Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 25 July 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
भारतीय
सैन्याकडे पुरेसा शस्त्रसाठा उपलब्ध असल्याचा निर्वाळा संरक्षण मंत्री अरूण जेटली यांनी
दिला आहे. राज्यसभेत, शस्त्रसामग्रीबाबत कॅगच्या अहवालासंदर्भात प्रश्नाला उत्तर देताना,
जेटली यांनी, सन २०१३ चा कॅगचा हा अहवाल एका विशिष्ट काळापुरता मर्यादित होता, असं
स्पष्ट केलं. संरक्षण क्षेत्राशी संबंधित बाबींमध्ये देशानं लक्षणीय प्रगती केली असून,
देश स्वसंरक्षणाच्या दृष्टीनं पूर्णपणे समर्थ असल्याचं, जेटली यांनी आज नमूद केलं.
****
राज्यसभेत
आज दुपारनंतरच्या सत्रात शेतकऱ्यांच्या समस्या आणि शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये
वाढ या विषयावर अल्पकालिक चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल
पटेल, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी या चर्चेत सहभाग नोंदवत महाराष्ट्रातल्या
शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे लक्ष वेधलं.
दरम्यान
लोकसभेचं कामकाज मात्र उद्या सकाळपर्यंत तहकूब करण्यात आलं. काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य
सिंधिया यांच्यासंदर्भात भाजप खासदारांनी केलेल्या विधानावर आक्षेप घेत, काँग्रेस खासदारांनी
हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली, त्यानंतर अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज
उद्यापर्यंत तहकूब केलं.
****
काँग्रेसच्या
सहा सदस्यांना लोकसभेतून निलंबित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या नेत्यांनी
संसद भवन परिसरातल्या महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर धरणं धरलं. यावेळी या नेत्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
****
सायबर
गुन्ह्यांसंदर्भात दोषसिद्धतेचं प्रमाण जाहीर करण्याच्या मागणीसाठी विरोधी सदस्यांनी
आज विधानसभेत गदारोळ केला. प्रश्नोत्तराच्या तासात बाळासाहेब थोरात तसंच पृथ्वीराज
चव्हाण यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सायबर सुरक्षा तसंच माहिती तंत्रज्ञान कक्षामार्फत
२०१४ पासून मे २०१७ पर्यंत दाखल आठ हजार एकशे आठ प्रकरणांपैकी तीन हजार सातशे छत्तीस
प्रकरणांत गुन्हेगारांना अटक करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील
यांनी दिली. अशा गुन्ह्यांना प्रतिबंधासाठी शासनामार्फत पुढील पाच वर्षांकरता आठशे
सदोतीस कोटी रूपये खर्चाचा प्रकल्प राबवण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचं,
पाटील यांनी सांगितलं. मात्र या उत्तरानं समाधान न झाल्यानं, काँग्रेससह राष्ट्रवादी
काँग्रेसच्या सदस्यांनीही घोषणाबाजी केली.
दरम्यान,
माजी मंत्री एकनाथ खडसे यासंदर्भातल्या चर्चेत सहभागी झाले. सायबर गुन्ह्यामुळेच आपल्याला
पदावरून पायउतार व्हावं लागल्याचं सांगत, याप्रकरणी एकाला अटक करून, त्याला जामीनही
मिळाला, मात्र आपली प्रतिमा कायमस्वरूपी डागाळल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांना
ऑनलाइन पीक विमा भरण्याची ३१ जुलै २०१७ ही मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी
काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांनी केली. या मागणीचा विचार केला जाईल असं, अन्न आणि
नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत सांगितलं.
राष्ट्रवादीचे
खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर दाखल गुन्हा तत्काळ रद्द करावा, अशी मागणी पाटण तालुक्याचे
आमदार शंभूराजे देसाई यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आज विधानसभेत केली. उदयनराजे
यांना खोट्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली असून, सरकारनं याची चौकशी करावी, अशी मागणी
देसाई यांनी केली.
दरम्यान,
उदयनराजे यांना न्यायालयानं तात्पुरता जामीन मंजूर केला असून, याप्रकरणी पुढची सुनावणी
येत्या दोन ऑगस्टला होणार आहे.
रुग्णावर
उपचार करत असताना एका रुग्णासाठी एकदा वापरण्यात आलेलं इंम्प्लॅंट तसंच त्यासाठीची
उपकरणं दुसऱ्या रुग्णासाठी वापरात येऊ नयेत, यासाठी शासन कठोर पावलं उचलत असल्याची
माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे. विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या
तासाला सदस्य सतेज पाटील यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
****
राज्यातल्या
२४ जिल्हयांमध्ये येत्या एक ते तेरा ऑगस्ट या कालावधीत ‘अतिसार नियंत्रण पंधरवडा’ राबवण्यात
येणार असून या कालावधीत या जिल्हयांमधल्या सगळ्या शासकीय आणि निमशासकीय शाळा तसंच अंगणवाड्यामध्ये
हात स्वच्छ धुण्याचं प्रात्याक्षिक दाखवण्यात येणार आहे. या दरम्यान ओआरएस अर्थात जलसंजीवनी
आणि झिंक गोळयांचे वाटप करण्यात येणार आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या सहाशे बावीस ग्रामपंचायतींच्या वार्षिक अंदाजपत्रकांच्या तसंच जिल्हा
परिषद आणि पंचायत समितींच्या एकूण निधीच्या तीन टक्के इतका निधी दिव्यांगांच्या सोयीसुविधांसाठी
खर्च करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी
ही माहिती दिली आहे. ते आज उस्मानाबाद तालुक्यातल्या वाघोली इथे दिव्यांगासाठी आयोजित
विशेष ग्रामसभेत बोलत होते.
****
No comments:
Post a Comment