आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२४ जुलै २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
यांचा कार्यकाळ आज संपत असून, ते संध्याकाळी देशाला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपतींच्या
संदेशाचं प्रसारण दूरदर्शन तसंच आकाशवाणीवरुन संध्याकाळी सात वाजता करण्यात येणार आहे.
नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या पदाची शपथ घेणार आहेत.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था
- इस्रोचे माजी अध्यक्ष यू आर राव यांचं आज पहाटे
बंगळुरु इथं दीर्घ आजारानं निधन
झालं, ते ८५ वर्षांचे होते. यू आर राव यांचा या वर्षी पद्म विभूषण पुरस्कारानं सन्मानित
करण्यात आलं होतं. राव
यांच्या नेतृत्वाखाली 'आर्यभट्ट', 'भास्कर', 'अॅपल', 'रोहिणी', 'इन्सॅट' आदी श्रेणींचे जवळपास
वीस उपग्रह तयार झाले आहेत.
****
अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा- नीटसाठी आता प्रश्न पत्रिका सर्व भाषांमध्ये
सारखीच राहणार असल्याचं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
ते काल कोलकोता इथं वार्ताहरांशी बोलत होते.
****
महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं केलेल्या कामगिरीमुळे पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. चुरशीच्या या लढतीत भारतीय संघाला इंग्लंड
संघाकडून पराभव पत्करावा लागला, तरीही या संघानं उत्तम कामगिरी केली असल्याचं पंतप्रधान
म्हणाले. या महिला संघाचा संपूर्ण देशाला अभिमान असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं.
****
गडचिरोली इथं पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार
झाला. जिल्ह्यातल्या कापेवंचा जंगलात अद्यापही चकमक सुरु आहे.
****
राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. शेतकरी कर्जमाफी,
समृध्दी महामार्ग, तूर खरेदीचा प्रश्न, झोपटपट्टी पुनर्वसन योजनेत उघडकीला आलेले घोटाळे,
कायदा आणि सुव्यवस्था, आदी मुद्दे या अधिवेशनात महत्वाचे ठरण्याची शक्यता आहे.
****
श्रावण महिन्याला आजपासून सुरूवात होत असून आज पहिला श्रावणी सोमवार आहे. यानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातल्या घृष्णेश्वर, बीड
जिल्ह्यातल्या परळी इथल्या वैद्यनाथ तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ या ज्योर्तिलिंगाच्या
दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनचं गर्दी केली आहे.
****
No comments:
Post a Comment