Sunday, 30 July 2017

Text-AIR News Bulletin HLB, Aurangabad 30.07.2017 10.00


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

३० जुलै २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबई इथं राजभवनात ‘मन की बात - अ सोशल रिव्हॉल्यूशन ऑन रेडिओ’ या पुस्तकाचं प्रकाशन केलं. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यावेळी उपस्थित होते. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांशी संवाद साधतात. त्या कार्यक्रमाचे २३ भाग लिखित स्वरुपात यात समाविष्ट करण्यात आले आहेत. पंतप्रधानांचे विचार आणि दृष्टीकोन समाजवून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले.

****

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३४वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. कार्यक्रमाच्या हिंदी प्रसारणानंतर लगेच प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारण करण्यात येईल.

****

महाविद्यालयातल्या प्राध्यापकांना पदोन्नतीसाठी संशोधन बंधनकारक असण्याची अट शिथील करण्याबाबत विचार सुरु असल्याचं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. उच्च शिक्षणासंदर्भात नवी दिल्ली इथं आयोजित एका राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. या प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठी संशोधन कार्याऐवजी विद्यार्थ्यांसमवेत अधिकाधिक सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचा निकष लावला जाईल, असं ते म्हणाले. मात्र विद्यापीठात कार्यरत प्राध्यापकांना पदोन्नतीसाठी संशोधन अनिवार्य असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

****

प्रतिभूती आणि विनियामक मंडळ – सेबी लवकरच भांडवल बाजारासह अन्य संलग्न संस्थांमधील तंत्रज्ञान आणि तत्सम यंत्रणांचा सखोल आढावा घेणार आहे. सायबर हल्ल्यांचा सामना करणं आणि गोपनीय माहिती उघड होण्यापासून रोखणं यासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सायबर हल्ल्याबाबत येणाऱ्या धमक्यांवर सतत लक्ष ठेवण्याची सूचना सेबीनं केली आहे. कोणत्याही तांत्रिक समस्येबाबत तात्काळ माहिती देऊन ती सोडवणं आवश्यक असल्याचंही सेबीनं म्हटलं आहे.

****


No comments: