Tuesday, 25 July 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 25.07.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 July 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** देशाचे चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद आज शपथ घेणार

** लोकसभेत गदारोळ करणारे काँग्रेसचे सहा सदस्य आठवडाभरासाठी निलंबित

** राज्य विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष आक्रमक; कर्जमाफीसाठी पुरवणी मागण्यांमध्ये २० हजार कोटी रूपयांची तरतूद

** जालना इथल्या महिको कंपनीचे संस्थापक अध्यक्ष उद्योगपती पदमभूषण डॉक्टर बद्रीनारायण बारवाले यांच मुंबईत निधन

आणि

** औरंगाबाद शहरातल्या सार्वजनिक जागांवरचं धार्मिक स्थळाचं अतिक्रमण त्वरित काढण्याचे, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

**

****

देशाचे चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद आज शपथ घेतील. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात एका विशेष समारंभात सरन्यायाधिश जे. एस. खेहर त्यांना शपथ देतील. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून कोविंद यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली होती. विरोधी पक्षाच्या उमेदवार मीराकुमार यांना पराभूत करून त्यांनी या निवडणुकीत मोठ्या फरकानं विजय मिळवला होता.

****

सहानुभूतीपूर्ण आणि जबाबदार समाजाची निर्मिती करण्यासाठी अहिंसेची ताकद पुनर्जागृत करायला हवी, अशी अपेक्षा मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केली. आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या दिवशी काल त्यांनी राष्ट्राला संबोधित केलं, त्यावेळी ते बोलत होते. हिंसाचाराच्या मुळाशी अज्ञान, भय आणि अविश्वास असून आपण आपला सार्वजनिक संवाद हा सर्व प्रकारच्या, शारीरिक आणि मौखिक हिंसाचारापासून मुक्त करायला हवा असं ते म्हणाले. केवळ अहिंसक समाजच लोकशाहीच्या प्रक्रियेत सर्व घटकातल्या लोकांचा सहभाग सुनिश्चित करू शकतो, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रपती म्हणून आपल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत राज्यघटनेचं संवर्धन आणि संरक्षण करण्याचा आपण प्रयत्न केल्याचं ते म्हणाले.

****

लोकसभेत गदारोळ करत, कागद भिरकावल्या प्रकरणी काँग्रेसच्या सहा सदस्यांना आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आलं आहे. लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी गोरक्षेच्या नावाखाली होत असलेल्या हिंसाचारावर स्थगन प्रस्ताव देऊन चर्चेची मागणी करत, जोरदार घोषणाबाजी सुरू केली. अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ही मागणी फेटाळून लावत, गदारोळातच प्रश्नकालाचं कामकाज सुरू ठेवलं. संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी, गोरक्षणाच्या नावावर हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश पंतप्रधानांनी राज्य सरकारांना दिले असल्याचं सांगितलं. त्यानंतरही विरोधी पक्षाच्या खासदारांनी हौद्यात उतरून गदारोळ करत, लोकसभा कर्मचाऱ्यांच्या टेबलवरची कागदपत्रं अध्यक्षांच्या आसनाकडे भिरकावली. त्यामुळे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी या सदस्यांना पाच दिवसांसाठी निलंबित करत असल्याचं सांगितलं.

रम्यान, औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याकडे लक्ष वेधत, दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्याची वेळ आली असल्याचं सांगितलं. लोकसभेत शून्य प्रहरात हा मुद्दा मांडताना खैरे यांनी अमरनाथ यात्रेकरूंना पूर्ण संरक्षण पुरवण्याची मागणी केली.

लातूरचे खासदार डॉ सुनील गायकवाड यांनी शून्य प्रहरात अकरावी प्रवेशाचा मुद्दा उपस्थित करत, दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना अकरावी तसंच पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळावा, यासाठी सरकारनं योग्य पावलं उचलण्याची मागणी केली.

****

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनालाही विरोधकांच्या घोषणाबाजीत कालपासून सुरूवात झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर दोन्ही सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. विधानसभेत अजित पवार यांनीही कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करत याबाबत सरकारनं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. मात्र अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विषयपत्रिकेवर हा विषय नसल्याचं सांगत चर्चा नाकारली. त्यामुळे विरोधी पक्ष सदस्यांनी मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी करत सभात्याग केला. याच अधिवेशनात राज्य सरकारनं सादर केलेल्या ३३ हजार ५०० कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्यांमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी २० हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर विरोधक सभागृहात परतले.

विधान परिषदे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, सरसकट आणि कोणत्याही निकषाशिवाय कर्जमाफीच्या घोषणेची त्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली. कर्जमाफी जाहीर करुन एक महिना होऊनही अद्याप अंमलबजावणी झाली नसल्यानं शेतकऱ्यांचा सरकारवर विश्वास राहिला नसल्याची टीका त्यांनी केली.  राज्यातल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत आणि अधिवास प्रमाणपत्र सादर करण्यात घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. या घोटाळ्याची तातडीनं चौकशी करावी, तसंच सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागून अंतिम निकाल येईपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.

दरम्यान, कर्जमाफीसाठी अर्ज भरुन घ्यायची काय गरज आहे, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी ते वार्ताहरांशी बोलत होते. असे अर्ज भरून घेणं म्हणजे सरकारचा वेळकाढूपणा असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

****

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल विधानभवनातून  करण्यात आला. या योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या गातेगावातल्या शेतकऱ्यांनी या ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला.  या प्रक्रियेमुळे गरजू शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफी पोहचण्यास मदत होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

****

हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

ारतातली खाजगी क्षेत्रातली सर्वात मोठी पहिली संकरीत बियाणे उत्पादक कंपनी म्हणून ओळख असलेल्या जालना इथल्या महाराष्ट्र हायब्रीड सीडस् कंपनी- महिकोचे संस्थापक अध्यक्ष पदमभूषण डॉक्टर बद्रीनारायण बारवाले यांच काल मुंबईत निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्यावर रात्री चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कृषी बियाणे निर्मितीच्या माध्यमातून त्यांनी जालना शहराचं नाव जागतिक स्तरावर पोहोचवलं. हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यातही त्यांचा सहभाग होता. भारतीय शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची बियाणे उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारनं २००१ साली त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन गौरवलं होतं १९९८ मध्ये अमेरिकेच्या वर्ल्ड फूड फाउंडेशननं त्यांना ‘वर्ल्ड फूड प्राईज’ हा बहुमान प्रदान केला होता. उद्योग क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल गतवर्षी त्यांना मॅक्सेल फाऊंडेशनचा मॅक्सेल जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. याशिवाय त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते.

बारवाले यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांसह अनेक नामवंतांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. कृषी क्षेत्राची न भरून येणारी  हानी झाली असल्याच्या भावना सर्वांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.

****

औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतल्या सार्वजनिक जागांवरचं धार्मिक स्थळाचं अतिक्रमण त्वरित काढण्याचे, आणि केलेल्या कारवाईचा टप्पानिहाय अहवाल सादर करण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं काल महानगर पालिकेला दिले. खंडपीठाच्या आदेशा प्रमाणे कारवाई न केल्यास, न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्या प्रकरणी, महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असंही उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

औरंगाबाद खंडपीठ तसंच, सर्वोच्च न्यायालयानं धार्मिक स्थळांचं अतिक्रमण काढण्याचे  वारंवार आदेश देऊनही, महानगर पालिका अतिक्रमण काढत नसल्याबद्दल खंडपीठानं तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

****

परभणी जिल्ह्यातल्या पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अरूण कोल्हे यांच्याविरूद्धचा अविश्वास ठराव १३ विरूद्ध ३ मतांनी काल संमत झाला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत कोल्हे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांना काही दिवसांपुर्वी पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता.

****

औरंगाबादच्या चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज असोसिएशन- सी.एम.आय.ए. ला राज्य सरकारच्या महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी - मेडाचा ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी २०१५-१६ या वर्षासाठीचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला आहे. राज्याचे  ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते काल मुंबईत हा पुरस्कार सी.एम. आय.ए.चे तत्कालीन अध्यक्ष गुरप्रीत सिंग बग्गा यांना प्रदान करण्यात आला.

****

No comments: