Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 July 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** राजकारणातल्या आपल्या जडणघडणीमध्ये संसदेचा सिंहाचा वाटा- राष्ट्रपती प्रणव
मुखर्जी
** राज्य विधीमंडळाच्या
पावसाळी अधिवेशनास
आजपासून प्रारंभ; शेतकरी
कर्जमाफी, समृध्दी महामार्ग, तूर खरेदीचा प्रश्न गाजण्याची शक्यता
** सरसकट कर्जमुक्ती देण्याच्या भूमिकेचा शेतकरी संघटनेचा पुनरूच्चार तर सरसकट कर्जमाफी हा सरकारी
तिजोरीवर दरोडा शेतकरी प्रश्नांचे अभ्यासक अमर हबीब यांचं मत
** आणि
** महिला विश्वचषक किक्रेट स्पर्धेत इंग्लंडकडून ९ धावांनी पराभव झाल्यामुळे
भारताला उपविजेतेपद
****
राजकारणातल्या आपल्या जडणघडणीमध्ये संसदेचा सिंहाचा वाटा
असल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितलं. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात काल
राष्ट्रपती मुखर्जी यांना संसदेच्यावतीनं निरोप देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
उपराष्ट्रपती मोहम्मद हामिद अंसारी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, पंतप्रधान नरेंद्र
मोदी तसंच मंत्रिमडळातले सदस्य आणि इतरही मान्यवर
यावेळी उपस्थित होते. संसदेतच आपल्या विचारांना पैलू पडल्याचं सांगत त्यांनी आपल्याला
संसदेतला पहिला दिवस आठवत असल्याचं नमूद केलं. या सभागृहाचा निरोप घेण्याचा हा क्षण
अविस्मरणिय असल्याचं ते म्हणाले. या सभागृहाशी आपली बांधिलकी याहीपुढे कायम राहिल,
असं सांगत त्यांनी आपल्या १९६९ पासूनच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. या सभागृहात आपण
अनेक घडामोडी पाहिल्या, विरोधी बाकांवरच्या खासदारांची भूमिकाही पाहिली आहे आणि सत्ताधारी
पक्षांचीही भूमिका पाहिली. संसदेतले गदारोळही पाहिले आणि एखाद्या घटनेवर किंवा विधेयकावर
होणारी एकवाक्यताही पाहिल्याचं ते म्हणाले. या कार्यक्रमात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा
महाजन यांनी प्रणव मुखर्जींना सगळ्या खासदारांच्या सह्या असलेलं एक पुस्तक भेट दिलं.
राष्ट्रपती मुखर्जी यांचा कार्यकाळ आज संपत असून उद्या नवे राष्ट्रपती रामनाथ कोविंद
हे उद्या शपथ घेणार आहेत.
****
राज्य विधीमंडळाचं पावसाळी
अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. शेतकरी कर्जमाफी, समृध्दी महामार्ग, तूर खरेदीचा प्रश्न,
झोपटपट्टी पुनर्वसन योजनेत उघडकीला आलेले घोटाळे, कायदा आणि सुव्यवस्था, आदी मुद्दे
या अधिवेशनात महत्वाचे ठरण्याची शक्यता आहे.
या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वार्ताहरांशी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी, शेतकरी
कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यासाठी, त्यांच्याकडून अर्ज भरून घेणार, त्यात त्यांच्या
खात्याबाबतची माहिती घेण्याबरोबरच आधार कार्डाला शेतकऱ्यांचं बँक खातं जोडून घेतलं
जाणार आहे, असल्याचं सांगितलं. खोट्या लाभार्थींना
आळा घालण्यासाठी ही उपाययोजना केली जाणार असल्याचं ते
म्हणाले.
दुसरीकडे विरोधकांनी पावसाळी
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर
काल बहिष्कार घातला. शेतकरी कर्जमाफी, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होणं, झोपडपट्टी
पुनर्वसन योजनेतला कथित घोटाळा, कायदा आणि सुव्यवस्था राखणं अशा अनेक समस्या सोडवण्यात
सरकारला अपयश आल्याचं सांगून, कर्जमाफी जाहीर झाली असली तरी शेतकऱ्यांना अजून या योजनेचा
फायदा मिळालेला नाही, तसंच आतापर्यंत केवळ २२ हजार शेतकऱ्यांनाच १० हजार रुपयांची उचल
मिळाली आहे, असं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.
तसंच कर्जमाफीची योजना फसवी असल्याचा आरोप त्यांनी केला.
विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर
विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेला अबू आझमी, संजय दत्त,
शरद रणपिसे, कपिल पाटील हे आमदार उपस्थित होते.
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी,
कर्जमाफीची
अंमलबजावणी अजून झाली नाही, मात्र, कर्जमाफीच्या जाहिरातींवरच सरकारनं लाखो रुपयांचा
खर्च केला असं सांगून, दुबार पेरणीचं संकट ओढवलेल्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना अनुदान
देण्याची मागणी केली.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतल्या
घोटाळ्याचे धागेदोरे गृहनिर्माण मंत्र्यांपर्यंत पोहोचले आहेत, त्याची चौकशी करावी,
अशी मागणीही मुंडे यांनी केली.
****
अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा- नीटसाठी आता प्रश्न पत्रिका सर्व भाषांमध्ये
सारखीच राहणार असल्याचं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
ते काल कोलकोता इथं वार्ताहरांशी बोलत होते. नीटसाठी स्थानिक भाषेतील प्रश्नपत्रिका
फक्त इंग्रजी प्रश्नपत्रिकेचे भाषांतर असेल अस त्यांनी नमूद केलं.
****
नाशिक जिल्ह्यात पावसाचा
जोर कायम असून, नांदूर मधमेश्वरमधून ६१ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं आहे.
यामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा ३०
टक्क्यापेक्षा अधिक झाला आहे. गोदावरी नदीच्या गंगापूर आणि इगतपुरी इथल्या दारणा
धरणामधून सातत्यानं विसर्ग सुरु आहे. काल दुपारी चार वाजता गंगापूर धरणातून १४ हजार
९४९ घनफूट प्रतिसेकंद, दारणा धरणातून १६ हजार ८७५, कडवा धरणातून आठ हजार ८८६ तर वालदेवी
धरणातून एक हजार घनफूट प्रतिसेकंद क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. याशिवाय सर्वाधिक
६१ हजार १३८ घनफूट प्रतिसेकंद इतकं पाणी निफाड तालुक्यातल्या नांदूर मधमेश्वर धरणातून
सोडण्यात येत असून परिसरातल्या चोपोडी, चापडगाव, सायखेडा, चांदुरे या गावांना सावधानतेचा
इशारा दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा,निळवंडे
आणि मुळा या तीन प्रमुख धरणांच्या पाणी साठ्यांमध्ये मोठी वाढ झाली असून भंडारदरा धरण
८२ टक्के, निळवंडे धरण ५० टक्के तर मुळा धरण देखील ५२ टक्क्यापेक्षा अधिक पाणी साठा
झाला आहे.
दरम्यान, जायकवाडी
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यानं गंगापूर, वैजापूर
आणि पैठण तालुक्यातल्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही
उपलब्ध आहे.
****
सरसकट कर्जमुक्ती देण्याच्या भूमिकेचा शेतकरी संघटनेचे नेते
रघुनाथ दादा पाटील यांनी काल पुनरूच्चार केला. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची काल
पुण्यात सभा झाली, या सभेत ते बोलत होते. सरसकट कर्जमाफी झाली नाही तर १५ ऑगस्टला राज्यात
पालकमंत्र्यांना झेंडावदन करु देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी बोलतांना दिला.
त्याचबरोबर ९ ऑगस्टच्या ‘मराठा मोर्चा’ला पाठिंबाही दर्शवला.
****
सरसकट कर्जमाफी देणे हा सरकारी
तिजोरीवर दरोडा ठरेल असं स्पष्ट मत, शेतकरी प्रश्नांचे अभ्यासक अमर हबीब यांनी व्यक्त
केलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं आयोजित न शे पोहनेरकर व्याख्यानमालेत
“शेतकरी प्रश्नांवर कर्जमाफी, इतर उपाय आणि शेतकरी विरोधी कायदे” या विषयावर ते काल
बोलत होते. थकबाकीदार शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्याची सुविधा निर्माण करावी अशी मागणीही
हबीब यांनी या व्याख्यानात बोलताना केली. कर्जमाफी योजनेतून सरकारी कर्मचाऱ्यांना वगळण्याचा
निर्णय स्वागतार्ह असल्याचं सांगत यापूर्वीच्या कर्जमाफी योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांना
वगळलं नव्हतं असंही ते यावेळी म्हणाले.
शेतीच्या पुनर्रचनेचा विचार
करणं आवश्यक असल्याचं नमूद करत, सीलिंग कायदा पक्षपात करणारा, कर्तृत्वाला मज्जाव करणारा,
घटना विरोधी कायदा असल्याची टीकाही हबीब यांनी यावेळी केली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या भूमीगत
गटार योजना आणि रस्त्यांच्या कामांना निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन खासदार चंद्रकांत
खैरे यांनी दिलं आहे. औरंगाबाद जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीच्या बैठकीत
ते काल बोलत होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरु असलेल्या हागणदारी मुक्त परिसर तसंच
पेयजल पाणीपुरवठा योजनेच्या कामांना लवकरच भेटी देऊन उत्तम कार्य करणाऱ्या नगरपरिषदा
आणि ग्रामपंचायतींचा सत्कार करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत इंग्लंडनं भारताचा ९ धावांनी
पराभव केला. या पराभवानं भारताचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न भंगलं. लंडन इथं लॉर्डस क्रिकेट
मैदानावर प्रथम फलंदाजी करत इंग्लंडनं सात बाद २२८ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय
संघ २१९ धावांवर सर्वबाद झाला. भारताच्या पूनम राऊत आणि हरमनप्रीत कौर या जोडीनं ९५
धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. परंतु इंग्लंडची गोलंदाज अन्या श्रबसोलनं केलेल्या
भेदक गोलंदाजीमुळं भारताचा डाव २१९ धावांवर संपुष्टात आला.
****
श्रावण महिन्याला आजपासून
सुरूवात होत असून आज पहिला श्रावणी सोमवार आहे.
यानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातल्या घृष्णेश्वर, बीड जिल्ह्यातल्या परळी इथल्या
वैद्यनाथ तसंच हिंगोली इथल्या औंढा नागनाथ इथल्या नागनाथ या ज्योर्तिलिंगाच्या दर्शनासाठी
भाविकांनी पहाटेपासूनचं गर्दी केली आहे.
****
तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी
गेलेल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या भाविकांच्या
जीपला आंध्र प्रदेशातल्या आचमपेठजवळ अपघात झाल्यानं तीन जण ठार तर नऊ जण जखमी
झाले. जीपमध्ये बारा भाविक होते. काल पहाटे चार वाजता जीप आचमपेठ गावाजवळून जात असतांना
ती एका पुलाच्या कठड्याला धडकल्यानं हा अपघात झाला.
अन्य एका अपघातात, रायगड
जिल्ह्यात माणगाव इथं टँकरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतांना झालेल्या अपघातात
औरंगाबाद इथले दोन तरूण जागीच झाले तर चार जण जखमी झाले. अलिबाग आणि महाबळेश्वर इथं
हे सर्वजण पर्यटनासाठी गेले होते.
****
No comments:
Post a Comment