Sunday, 30 July 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.07.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 30 July 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

प्रत्येक क्षेत्रात मुली देशाचं नाव उज्वल करत असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ‘मन की बात’ या कार्यक्रमात ते आज बोलत होते. महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आपल्या संघाला विश्वचषक जिंकता आला नसला तरी, त्या अपयशाचं ओझं नागरिकांनी आपल्या खांद्यावर घेतलं, ही समाधानाची बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं. आता येणारा सणावारांचा काळ गरीब आणि कामकरी वर्गाच्या आर्थिक लाभासाठी कारणीभूत ठरावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नवभारताच्या निर्मितीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करत व्हिडिओ, ब्लॉग्ज, पोस्टस्‌सह नवनव्या संकल्पना तरुणांनी आणाव्यात असं आवाहन त्यांनी केलं. राष्ट्र निर्मितीसाठी आपल्याला कुठे पोहचायचं आहे आणि त्यात आपलं काय योगदान असू शकतं याचा विचार करावा असं पंतप्रधानांनी सांगितलं.

****

मालकाला संयुक्तिक आणि न्याय्य कारणासाठी अनेकदा भाडेकरुकडून आपल्या जागेचा ताबा हवा असतो. त्यावेळी अशा प्रकरणांना खटल्याच्या कोणत्याही टप्प्यावर न्यायालयांनी सुनावणीसाठी प्राधान्य दिलं पाहिजे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. या मुद्यावरुन मालक आणि भाडेकरुमध्ये होणाऱ्या वादाची प्रकरणं वेगानं निकाली काढली जावीत हा भाडेनियंत्रण कायद्याचा मूळ उद्देश असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. अशा खटल्यांचा निकाल लावण्याकडे न्यायालयं पुरेसं लक्ष देतील अशी आशा न्यायमूर्ती सप्रे आणि भानुमती यांच्या पीठानं व्यक्त केली.

****

आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना कुटुंबीय किंवा समाज घटकांकडून अनेकदा त्रास दिला जातो. त्यांना वाळीत टाकलं जातं, जात पंचायतीकडून अवैधरित्या शिक्षा केली जाते, प्रसंगी मारहाण अथवा हत्याही केली जाते. या पार्श्वभूमीवर अशा जोडप्यांना संरक्षण देण्यासाठी तसंच त्यांना विरोध करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी नवा कायदा येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात संसदेत एक विधेयक सादर करण्यात आलं आहे. वैयक्तिक स्वातंत्र्य आणि विवाहासाठी जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य सुरक्षित असणं हा मूलभूत अधिकारांचा भाग असल्याचं मत, हे विधेयक सादर करणारे वाय एस आर काँग्रेस पक्षाचे खासदार व्ही.विजयसाई रेड्डी यांनी म्हटलं आहे.

****

केंद्र सरकारनं सर्व खासगी दूरचित्रवाहिन्या आणि रेडिओ केंद्रांना सरकारचा लसीकरण कार्यक्रम - मिशन इंद्रधनुषचा प्रचार-प्रसार करण्यास सांगितलं आहे. सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून खासगी वाहिन्यांनीही लसीकरणाच्या मोहीमेत सहभाग नोंदवावा असं सरकारनं म्हटलं आहे. केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयानं यासंदर्भातलं पत्र सर्व खासगी दूरचित्रवाहिन्या आणि रेडिओ केंद्रांना लिहिलं आहे.

****

गुजरातमधल्या काही भागात आजही मुसळधार पाऊस सुरु असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. बनासकांठा जिल्ह्याला पूराचा सर्वात जास्त फटका बसला असून, मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आज याठिकाणी भेट दिली. पूरग्रस्त भागात २० लाखांपेक्षा अधिक अन्न पाकीटं वाटण्यात आली आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, लष्कर आणि नौदलाच्या मदतीनं बचावकार्य सुरु आहे.

राजस्थान मध्येही काही भागात पूर परिस्थिती कायम आहे. ओडीशा आणि आसाम मध्येही मुसळधार पाऊस सुरु असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे.

****

रेल्वेच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केलं आहे. शिर्डी रेल्वे स्थानकात विविध विकासकामांचा प्रारंभ आज प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. ‍साईनगर शिर्डी ते मुंबई साप्ताहिक रेल्वे सेवेचा आरंभही प्रभू यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. देशात रेल्वेच्या विकासाला गती देण्याबरोबरच महाराष्ट्रात रेल्वेच्या विकासासाठी एक लाख ३६ हजार कोटी रुपयांचे विविध प्रकल्प सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात रेल्वेचं जाळं वाढवण्यावर भर देणार असल्याचं प्रभू म्हणाले.

****

औरंगाबाद विभागात सुरु असलेल्या सरकारच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी आणि यासंबंधीच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांनी दिले आहेत. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात विविध विकासकामांची आणि योजानांची आढावा बैठक आज मलिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यावेळी उपस्थित होते. मराठवाड्यात सुरु असलेल्या विविध विकासकामांना गती द्यावी असं मलिक यांनी सांगितलं. यावेळी प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, स्वच्छ महाराष्ट्र अभियान यासारख्या योजनांचा आढावा मलिक यांनी घेतला.

****

No comments: