Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 July 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांचा शपथविधी; जगभरात शांतता
निर्माण करण्यासाठी भारतानं नेतृत्व करण्याचं आवाहन
** विधीमंडळाच्या अधिवेशनात दुसऱ्या दिवशीही कर्जमाफीच्या
योजनेवर विरोधी पक्षांची टीका; मुंबई महापालिकेच्या
६० हजार कोटी रूपयांच्या ठेवी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी देण्याचं शिवसेनेला
आवाहन
** मुंबईच्या घाटकोपर पश्चिम
भागातली चार मजली इमारत कोसळून १२ जण ठार
आणि
** औरंगाबाद शहरातल्या सार्वजनिक जागांवर असलेली
धार्मिक स्थळं हटविण्याच्या मोहिमेला आजपासून सुरुवात
****
देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी काल
शपथ घेतली. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित शपथग्रहण समारंभात सरन्यायाधीश जे
एस खेहर यांनी त्यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. यावेळी राष्ट्रपतींना २१ तोफांची
सलामी देण्यात आली. उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी, लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा
महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी पंतप्रधान यांच्यासह
विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, विविध राजकीय पक्षांचे प्रमुख यावेळी
उपस्थित होते.
यावेळी केलेल्या भाषणात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आर्थिक
नेतृत्वासह नैतिकतेचा आदर्श प्रस्थापित करणारा भारत निर्माण करण्याचं आवाहन केलं. जगभरात
शांतता प्रस्थापित करण्यासह पर्यावरण संतुलन राखण्याच्या कार्यात भारतानं जगाचं नेतृत्व
करावं, असं ही राष्ट्रपती कोविंद आपल्या भाषणात म्हणाले.
****
संसद सदस्यांना राष्ट्रपतींच्या शपथग्रहण सोहळ्यात उपस्थित राहता यावं, यासाठी
लोकसभेचं कामकाज काल दुपारी तीन वाजेनंतर सुरू झालं, तर राज्यसभेचं कामकाजही दुपारी
दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं.
राज्यसभेत दुपारनंतरच्या सत्रात शेतकऱ्यांच्या समस्या आणि शेतकरी आत्महत्येच्या
घटनांमध्ये वाढ या विषयावर अल्पकालिक चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार
प्रफुल्ल पटेल, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी या चर्चेत सहभाग नोंदवत महाराष्ट्रातल्या
शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे लक्ष वेधलं.
****
लोकसभेचं कामकाज दुपारी तीन वाजता सुरू झाल्यानंतर काही वेळातच दिवसभरासाठी
तहकूब करण्यात आलं. काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासंदर्भात भाजप खासदारांनी
केलेल्या विधानावर आक्षेप घेत, काँग्रेस खासदारांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली,
त्यानंतर अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.
दरम्यान, काँग्रेसच्या सहा सदस्यांना लोकसभेतून निलंबित केल्याच्या निषेधार्थ
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी संसद भवन परिसरात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर धरणं
आंदोलन केलं. सरकारच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.
****
सायबर गुन्ह्यांसंदर्भात दोष सिद्धतेचं प्रमाण जाहीर करण्याच्या मागणीसाठी विरोधी
सदस्यांनी आज विधानसभेत गदारोळ केला. प्रश्नोत्तराच्या
तासात बाळासाहेब थोरात तसंच पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सायबर
सुरक्षा तसंच माहिती तंत्रज्ञान कक्षामार्फत २०१४ पासून मे २०१७ पर्यंत दाखल आठ
हजार एकशे आठ प्रकरणांपैकी तीन हजार सातशे छत्तीस प्रकरणांत गुन्हेगारांना अटक
करण्यात आल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली.
दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसे
यासंदर्भातल्या चर्चेत सहभागी झाले. सायबर गुन्ह्यामुळेच आपल्याला मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागल्याचं सांगत, याप्रकरणी
एकाला अटक झाली, त्याला जामीनही मिळाला, मात्र आपली प्रतिमा कायमस्वरूपी डागाळली गेल्याची
खंत खडसे यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांना
ऑनलाइन पीक विमा भरण्याची ३१ जुलैची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे
आमदार राजेश टोपे यांनी केली. या मागणीचा विचार केला जाईल असं, अन्न आणि नागरी पुरवठा
मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत सांगितलं.
राष्ट्रवादीचे
खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर दाखल गुन्हा तत्काळ रद्द करावा, अशी मागणी पाटण तालुक्याचे
आमदार शंभूराजे देसाई यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली. उदयनराजे यांना
खोट्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली असून, सरकारनं याची चौकशी करावी, अशी मागणी देसाई
यांनी केली.
****
दरम्यान,
खासदार उदयनराजे भोसले यांना खंडणीच्या गुन्ह्यात सातारा जिल्हा न्यायालयानं १४ दिवसांची
न्यायालयीन कोठडी सुनावत जामीनही मंजूर केला. उदयनराजे काल सकाळी स्वत:हून सातारा शहर
पोलीस ठाण्यात हजर झाले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात
आलं. न्यायालयानं त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत जामीन मंजूर केला.
याप्रकरणी पुढची सुनावणी दोन ऑगस्टला होणार आहे.
****
राज्य सरकारनं घोषित
केलेली कर्जमाफीची योजना फसवी असून या योजनेचे स्वरुप शेतकऱ्यांना न्याय देणारं नसल्याचा
आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. सत्ताधारी पक्षानं कर्जमाफीच्या
निर्णयावरून सरकारचं अभिनंदन करण्याकरिता सभागृहात मांडलेल्या प्रस्तावाला विरोध
करताना ते काल बोलत होते. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याच्या
सक्तीवर विरोधी पक्षनेत्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. ऑनलाइन अर्जाची अट तात्काळ
रद्द करण्याची मागणी विखेपाटील यांनी यावेळी केली. खरीपाच्या
पेरणीसाठी शेतकऱ्यांना १० हजार रूपयांची तातडीची उचल देण्याच्या
सरकारच्या घोषणेचा बोजवारा उडाला असून २०
जुलैपर्यंत राज्यात फक्त ३ हजार ८१२ शेतकऱ्यांना ही उचल मिळाली
असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार
अजित पवार यांनीही या प्रस्तावाला विरोध करत सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी बोलतांना त्यांनी शिवसेनेला
खरंच शेतकऱ्यांविषयी सहानुभूती असेल, तर मुंबई महापालिकेच्या ६० हजार कोटी रूपयांच्या
ठेवी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी द्याव्यात, असं आवाहन केलं.
****
हे
बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
मुंबईतल्या घाटकोपर पश्चिम भागातली दामोदर पार्कजवळची
साईदर्शन ही चारमजली इमारत काल कोसळल्यानं १२ जण ठार तर ११ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये
३ महिन्यांच्या मुलीसह सहा महिलांचा समावेश आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या
शितप रूग्णालयाच्या नुतनीकरणाचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. दरम्यान, दोषींवर
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या सार्वजनिक जागांवर
असलेली धार्मिक स्थळं हटविण्याच्या मोहिमेला आजपासून सुरुवात होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठानं या धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्यानंतर
ही कारवाई करण्यात येत असल्याचं महानगरपालिका आयुक्त डी.एम.मुगळीकर यांनी सांगितलं.
यासंदर्भात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. शहरातली ११०० स्थळं अवैध आणि बेकायदा असल्याचं
न्यायालयानं सांगितलं असून चार पथकांमार्फत ही कारवाई केली जाणार असल्याची माहिती मुगळीकर यांनी दिली.
****
राज्यातल्या
२४ जिल्ह्यांमध्ये येत्या एक ते तेरा ऑगस्ट या कालावधीत ‘अतिसार नियंत्रण पंधरवडा‘
राबवण्यात येणार असून या कालावधीत या जिल्ह्यांमधल्या सगळ्या शासकीय आणि निमशासकीय
शाळा तसंच अंगणवाड्यामध्ये हात स्वच्छ धुण्याचं प्रात्याक्षिक दाखवण्यात येणार आहे.
या दरम्यान ओआरएस अर्थात जलसंजीवनी आणि झिंक गोळ्यांचं वाटप करण्यात येणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सहाशे बावीस ग्रामपंचायतींच्या
वार्षिक अंदाजपत्रकांच्या तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या एकूण निधीच्या तीन
टक्के इतका निधी दिव्यांगांच्या सोयीसुविधांसाठी खर्च करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी ही माहिती दिली. ते काल उस्मानाबाद तालुक्यातल्या वाघोली इथं दिव्यांगासाठी
आयोजित विशेष ग्रामसभेत बोलत होते. यासाठी दर वर्षी पंचवीस जुलैला विशेष ग्रामसभेत दिव्यांगांची नोंदणी करून घेतली जाणार असल्याचं, रायते यांनी सांगितलं.
****
भारत-श्रीलंका संघांदरम्यानच्या क्रिकेट
कसोटी मालिकेतील पहिला सामना आज श्रीलंकेतल्या गॉल इथं होणार आहे. ही मालिका तीन सामन्यांची
असेल.
****
पैठणच्या
जायकवाडी धरणातल्या जीवंत पाणीसाठ्यात आज सकाळी ३८
पूर्णांक ८७ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे. धरणात पाणलोट क्षेत्रातून होणारी पाण्याची
आवक घटली असून सध्या केवळ सात हजार ३५० घनफूट प्रतिसेकंद एवढी आवक होत आहे. शेतीसाठी
धरणाच्या दोन्ही कालव्यातून ११०० घनफूट प्रतिसेकंद पाणी सोडण्यात आलं असल्याचं सिंचन
विभागाच्या नियंत्रण कक्षातून सांगण्यात आलं.
****
लातूर तालुका येत्या तीन महिन्यात निर्मल करु
असा निर्धार जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेश कुमार मेघमाळे
यांनी व्यक्त केला आहे. तालुक्यातल्या साई इथं स्वछ भारत अभियानाअंतर्गत आयोजित निर्मलग्राम
संदर्भातील कार्यशाळेत ते काल बोलत होते. जे
गाव निर्मल होईल त्या गावाला विशेष ५ लाख रुपयांचं
विशेष बक्षीस दिलं जाईल असं मेघमाळे यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment