Tuesday, 5 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 05.12.2017 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 December 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५  डिसेंबर २०१७ सकाळी .५० मि.

****

****

** रक्त संबंधातल्या नातेवाईकांचं वैध जात प्रमाणपत्र महत्त्वाचा पुरावा मानून, जात वैधता प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना जारी

** वाहन योग्यता प्रमाणपत्राचे निकष शिथील; कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयातून प्रमाणपत्र घेता येणार

** ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं काल मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन

** राज्य हिंदी साहित्य अकादमीचा जैनेंद्र कुमार पुरस्कार रेखा बैजल यांना जाहीर

आणि

** दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर

****

जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीनं दिलेल्या, अर्जदाराच्या रक्त संबंधातल्या नातेवाईकांचं वैध जात प्रमाणपत्र महत्त्वाचा पुरावा मानून, जात वैधता प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना, शासनानं प्रसिद्ध केली आहे. अर्जदारानं असं प्रमाणपत्र सादर केल्यास, पुण्यातल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात ते प्रसिद्ध केलं जाईल. या अर्जाबाबत विहित मुदतीत कोणत्याही आक्षेप प्राप्त न झाल्यास, इतर पुराव्यांची मागणी न करता, अर्जदारास जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येईल, असं या अधिसूचनेत म्हटलं आहे.

****

वाहनधारकांना आता फिटनेस सर्टिफिकेट अर्थात वाहन योग्यता प्रमाणपत्र कोणत्याही प्रादेशिक परिवहन कार्यालयातून घेता येणार आहे. वाहनाची नोंदणी ज्या कार्यालयात केली तिथूनच योग्यता प्रमाणपत्र मिळवण्याची अट शिथील करण्याचा निर्णय परिवहन खात्यानं घेतला असल्याची माहिती, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल मुंबईत दिली. त्यामुळे वाहनधारकांना विशेषत: प्रवासी तसंच मालवाहू वाहनांना प्रवासादरम्यान, योग्यता प्रमाणपत्राची मुदत ज्या ठिकाणी संपेल, त्या ठिकाणच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून हे प्रमाणपत्र घेता येईल, असं रावते यांनी सांगितलं.

****

सरकारनं घेतलेल्या विविध निर्णयांमुळे कडधान्य आणि तेलबियांच्या दरात वाढ झाली असून डिसेंबरनंतर त्यात अजून वाढ होण्याची शक्यता, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी वर्तवली आहे. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत काल ते बोलत होते.

****

काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी काल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक अर्ज दाखल केला. राहुल गांधी यांच्याशिवाय इतर कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्यानं, या पदासाठी राहुल गांधी यांची बिनविरोध निवड निश्चित असल्याचं, मानलं जात आहे. या निवडणुकीसाठी आवश्यकता भासल्यास, येत्या १६ डिसेंबरला मतदान होणार असून, १९ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

****

१९९३ च्या मुंबई बाँबस्फोट खटल्यातला एक आरोपी, ताहीर मर्चंट याच्या फाशीच्या शिक्षेला काल सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली. मुंबईतल्या टाडा न्यायालयानं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला मर्चंटनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. यासंदर्भात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला सहा आठवड्यात उत्तर देण्यास सांगितलं आहे. मुंबईत १९९३ साली झालेल्या या साखळी बाँबस्फोटात २५७ जण ठार, तर ७१८ जण जखमी झाले होते.

****

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर काल सेवानिवृत्त झाल्या. नवीन मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती होईपर्यंत न्यायमूर्ती विजया ताहिलरमाणी हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत.

****

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं काल मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. गेल्या तीन आठवड्यांपासून ते आजारी असल्यानं त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. १८ मार्च १९३८ रोजी कोलकाता इथं जन्मलेले बलबीरराज उर्फ शशी कपूर यांनी त्यांचे वडील ज्येष्ठ अभिनेते पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटर्समध्ये बाल कलाकार म्हणून ४० च्या दशकात अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. आग, आवारा या चित्रपटातूनही त्यांनी बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या.



