Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 July 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.
****
ठळक
बातम्या
** शेतकऱ्यांची
क्रयशक्ती वाढवण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय आवश्यक - खासदार शरद पवार
**
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी आज बँका सुरू राहणार
**
सोयाबीन हमी
भावानं खरेदी केलं जाणार- कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष
पाशा पटेल
आणि
**
श्रीलंकेविरूद्धचा पहिला
कसोटी क्रिकेट सामना भारतानं ३०४ धावांनी जिंकला
****
आता सविस्तर बातम्या
शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेणं आवश्यक असल्याचं
माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभुषण खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. पवार यांच्या
संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल काल औरंगाबाद इथं त्यांचा नागरी
सत्कार करण्यात आला, या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. केंद्रीय परिवहन मंत्री
नितीन गडकरी, माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते पवार यांना मानपत्र
आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणात पवार यांनी
विनायकराव पाटील यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे विधानसभा निवडणुकीची सर्वप्रथम उमेदवारी
मिळाल्याचा
कृतज्ञतापूर्ण उल्लेख केला.
****
भारत चीन आणि भूतान सीमेवर डोकलाम भागात निर्माण झालेला प्रश्न सोडवण्यासाठी
केंद्र सरकारनं ठोस निर्णय घेणं आवश्यक असल्याचं पवार यांनी यावेळी नमूद केलं. किल्लारी
भूकंप, विद्यापीठ नामविस्तार, यासह मराठवाड्यातल्या विविध आठवणींना पवार यांनी यावेळी
उजाळा दिला.
नितीन गडकरी यांनी यावेळी केलेल्या भाषणात, पवार यांनी आपल्या कामातून पदांची
प्रतिष्ठा वाढवली, प्रवाहाविरोधात जाऊन सक्षम नेतृत्व तयार करून ते टिकवलं, असं मत
व्यक्त केलं. विकासाचं लोकाभिमुख राजकारण केल्यामुळे पवार हे गरीब शेतकऱ्यांपासून श्रीमंत
उद्योजकापर्यंत लोकप्रिय नेते असल्याचं गडकरी म्हणाले. शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासह
महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, काँग्रेस
प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील
तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार चंद्रकांत खैरे यांची समयोचित
भाषणं
यावेळी झाली. देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या
या कार्यक्रमापूर्वी या परिसरात उभारण्यात आलेल्या शारदाबाई पवार मुलींच्या वसतीगृहाच्या
कोनशीलेचं अनावरण पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. या वसतीगृहात चारशे मुलींच्या निवासाच्या
सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या
आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा
हा ३४वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा
कार्यक्रम प्रसारित होईल.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी आज राज्यातल्या
ग्रामीण आणि निमशहरी भागातल्या बँका सुरू राहणार आहेत. याबरोबरच बँकांनी कर्जदार शेतकऱ्यांसाठी
ई-केवायसीची अट तात्पुरती बाजूला ठेवून ऑफलाईन अर्ज स्विकारण्यास सुरूवात केली आहे.
या योजनेत सहभागापासून कोणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्याचं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगामासाठी सहभागी होण्यासाठी उद्याची अंतिम मुदत असून आतापर्यंत सुमारे चार लाख शेतकऱ्यांनी पिक विमा
भरला आहे.
****
मराठवाडा आणि खान्देशला जोडणाऱ्या औरंगाबाद - सिल्लोड - अजिंठा - जळगाव या
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं एका वर्षात पूर्ण केलं जाईल, अस केंद्रीय रस्ते
वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं.
औरंगाबाद -सिल्लोड-जळगाव राष्ट्रीय महामार्ग या सिमेंट रस्त्याच्या कामाच्या
कोनशीलेचं
अनावरण गडकरी यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते.
जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातल्या वाटूर फाटा इथं शेगाव ते पंढरपूर या राष्ट्रीय
महामार्गाच्या कामाचा शुभारंभही गडकरी यांच्या हस्ते काल करण्यात आला. हा पालखी मार्ग
२ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत आहे, मराठवाड्यातल्या रस्ते विकासासाठी
६५ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून
प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही
उपलब्ध आहे.
****
येत्या हंगामात सोयाबीन हमी
भावानं खरेदी केलं जाणार असल्याची माहिती कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी
दिली आहे. ते काल लातूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सोयाबीनचा भाव स्थिर राहावा
यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर आतापासूनच प्रयत्न सुरु असल्याचं ते म्हणाले. सोयाबिनला
चांगला भाव देण्यासाठी खाद्य तेलावर आयात शुल्क वाढवण्यात येणार आहे, आयात शुल्क आणि
ग्राहकांना मिळणारा दर याचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी
सांगितलं.
****
भारत- श्रीलंका यांच्यातील
श्रीलंकेतल्या गॉल इथं झालेला पहिला कसोटी क्रिकेट सामना भारतानं ३०४ धावांनी जिंकला.
काल सामन्याच्या चौथ्या दिवशी सुरुवातीला भारतानं आपला दुसरा डाव
२४० धावांवर घोषित केला, मात्र पहिल्या डावात केलेल्या ६०० धावांच्या बळावर भारतानं श्रीलंकेसमोर
सामना जिंकण्यासाठी ५५० धावांचं लक्ष्य ठेवलं. श्रीलंकेचा संघ २४५ धावात सर्वबाद झाला.
रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी तीन, तर मोहम्मद शमी आणि उमेश यादवनं
प्रत्येकी एक बळी घेतला. पहिल्या डावात १९० धावा करणारा शिखर धवन सामनावीर ठरला. यासोबतच
भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत एक शून्यनं आघाडी मिळवली असून दुसरा सामना तीन ऑगस्टपासून
श्रीलंकेतल्या कोलंबो इथं खेळला जाईल.
****
औरंगाबाद महानगरपालिकेचे नगरसेवक शेख जमीर अहमद कादरी यांचं विमुक्त जाती प्रवर्गातलं
छप्परबंद जातीचं प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं अवैध ठरवलं आहे. शहरातल्या आरेफ कॉलनी-
प्रगती कॉलनी या इतर मागावर्गीयांसाठी आरक्षित वॉर्डातून ते निवडून आले होते. त्यांचे
प्रतिस्पर्धी उमेदवार वाहेद अली यांनी त्यांच्या जात प्रमाणपत्राला आव्हान दिलं होतं.
उच्च न्यायालयानं कादरी यांच्या जात प्रमाणपत्राच्या तपासणीचे निर्देश जात पडताळणी
समितीला दिले होते.
****
औरंगाबाद शहरातल्या अनधिकृत धार्मिक स्थळ पाडण्याचं काम कालही सुरूच होतं. पुंडलिकनगर
भागातलं एक मंदिर आणि अन्य काही धार्मिक स्थळाचं अतिक्रमण काल हटवण्यात आलं.
दरम्यान, महापालिकेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत धार्मिक स्थळ हटवण्याच्या
उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची मागणी नगरसेवकांनी
केली, यावर ज्येष्ठ विधीज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घेण्याचे निर्देय महापौर भगवान घडामोडे
यांनी प्रशासनाला दिले.
****
लातूर इथल्या मध्यवर्ती अशा
गंजगोलाई परिसरात काल महापालिकेतर्फे
अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्यात आली. महापालिका
हद्दीतील अतिक्रमणांची मनपा आयुक्त-जिल्हाधिकारी, जी.श्रीकांत
यानी याआधीच पाहणी केली होती. तसंच या मोहिमेबाबत मागील
तीन दिवस या परिसरात भोंग्याव्दारे
सूचनाही देण्यात आली. त्यानुसार
अतिक्रमणातील जागा मोकळी करून देण्यास संबंधितांनी
सुरूवात केली होती. ज्यांनी अतिक्रमण काढलं नाही त्यांचं काल
अतिक्रमण काढण्यात आलं.
****
नांदेड
ते मुंबई विमानसेवा सुरु करण्याची मागणी खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. याबाबत
चव्हाण यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजु यांना निवेदन दिलं आहे. उडान
या केंद्र सरकारच्या योजने अंतर्गत गेल्या
एप्रिल महिन्यात नांदेड- हैद्राबाद विमानसेवा सुरु झाली, त्याचवेळी मुंबईसाठीही अशी सेवा
सुरु करण्याची घोषणा करण्यात आली होती. या सेवेचा लाभ नांदेड, हिंगोली, परभणी,
लातूर, वाशिम, यवतमाळ आणि निझामबाद जिल्ह्यातल्या नागरिकांना मिळू शकेल, असं या निवेदनात
म्हटलं आहे.
****
बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांना काल औरंगाबाद
शहरात प्रवेश करण्यास पोलिसांनी मनाई केल्यामुळे विमानतळावरूनचे दिल्लीला माघारी जावं
लागलं. वेरूळ - अजिंठा लेणी पाहण्यासाठी त्या काल औरंगाबादमध्ये आल्या होत्या. मजलिस
ए इत्तेहादुल मुस्लमीन - एम.आय.एम.च्या कार्यकर्त्यांनी विमानतळासह त्यांच्या प्रवेशाला
विरोध केला. विमानतळावर या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
****
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या खर्चाचा
हिशोब मुदतीत सादर न केलेल्या नांदेड
जिल्ह्यातल्या १४४ उमेदवारांना
पुढील पाच वर्षासाठी अपात्र ठरवण्यात
आलं आहे. नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काल ही
माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment