Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 20 July 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
देशाचे
चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांची निवड झाली आहे. आज झालेल्या मतमोजणीत
कोविंद यांना ६५ पूर्णांक ३५ टक्के, तर मीरा कुमार यांना ३४ पूर्णांक ३५ टक्के मतं
मिळाली. कोविंद यांना मिळालेल्या मतांचं मूल्य सात लाख दोन हजार ४४ इतकं आहे, तर मीरा
कुमार यांना मिळालेल्या मतांचं मूल्य तीन लाख सदूसष्ठ हजार ३४० इतकं आहे. लोकसभेचे
महासचिव आणि निवडणूक अधिकारी अनूप मिश्रा यांनी मतमोजणीनंतर ही घोषणा केली.
राष्ट्रपतीपद
हे जबाबदारीची जाणीव करुन देणारं असून, इमानदारी आणि प्रामाणिकपणे हे पद सांभाळण्याचं
आश्वासन रामनाथ कोविंद यांनी दिलं आहे. निवडणूक जिंकल्यानंतर ते देशाला संबोधित करत
होते. सर्व आमदार, खासदारांचे तसंच देशातल्या जनतेचे त्यांनी यावेळी आभार मानले.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी तसंच कोविंद यांच्या प्रतिस्पर्धी मीरा कुमार यांनीही कोविंद यांचं अभिनंदन
केलं आहे.
राष्ट्रपती
प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ येत्या २४ जुलैला संपत असून, रामनाथ कोविंद हे २५ जुलैला
राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत.
****
चीनकडून
युद्धाची भाषा केली जात असली तरी, भारत आपलं संरक्षण करण्यास पूर्णपणे सज्ज असल्याचं
परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे. त्या आज राज्यसभेत चीनच्या
वन बेल्ट, वन रोड प्रकल्पासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होत्या.
भारत, चीन आणि भूतानच्या सीमा डोकमालमध्ये जिथे मिळतात त्या ट्राय जंक्शनवर चीनकडून
परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न झाल्यामुळे हा संघर्ष निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं.
भारतीय सैन्यानं डोकलाममधून माघार घ्यावी अशी चीनची मागणी आहे, पण त्याचवेळी चीननं
सुद्धा तिथून माघार घेतली पाहिजे असं स्वराज यावेळी म्हणाल्या.
****
शालेय
विद्यार्थ्यांचं दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी सरकार काही उपाययोजना करत असल्याचं केंद्रीय
मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. ते आज राज्यसभेत यासंदर्भातल्या
प्रश्नाचं उत्तर देताना बोलत होते. केंद्रीय विद्यालय संघटनेनं डिजिटल शिक्षणाचं प्रमाण
वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले असल्याचं ते म्हणाले.
****
कृषी
उत्पादनांना किमान आधारभूत किंमत देण्याची मागणी देशभरातले शेतकरी करत असून, ते सरकारनं
विचारात घ्यावं, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी केली आहे.
राज्यसभेत आज शून्य प्रहरात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. भाजप सरकारनं निवडणुकीपूर्वी
शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आता शेतकरी अडचणीत
असताना सरकार त्यांच्याकडे पुरेसं लक्ष देत नाही, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान,
राज्यसभेचे सभापती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी आज बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती
यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारला आहे. राज्यसभेत दलितांवरच्या अन्यायाबाबत
बोलू दिलं जात नसल्याचा आरोप ठेवत, मायावती यांनी मंगळवारी राजीनामा दिला होता.
****
वस्तुंच्या
मागणीत तेजी आल्यानं २०१७ मध्ये भारत सात पूर्णांक चार टक्के प्रस्तावित वृद्धीदराचं
उद्दीष्ट गाठेल, अशी अपेक्षा आशियाई विकास बँकेच्या पुरक अहवालात व्यक्त करण्यात आली
आहे. आगामी वर्षात वृद्धी दर सात पूर्णांक सहा टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचंही
या अहवालात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या ३० जुलैला आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य
शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर किंवा माय जी ओ व्ही ओपन फोरम
वर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
राज्यात
आज मुंबई, ठाणे, रायगड, धुळे जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. रायगड जिल्ह्यात कालपासून
मुसळधार पाऊस सुरु आहे. नद्यांना पूर येण्याची शक्यता असल्याचं प्रशासन सज्ज झालं आहे.
रायगड जिल्हा प्रशासनानं २४ तास कार्यरत असलेला नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. गेल्या
२४ तासात जिल्हयात ११० पूर्णांक ३३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नांदेड इथंही आज दुपारनंतर
मुसळधार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांन कळवलं आहे. येत्या दोन दिवसात राज्यात मुसळधार
पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
नाशिक
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे शिवाजी चुंभळे यांची, तर उपसभापतीपदी
संजय तुंगार यांची बिनविरोध निवड झाली आहे. या बाजार समितीवर सत्ता असलेले राष्ट्रवादी
काँग्रेसचे माजी खासदार देविदास पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव आणून ही निवडणूक घेण्यात
आली.
****
No comments:
Post a Comment