Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 July 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जुलै २०१७ दुपारी १.००वा.
****
कारगिल विजय दिवस आज साजरा होत आहे. २६ जुलै १९९९ला भारतीय सैन्यानं कारगिल
इथं
पाकिस्तानी घुसखोरांवर विजय मिळवला होता.
संरक्षण मंत्री अरुण जेटली आणि तिनही सैनादलांच्या प्रमुखांनी दिल्लीत इंडिया गेट इथं अमर जवान
ज्योतीवर पुष्पचक्र
अर्पण करुन हुतात्म्यांना
आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल युद्धातल्या हुतात्म्यांचं
स्मरण केलं आहे. कारगिल विजय दिवस आपल्याला
सैन्य शक्ती आणि सेनेच्या
बलिदानाची आठवण करुन देतो, असं पंतप्रधानांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात
म्हटलं आहे.
****
संसदेच्या दोन्ही सदनाचं कामकाज
आज वारंवार तहकूब झालं.
राज्यसभेत आज विरोधी पक्षांच्या
सदस्यांनी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत घोषणाबाजी केली. जेटली
यांचं संबंधित विधान वगळण्याची मागणी विरोधी पक्षांनी लावून धरल्यानं सदनाचं कामकाज
साडे बारावाजेपर्यंत तीन वेळा तहकूब करावं लागलं.
लोकसभेतही आज विरोधी पक्षाच्या
सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. या गदारोळातच अध्यक्ष
सुमित्रा महाजन यांनी प्रश्नकालाचं कामकाज सुरू ठेवलं.
शून्य काल सुरू होण्यापूर्वी
अध्यक्षांनी, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबाबत भाजप सदस्यानं केलेल्या कथित आक्षेपार्ह
विधानाबाबत खुलासा करत, संबंधित चर्चेची दृष्य तपासताना आक्षेपार्ह उल्लेख आढळला नसल्याचं
नमूद केलं. भारतीय जनता पक्षाने खासदार अनुराग ठाकूर यांना मोबाइल वापरासंदर्भात अध्यक्षांनी
कारवाईचा इशारा दिला. मात्र विरोधी सदस्यांचा गदारोळ सुरूच राहिल्यानं, अध्यक्षांनी
कामकाज काही काळासाठी तहकूब केलं.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी इराकमध्ये मोसूल इथल्या कारवाईबाबत निवेदन केलं.
****
राज्य विधानसभेचं कामकाजही
घाटकोपर इमारत दुर्घटनेच्या मुद्यावरून दोन वेळा तहकूब झालं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
आमदार अजित पवार यांनी प्रकरणी स्थगन प्रस्ताव देत, प्रश्नोत्तराचा तास रद्द करत चर्चेची
मागणी केली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घटना गंभीर असून, मुख्यमंत्र्यांनी
घटनास्थळी भेट देऊन, प्रत्यक्ष पाहणी केल्याचं सांगितलं. या घटनेबाबत सरकार विधानसभेत
निवेदन सादर करणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. मात्र विरोधीपक्षनेते राधाकृष्ण
विखे पाटील यांनी, यापूर्वीही अनेक वेळा प्रश्नात्तराचा तास रद्द करून संबंधित विषयावर
चर्चा केल्याचे दाखले देत, थेट चर्चा सुरू करण्याची मागणी केली.
अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी
विरोधकांचा स्थगन प्रस्ताव स्वीकारला, मात्र प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याची मागणी
फेटाळून लावत, या मुद्यावर दुपारी चार वाजता चर्चा घेणार असल्याचं सांगितलं. मात्र
विरोधकांचं समाधान न झाल्यानं, त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ वाढत गेल्यानं,
अध्यक्षांना कामकाज दोन वेळा तहकूब करावं लागलं
विधान परिषदेत कोकणातल्या
अनधिकृत मासेमारीचा मुद्दा आमदार राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला. पशूसंवर्धन आणि
मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी या अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण आणण्यासाठी
योग्य ती कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं.
****
दरम्यान, घाटकोपर इमारत दुर्घटनेतल्या मृतांची संख्या १७ झाली आहे. आतपर्यंत २८ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती निवारण कक्षानं
दिली आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या शितप रूग्णालयाच्या नुतनीकरणाचं काम सुरू
असताना ही दुर्घटना घडली.पोलिसांनी या रुग्णालयाच्या मालकाला अटक केली
असून, त्याच्यावर सदोष मनुष्यबळ वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांना
१५ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
****
भारतीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळ - सेन्सॉर बोर्ड आता धुम्रपान आणि मद्यपानाच्या
दृश्यांवर बंदी आणण्याच्या तयारीत आहे. लोकप्रिय अभिनेत्यांनी चित्रपटात मद्यपानाची
दृश्ये करू नयेत, अशी दृश्ये दाखवली जात असताना केवळ सूचना झळकावली
जाणं पुरेसं नसल्याचं बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी सांगितलं आहे. प्रेक्षक
लोकप्रिय अभिनेत्यांचे अनुकरण करत असतात, त्यामुळे त्यांनी समाजासमोर आदर्श उदाहरण
ठेवणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. ज्या चित्रपटात मद्यपानासंबंधीची दृश्ये आवश्यक
आहेत, अशा चित्रपटांना ‘ए’ प्रमाणपत्र दिलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
****
भारत
आणि श्रीलंकेदरम्यान तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना श्रीलंकेतल्या गॉल
इथं सुरु आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त
हाती आलं तेव्हा भारताच्या एक बाद १३६ धावा झाल्या
होत्या. शिखर धवन ८२, तर चेतेश्वर पुजारा ४० धावांवर खेळत आहे.
****
No comments:
Post a Comment