१९६१ साली प्रदर्शित झालेला धर्मपूत्र हा नायक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर त्यांनी जब जब फूल खिले, कन्यादान, शर्मिली, आ गले लग जा, रोटी कपडा और मकान, चोर मचाए शोर, अभिनेत्री, दीवार, नमक हलाल, फकिरा, सत्यम शिवम सुंदरम, कभी कभी, आदी १४८ हिंदी आणि १२ अमेरिकन तसंच ब्रिटीश चित्रपटातून विविध भूमिका साकारल्या. ३६ चौरंगी लेन, उत्सव, या सारख्या चित्रपटांची निर्मिती तर अजूबा या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं.



चित्रपट सृष्टीत पाच दशकं दिलेल्या योगदानासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कारासह दादासाहेब फाळके पुरस्कार तसंच पद्मभुषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.



शशी कपूर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी विद्यासागर राव, यांच्यासह चित्रपटसृष्टीतून अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शशी कपूर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत, नाविन्य आणि उत्कटता हा फक्त त्यांच्या अभिनयाचा नव्हे, तर एकूण व्यक्तिमत्त्वाचा गुण होता, असं म्हटलं आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

****

ओखी वादळाच्या तडाख्यामुळे सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड बंदरात सोमवारी दिवसभर गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आदी भागातून शेकडोंच्या संख्येने ट्रॉलर्स दाखल झाले. हे सर्व ट्रॉलर्स बंदरात सामावून घेण्यासाठी सागरी सुरक्षा रक्षक, पोलीस खाते, बंदर विभाग आणि स्थानिक ग्रामस्थांनी सहकार्य केलं. ओखी वादळाचा सिंधुदूर्ग पाठोपाठ काल रायगड किनारपट्टीला तडाखा बसला. पनवेल श्रीवर्धन, अलिबाग, या सह बहुतेक सर्वच ठिकाणी जोरदार पाऊस होत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने पुढे सरकत असल्यानं, पालघर जिल्ह्यात समुद्र तसंच खाडी किनाऱ्यालगत असलेल्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र तसंच मराठवाड्यातही पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या वतीनं दिला जाणारा ‘जैनेंद्र कुमार पुरस्कार जालना इथल्या साहित्यिका रेखा बैजल यांच्या ‘मौत से जिंदगी की ओर’ या कादंबरीला  जाहीर झाला आहे. बैजल यांची आतापर्यंत हिंदी आणि मराठी भाषेत ३५ पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत.

****

शिवार प्रतिष्ठानचे वाङमय पुरस्कार काल जाहीर झाले.नांदेड जिल्ह्यातले प्रदीप पाटील यांच्या गावकळा कादंबरीला शेतकरी साहित्य पुरस्कार तर सोलापूर इथल्या सोनाली गावडे हिची बालसाहित्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

****

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ काल जाहीर झाला, या संघात हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि पार्थिव पटेल यांचा समावेश करण्यात आला आहे.  श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीही काल संघ जाहीर करण्यात आला. कर्णधार विराट कोहलीला या मालिकेतही विश्रांती देण्यात आली असून, रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल. जयदेव उनाडकट वाशिंगटन सुंदर, बासिल थम्पी, आणि दीपक हुड्डा यांचा या संघात समावेश आहे.



दरम्यान, भारत आणि श्रीलंकेदरम्यान दिल्ली इथं सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल तिसऱ्या दिवस अखेर श्रीलंकेच्या नऊ बाद ३५६ धावा झाल्या. सामन्यात भारत १८० धावांनी आघाडीवर आहे.

****

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेच्या पदवीधर गटातल्या दहा जागांसाठी काल ५९ टक्के मतदान झालं. यात खुल्या गटात पाच आणि राखीव प्रवर्गातल्या पाच जागांसाठी शहरातल्या १० केंद्रांवर मतदारांनी मतदान केलं.

****

****

वीज क्षेत्रात राज्य सरकार लवकरच मोठी गुंतवणूक करणार असल्यानं, शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळू शकेल, आणि उपलब्ध पाणी शेतीसाठी वापरता येईल, असं कौशल्यविकास मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री, संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं. लातूर नजिक बुधोडा इथं, शेतकरी आणि ग्रामस्थांशी काल संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. कर्जमाफी ऐवजी शेतकरी कायम कर्जमुक्त राहावा, हे राज्य शासनाचं धोरण असल्याचं ते म्हणाले.

****

शेतकरी जागर मंच च्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काल अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या उपस्थितीत मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई करत ताब्यात घेतलं. या मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असं यशवंत सिन्हा यांनी सांगितलं.

*****




No comments: