सादर केलं.

****

आयकर विभागानं एच एस बी सीच्या खातेधारक आणि इतर काही व्यक्तींच्या चौकशांमध्ये, १९ हजार कोटी रुपयांच्या काळ्या पैशाच्या व्यवहारांचा शोध लावला असल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत सांगितलं. आंतरराष्ट्रीय शोध पत्रकार संघानं याबाबतची माहिती उघड केल्यानंतर आयकर विभागानं यामध्ये चौकशी सुरू केली होती. या तपासात सुमारे ७०० भारतीयांनी परकीय देशांमध्ये सुमारे ११ हजार कोटी, तर एचएसबीसी बॅंकेतल्या ६२८ खातेधारकांनी आठ हजार ४३७ कोटी रुपये वळते केले असल्याचं उघड झालं आहे.

****

दरम्यान,  जेटली आज दिल्ली आर्थिक परिषद-२०१७ चं उद्घाटन करणार आहे. या एक दिवसीय परिषदेत सिंगापूरचे उपपंतप्रधान थरमन शनमुग रतनम हे उद्घाटनपर भाषण करणार आहेत. जागतिकीकरणानंतर भारताचं विकासाचं धोरण आणि आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण या विषयावर ते बोलणार आहेत.

****

इयत्ता पाचवी आणि आठवीमध्ये वार्षिक परिक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मे महिन्यात पुन्हा परिक्षा देण्याची संधी मिळणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली. यामुळे शाळेतून विद्यार्थी गळतीचं प्रमाण कमी होण्याची अपेक्षा आहे.

****

निवृत्त सनदी अधिकारी संजय कोठारी यांची नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सचिव पदी निवड झाली आहे. तर ज्येष्ठ पत्रकार अशोक मलिक यांची कोविंद यांच्या वार्ता सचिव पदी नियुक्ती झाली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं या नियुक्ती संदर्भातलं पत्रक जारी केलं.

****

राज्यात २०१६-१७ या वर्षात दोन हजार १९ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाची कामं पूर्ण झाली आहेत. तर २०१७-१८ साठी पाच हजार १५७ गावांची या कामासाठी निवड करण्यात आली आहे. जलयुक्त शिवारची कामं करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गावातल्या जलस्त्रोतांचं, तसंच गावस्तरीय पाणलोटांचे नकाशे तयार करुन ते सर्व ग्रामपंचायतींना देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

****

राज्यातल्या शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून शाश्वत वीज पुरवठा करण्याच्या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार असल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात पिंपळगाव इथं नव्यानं उभारण्यात आलेल्या वीज उपकेंद्राचं उद्घाटन करताना ते बोलत होते. या योजनेअंतर्गत राज्यातल्या ४० लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून दिवसा आठ तास शाश्वत वीज पुरवठा करण्यात येणार आहे.

****

मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीनं आयोजित न. शे. पोहनेरकर व्याख्यानमालेला आजपासून औरंगाबाद इथं सुरूवात होत आहे. या व्याख्यानमालेत आज पहिल्या दिवशी, शेतकरी चळवळीचे अभ्यासक अमर हबीब यांचं “शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे आकलन” या विषयावर व्याख्यान होणार आहे. मसापच्या नांदापूरकर सभागृहात आज सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होईल.

****

नाशिक जिल्ह्यात आजही काही भागात पावसाचा जोर कायम आहे. आज सकाळपासून दारणा धरणातून १३ हजार ९८० घनफूट प्रतिसेकंद वेगानं, गंगापूर धरणातून एक हजार ६६४ आणि भावली धरणातून एक हजार ६६३ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

****

No comments: