Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 July 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** देशाचे चौदावे राष्ट्रपती
म्हणून रामनाथ कोविंद यांची निवड
** कृषिविषयक प्रश्नावरून लोकसभेत गदारोळ; कामकाज तहकूब
** भारत
आपलं संरक्षण करण्यास पूर्णपणे सज्ज - परराष्ट्र व्यवहार मंत्री
सुषमा स्वराज
आणि
** महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा ३६ धावांनी पराभव करत भारतीय
संघ अंतिम फेरीत दाखल
****
देशाचे चौदावे राष्ट्रपती
म्हणून रामनाथ कोविंद यांची निवड झाली आहे. लोकसभेचे महासचिव आणि निवडणूक अधिकारी अनूप
मिश्रा यांनी काल मतमोजणीनंतर ही घोषणा केली. कोविंद यांना ६५ पूर्णांक ३५ टक्के, तर
मीरा कुमार यांना ३४ पूर्णांक ३५ टक्के मतं मिळाली. कोविंद यांना मिळालेल्या मतांचं
मूल्य सात लाख दोन हजार ४४ इतकं आहे, तर मीरा कुमार यांना मिळालेल्या मतांचं मूल्य
तीन लाख सदुसष्ठ हजार ३४० इतकं आहे.
दरम्यान या निकालानंतर माध्यमांशी
बोलताना कोविंद यांनी राष्ट्रपती पद हे जबाबदारीची जाणीव करुन देणारं पद असून, इमानदारी
आणि प्रामाणिकपणे हे पद सांभाळण्याचं आश्वासन दिलं. सर्व आमदार, खासदारांचे तसंच देशातल्या
जनतेचे त्यांनी यावेळी आभार मानले.
या निवडणुकीतल्या कोविंद
यांच्या प्रतिस्पर्धी मीरा कुमार, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी,
तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोविंद यांचं अभिनंदन केलं आहे. कोविंद हे
२५ जुलैला राष्ट्रपती पदाची शपथ घेतील, विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ
येत्या २४ जुलैला संपत आहे.
****
लोकसभेत काल विरोधी पक्षांच्या
सदस्यांनी कृषिविषयक प्रश्न उपस्थित करत गदारोळ केल्यानं अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना
कामकाज दोन वेळा स्थगित करावं लागलं. या मुद्यावर पंतप्रधानांनी निवेदन देण्याची मागणी
काँग्रेसच्या सदस्यांनी लावून धरली. तर शेतकरी प्रश्नांवर विरोधी पक्ष राजकारण करत
असल्याचा आरोप संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार यांनी केला. विरोधकांचा गदारोळ आणि घोषणाबाजी
वाढत गेल्यानं लोकसभेचं कामकाज दिवस भरासाठी तहकूब झालं.
राज्यसभेतही शेतकऱ्यांच्या
विविध प्रश्नांवर काल चर्चा करण्यात आली. कृषी उत्पादनांना किमान आधारभूत किंमत देण्याची
मागणी सरकारनं विचारात घ्यावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी
केली. शून्य प्रहरात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. भाजपनं निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना
किमान आधारभूत किंमत देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आता शेतकरी अडचणीत असताना सरकार
या मागणीकडे लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
****
भारत आपलं संरक्षण करण्यास
पूर्णपणे सज्ज असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे. चीनच्या
वन बेल्ट, वन रोड प्रकल्पासंबंधी काल राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना
त्या बोलत होत्या. भारत, चीन आणि भूतानच्या सीमा एकत्र येतात, त्या डोकमाल भागात चीननं
परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा संघर्ष निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं.
भारतीय सैन्यानं डोकलाममधून माघार घ्यावी अशी चीनची मागणी आहे, पण त्याचवेळी चीननं
सुद्धा तिथून माघार घेतली पाहिजे असं स्वराज यावेळी म्हणाल्या.
****
राज्यसभेचे सभापती मोहम्मद
हमीद अन्सारी यांनी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा
राजीनामा स्वीकारला आहे. दलितांवरच्या अन्यायाबाबत राज्यसभेत बोलू दिलं जात नसल्याचा
आरोप ठेवत, मायावती यांनी मंगळवारी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या
३० जुलैला मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम
श्रृंखलेचा हा ३३वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात
आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर
किंवा माय जी ओ व्ही ओपन फोरम वर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नागपूर-मुंबई समृध्दी
महामार्गासंदर्भात औरंगाबाद, जालना तसंच हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला.
महामार्गात बाधित होणाऱ्या शेत जमिनी, फळबागांची तसंच इतर मालमत्तांची त्यांनी प्रत्यक्ष
पाहणी केली. राज्याचे पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री
अर्जुन खोतकर यावेळी उपस्थित होते. या महामार्गासाठी जमिनी संपादित करताना, शेतकऱ्यांप्रति
राज्यसरकारची भूमिका सकारात्मक असून, शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला दिला जाणार
असल्याचं, जालना जिल्ह्यात कडवंची इथं घेतलेल्या बैठकीत शिंदे यांनी नमूद केलं.
****
जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
सभागृहात समृध्दी महामार्गाबाबत आढावा बैठक घेतली. या महामार्गामुळे विदर्भ तसंच मराठवाडयाच्या
विकासाला चालना मिळणार असल्याचं लोणीकर म्हणाले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही
उपलब्ध आहे.
****
राज्यात काल मुंबई, ठाणे, रायगड, धुळे जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. कोल्हापूर
जिल्ह्यातल्या नृसिंहवाडी च्या दत्त मंदिरात कृष्णा नदीचा दक्षिणद्वार सोहळा साजरा
झाला.
औरंगाबाद, बीड जिल्ह्यात पावसानं तुरळक हजेरी लावली.
नांदेड इथंही काल दुपारनंतर मुसळधार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे. परभणी जिल्ह्यात पावसानं काल दमदार हजेरी लावली. गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात
सुरू असलेल्या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं आहे. मात्र नदी ओढ्यांना अद्याप
पाणी आलं नसल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसात राज्यात
मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्यानं, पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक
मंदावली आहे. सध्या धरणात नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून चोवीसशे घनफूट प्रतिसेकंद तर
नागमठाण धरणातून अठराशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. धरणाचा पाणी
साठा साडे तेवीस टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
दरम्यान खरीप पिकांना संरक्षण म्हणून धरणाच्या डाव्या कालव्यातून ३०० घनफूट
प्रतिसेकंद तर उजव्या कालव्यातून ५०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग काल
सायंकाळी सुरू होता.
****
नागरिकांच्या सुरक्षेसह गुन्हेगारीला
प्रतिबंध घालणारा पोलीस विभाग सदैव गतिमान राहणं आवश्यक असल्याचं विधानसभा अध्यक्ष
हरिभाऊ बागडे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या संकेतस्थळाचं तसंच मोबाईल
ॲपचं काल बागडे यांच्या हस्ते लोकार्पण झालं, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस विभागानं
बदलत्या काळासोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आवश्यक आहे, औरंगाबाद पोलीस यंत्रणेनं
तंत्रज्ञान अद्ययावत करून,कामामध्ये गतिमानता प्राप्त केली असल्याचं त्यांनी नमूद केलं.
नागरिकांनी शिस्त आणि कायद्याचं काटेकोर पालन केलं, तर निश्चितच आपलं शहर, समाज आणि
देश सुरक्षित होईल असंही बागडे म्हणाले.
****
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या
काल झालेल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ३६ धावांनी पराभव करत भारतीय संघ अंतिम
फेरीत दाखल झाला. पावसामुळे उशीरा सुरू झाल्यानं, हा सामना प्रत्येकी ४२ षटकांचा खेळवण्यात
आला. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत, हरमनप्रीत कौरच्या शतकी खेळीच्या
जोरावर २८१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ ४१ व्या
षटकात २४५ धावांवर सर्वबाद झाला. ११५ चेंडूत २० चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीनं नाबाद
१७१ धावा करणारी हरमनप्रीत कौर सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली. या स्पर्धेत परवा
रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची इंग्लंडबरोबर लढत होणार आहे.
****
थकीत वेतन अदा करावं, मानधनात वाढ करावी, यासह विविध मागण्यांसाठी
अंगणवाडी सेविकांनी काल बीड इथं सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन
केलं. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आंदोलनकर्त्या महिलांची भेट घेऊन,
मागण्यांचं निवेदन स्वीकारलं. या आंदोलनामुळे महामार्गावरची वाहतुक काही काळ विस्कळीत
झाली होती.
****
महागाई भत्त्यासह इतर मागण्यांसाठी
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेनं काल औरंगाबाद आणि परभणी इथं एसटी महामंडळाच्या कार्यालयासमोर
निदर्शनं केली. कामगारांना एक एप्रिल २०१६ पासून २५ टक्के अंतरिम वाढ द्यावी, एक जुलै
२०१६ पासूनचा वाढीव सात टक्के महागाई भत्ता त्वरित अदा करावा, यासह अन्य मागण्यांसाठी
हे आंदोलन करण्यात आलं.
****
आषाढी वारीनंतर पंढरपूरहून शेगावकडे परतीच्या मार्गावर असलेली संत गजानन
महाराजांची पालखी काल जालना शहरात दाखल झाली. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी
गर्दी केली होती.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात नर्सी नामदेव इथंही काल भाविकांनी संत नामदेव
महाराज यांच्या दर्शनासाठी काल पहाटेपासून रांगा लावल्या होत्या.
****
No comments:
Post a Comment