Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 31 July 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
प्राप्तीकर विवरणपत्र भरण्याची मुदत पाच ऑगस्टपर्यंत
वाढवण्यात आली आहे. ऑनलाईन विवरणपत्र दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती, मात्र मुदत
वाढवून देण्याच्या मागणीमुळे, आता आयकरदात्यांना ई फायलिंगद्वारे पाच ऑगस्टपर्यंत विवरणपत्र
भरता येणार आहे. आतापर्यंत दोन कोटींपेक्षा अधिक विवरणपत्र ऑनलाईन पद्धतीनं विभागाकडे
दाखल झाली आहेत.
****
भारतीय स्टेट बँकेनं बचत खात्यावरच्या व्याज दरात
अर्ध्या टक्क्यानं कपात केली आहे. बचत खात्यावर एक कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर आता
तीन पूर्णांक पाच टक्के दरानं व्याज मिळणार आहे. मात्र एक कोटी रुपयांपेक्षा जास्त
रकमेवर चार टक्के व्याजदर कायम असेल, त्यात काहीही बदल होणार नाही, असं बँकेकडून स्पष्ट
करण्यात आलं आहे.
****
तृतीयपंथी समुदायाला शिक्षण आणि रोजगारात आरक्षण
देण्याबाबत सरकार विचार करेल, असं आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास
आठवले यांनी दिलं आहे. ते आज हैदराबाद इथं बोलत होते. वंचित आणि मागास घटकांना न्याय
देण्यासाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले.
****
लोकसभेत आज जमावाकडून होणाऱ्या हिंसाचार तसंच हत्येच्या
घटनांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन
खरगे यांनी अशा वाढत्या घटनांकडे लक्ष वेधत, या घटना देशाच्या अखंडतेसाठी एकात्मतेसाठी
धोकादायक असल्याचं नमूद केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी
महाराष्ट्रात झालेल्या अशा घटनांविरोधात तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली. शिवसेनेचे
अरविंद सावंत यांनी सोशल मीडियावरून खातरजमा न करता पसरवल्या जाणाऱ्या माहितीमुळे असे
प्रकार होत असल्याकडे लक्ष वेधलं. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान, भाजपचे
हुक्मदेव यादव, तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय, बिजू जनता दलाचे तथागत सत्पथी, मार्क्सवादी
कम्युनिस्ट पक्षाचे मोहम्मद सलीम, यांच्यासह अनेक सदस्यांनी अशा घटनांचा निषेध करत,
ठोस कारवाईची मागणी केली.
****
पीक विमा योजनेकरता आज सायंकाळपर्यंत मुदतवाढ मिळण्याची
शक्यता असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज विधानसभेत बोलत
होते. मुदतवाढ न मिळाल्यास, तातडीने केंद्र सरकारकडे या संदर्भात पाठपुरावा करण्याचं
आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं. पीक विमा योजनेसाठी हप्ता भरण्याची ३१ जुलै ही शेवटची
तारीख असली तरी, तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटींमुळे अद्याप अनेक शेतकऱ्यांना या योजनेत
सहभागी होता आलं नसल्यानं, या योजनेचा हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ मिळवून द्यावी, अशी
मागणी विधानसभेत विरोधी पक्षांनी लावून धरली.
विधान सभेच्या कामकाजाला सुरुवात होताच राष्ट्रवादी
काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला. शेतकऱ्यांना
जर विमा हप्ता भरता आला नाही, तर सरकारनं त्यांना विम्याची रक्कम द्यावी अशी मागणी
पवार यांनी केली. विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भातल्या तांत्रिक
अडचणींकडे लक्ष वेधलं.
शिवसेना आमदार जयप्रकाश मुंदडा यांनी या या योजनेची
मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्याची मागणी केली, तर राष्ट्रवादीचे सदस्य दिलीप वळसे पाटील
यांनी याप्रकरणी सरकारनं आज संध्याकाळ पर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली.
या मुद्यावर शेकापचे गणपतराव देशमुख, सुभाष साबणे आदी आमदारांनी आपली भूमिका मांडली.
कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी यासंदर्भात केंद्राला
प्रस्ताव पाठवण्यात आला असून, त्यावर आजच निकाल अपेक्षित असल्याचं सांगितलं. या योजनेतले
काही निकष बदलण्याची मागणी केंद्र सरकारला केली जाईल, तसंच शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून
देण्याची जबाबदारी राज्य सरकार घेईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यातल्या एका शेतकऱ्याचा
पीकविमा हप्ता भरण्यासाठी रांगेत उभं असताना मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून
तत्काळ पाच लाख रुपयांची मदत केली जाईल, अशी घोषणा फुंडकर यांनी केली.
****
विधान परिषदेतही पीक विमा योजनेच्या मुदतवाढीवरुन
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. मागच्या वर्षीच्या तुलनेत
मराठवाडा, विदर्भात कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज आहे, त्यामुळे
अर्ज भरण्याची मुदत वाढवली नाही, तर सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही, असं ते म्हणाले.
या मुद्यावरुन सभागृहाचं कामकाज दोनदा तहकूब झालं.
पीक विमा योजनेची मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यास
केंद्र सरकारनं सकारात्मकता दर्शवली असल्याचं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सदनाला
सांगितलं.
****
औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात
येत्या आठ तारखेला रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. एका आघाडीच्या मोबाईल
कंपनीकडून हा मेळावा घेण्यात येत असून, माहिती तंत्रज्ञान तसंच संगणक शास्त्र या विषयात
पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं
आवाहन करण्यात आलं आहे. येत्या १० ऑगस्ट रोजीही जवळपास पंधरा कंपन्यांचे प्रतिनिधी
विद्यापीठात रोजगार मेळावा घेणार आहेत.
****
No comments:
Post a Comment