आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
२१ जुलै २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
रामनाथ कोविंद यांची देशाचे १४वे राष्ट्रपती
म्हणून निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे. अमेरिकेच्या प्रवक्त्या
हेदर नॉवर्ट यांनी कोविंद यांचं अभिनंदन केलं आहे. कोविंद यांच्याबरोबर प्रादेशिक आणि
जागतिक समस्या सोडवण्यासंदर्भात अमेरिका काम करु इच्छित असल्याचं त्या म्हणाल्या. नेपाळचे
पंतप्रधान शेर बहादुर देऊबा यांनीही कोविंद यांचं अभिनंदन केलं आहे. नेपाळ आणि भारतादरम्यान
संबंध अधिक बळकट करण्यासाठी कोविंद यांच्या सहकार्याची त्यांनी अपेक्षा केली आहे.
****
भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या
वतीनं देशातल्या कृषी विद्यापीठातल्या ग्रंथालयाच्या आधुनिकीकरणासाठी १३२ कोटी रुपये
दिले जाणार असल्याचं नवी दिल्ली इथल्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या शिक्षण विभागाचे
सहायक महासंचालक डॉ एम बी चेट्टी यांनी सांगितलं. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी इथल्या
महात्मा फुले कृषी विद्यापीठात आयोजित ग्रंथालय माहितीशास्त्र आणि तंत्रज्ञान या विषयावरील
दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
****
लातूर महापालिकेची
काल झालेली पहिली सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून वादळी ठरली. काँग्रेसच्या नगरसेवकांनी
विविध मुद्यांवरून घोषणाबाजी सुरू करताच, महापौरांनी विषयपत्रिकेवरच्या १२ विषयांना
मंजुरी दिल्यानं, विरोधकांनी महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
****
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नागपूर-मुंबई समृध्दी
महामार्गासंदर्भात औरंगाबाद, जालना तसंच हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला.
महामार्गात बाधित होणाऱ्या शेत जमिनी, फळबागांची तसंच इतर मालमत्तांची त्यांनी प्रत्यक्ष
पाहणी केली.
****
नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्यानं, पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक
मंदावली आहे. सध्या धरणात नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून चोवीसशे घनफूट प्रतिसेकंद तर
नागमठाण धरणातून अठराशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. धरणाचा पाणी
साठा साडे तेवीस टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
****
No comments:
Post a Comment