Thursday, 27 July 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 27.07.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 July 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ जुलै २०१ दुपारी .००वा.

****

संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी आज सहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री पदाची, तर भारतीय जनता पक्षाचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी, त्यांना गोपनीयतेची शपथ दिली.

उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव भ्रष्टाचारप्रकरणी राजीनामा देत नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर काल नितीशकुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस पक्षासोबतची युती संपुष्टात आणली होती. त्यानंतर नितीशकुमार यांनी भाजपसोबत युती करून राज्यात पुन्हा सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. शपथविधीनंतर वार्ताहरांशी बोलतांना मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी, बिहारच्या हितासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं सांगितलं. केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचं

सरकार असल्यामुळे बिहारच्या विकासाला गती मिळेल, असं उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी म्हणाले.

येत्या दोन दिवसात विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश राज्यपाल त्रिपाठी यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहेत.

****

लोकसभेत आज कामकाज सुरु होताच बिहारच्या मुद्यावरुन काँग्रेस सदस्यांनी गदारोळ करत घोषणाबाजीला सुरुवात केली. यामुळे अध्यक्षांनी कामकाज लगेचच साडे अकरा वाजेपर्यंत तहकूब केलं.

राज्यसभेत परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी, इराकमध्ये मोसूल इथं अडकलेल्या पंजाबमधल्या नागरिकांचा शोध अद्याप सुरू असून, हे नागरिक मारले गेल्याचा किंवा तुरुंगात कैद असल्याचा, कोणताही पुरावा अद्याप मिळाला नसल्याचं सांगितलं.  

****

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. तामिळनाडूमधल्या रामेश्वरम इथं उभारण्यात आलेल्या अब्दुल कलामांच्या स्मारकाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. यावेळी तामिळनाडूचे राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री के पलानीसामी उपस्थित होते. कलाम संदेश वाहीनी यात्रेलाही पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. ही यात्रा संपूर्ण देशभर फिरणार असून, १५ ऑक्टोबरला कलाम यांच्या जयंती दिनी दिल्लीला राष्ट्रपती भवनात पोहोचणार आहे.

****

जम्मू काशमीरमधल्या गुरेझ सेक्टरमध्ये आज भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

सरकारनं महिलांवरचा अत्याचार रोखण्यासाठी विवाह नोंदणी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली. मात्र सध्या विवाह नोंदणी आधार कार्डला जोडण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं ते म्हणाले. सध्या फक्त वैवाहीक तसंच पोटगीच्या खटल्यांमध्ये पुरावा म्हणून सादर करण्यासाठी विवाह नोंदणी सक्तीची करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३० जुलैला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३४वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

राज्य महिला आयोगानं मुंबई इथं आयोजित केलेल्या महिला तस्करीबाबतच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे, अभिनेता अक्षय कुमार उपस्थित होते.

****

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागापासून कुणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्याचं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितलं. पीक विमा भरतांना होणारी गर्दी लक्षात घेता सुटीच्या दिवशीही बँका सुरू ठेवण्याबाबतचा प्रस्ताव भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्यात आला असल्याचं ते म्हणाले. ऑनलाईन पीक विमा भरतांना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींची दखल घेऊन कृषिमंत्र्यांनी मंत्रालयात विमा कंपन्यांच्या प्रतिनीधींची तातडीने विशेष बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगामासाठी सहभागी होण्याकरता ३१ जुलै अंतिम मुदत आहे.

****

बैलगाडी शर्यत विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. राज्य विधीमंडळानं बैलगाडी शर्यत विधेयक पारीत केल्यानंतर, ते राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आलं होतं. राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानं या विधेयकातील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून राज्यात ही शर्यत पुन्हा सुरु होणार आहे.               

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान गॉल इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याचा दुसर्या दिवसाचा खेळ सुरु झाला असून, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या आठ बाद ५१७ धावा झाल्या होत्या.

शिखर धवननं १९०, चेतेश्वर पुजारा १५३, अजिंक्य रहाणेनं ५७, रविचंद्रन अश्विननं ४७, वृद्धीमान सहानं १६,रविंद्र जडेजाने १५ तर कर्णधार विराट कोहलीनं तीन धावा केल्या.

*****

No comments: