Tuesday, 25 July 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 25.07.2017 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

२५ जुलै २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

देशाचे चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद आज शपथ घेणार आहेत. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात एका विशेष समारंभात सरन्यायाधिश जे. एस. खेहर त्यांना राष्ट्रपतिपदाची शपथ देतील. या शपथग्रहण समारंभाचं आता दहा वाजून पंचवीस मिनिटांपासून आकाशवाणीवरून थेट प्रसारण होणार आहे.

दरम्यान, मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काल आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या दिवशी काल राष्ट्राला संबोधित केलं. सहानुभूतीपूर्ण आणि जबाबदार समाजाची निर्मिती करण्यासाठी अहिंसेची ताकद पुनर्जागृत करायला हवी, अशी अपेक्षा मुखर्जी यांनी यावेळी व्यक्त केली.

****

निवडणुकीतले फायदे डोळ्यासमोर ठेवून घेतलेले आर्थिक धोरणाबाबतचे  सौम्य निर्णय हे देशासाठी लाभदायक नसतात आणि देशातल्या एकशे पंचवीस कोटी नागरिकांना ही बाब उत्तमरीत्या समजते, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. भाजप खासदारांच्या एका बैठकीत ते काल बोलत होते. विमुद्रीकरण, वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी आणि ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी  उचललेल्या पावलांमुळे लोकांचा केंद्रसरकारवरचा विश्वास वाढला असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं.

****

विद्यापीठांनी पदवी प्रमाणपत्रांवर पदवीधारकाचा फोटो आणि आधार क्रमांक देणं सुरू करावं, असं, विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हटलं आहे. विद्यार्थ्यानं  शिक्षण घेतलेल्या संस्थेचं नाव तसंच नियमित, अर्ध वेळ किंवा दूरस्थ, यापैकी कोणत्या पद्ध्तीनं अभ्यासक्रम पूर्ण केला, याचा उल्लेख पदवी प्रमाणपत्रावर करावा, असंही आयोगानं विद्यापीठांना सांगितलं आहे.

****

ाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्यानं, नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून होणाऱ्या पाणी विसर्गात कपात करण्यात आली आहे. सध्या या बंधाऱ्यातून २० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातलं भंडारदरा धरण भरत आलं असून, ओझर बंधाऱ्यातूनही प्रवरा नदीपात्रात सातशे बहात्तर घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पैठणच्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी आता छत्तीस पूर्णांक चोवीस दशांश टक्क्यांवर पोहोचली आहे.

*****




No comments: