Monday, 4 December 2017

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 04.12.2017 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 December 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ४ डिसेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

आधुनिक जीवनशैलीशी संबंधित आजार सतत वाढत असताना ते कमी करण्यासाठी आयुर्वेद महत्वाची भुमिका बजावू शकतो, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती भवनात आज पंडित रामनारायण शर्मा राष्ट्रीय आयुर्वेद पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. आजारांचा प्रतिबंध आणि उपचार करण्यासाठी आयुर्वेदाची एक शक्तिशाली माध्यम म्हणून स्थापना करण्याची जबाबदारी आयुर्वेद तज्ज्ञांची असल्याचं राष्ट्रपती यावेळी म्हणाले. भारताच्या जंगलांमध्ये पाच हजार प्रकारच्या औषधी वनस्पती असून, त्यांचं संरक्षण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

****

आयुष आणि पारंपारिक उपचार पद्धतीनं जगभरात आरोग्य व्यवस्था सुधारण्यास मदत मिळेल, असं आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज आयुष आणि समृद्ध आरोग्य या विषयावरचं पहिलं आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि चर्चासत्र आरोग्य २०१७’ चं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. सामान्य आणि नैसर्गिक पद्धतीने आरोग्यविषयक समस्या दूर करणं, हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या पंधराव्या वित्त आयोगानं आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत सर्व भागधारकांशी विस्तृत चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. यात केंद्र शासनाची सर्व मंत्रालयं, सर्व राज्य सरकारं, स्थानिक संस्था, पंचायत समित्या आणि राजकीय पक्षांच्या भागधारकांचा समावेश आहे. हा आयोग एक एप्रिल २०२० पासून पुढच्या पाच वर्षासाठीच्या शिफारशी देणार आहे. केंद्र आणि राज्यांदरम्यान असलेल्या कराच्या भागीदारीवरही आयोग सूचना देणार असून, वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू केल्यानंतर त्याच्या परिणामाचा अभ्यासही करणार आहे.  

****

आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि मतदानाची पोचपावती देणाऱ्या व्हीव्हीपॅट यंत्रांवरच्या आकडेवारीचा मेळ घालण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. जोती यांनी आज अहमदाबाद इथं ही माहिती दिली. १८२ विधानसभा क्षेत्रातल्या कुठल्याही मतदान केंद्रावर ही पडताळणी केली जाणार आहे. या निवडणुकीत सर्व ५० हजार २६४ मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांसोबत पोचपावती देणारी यंत्रही बसवण्यात येणार आहेत.

****

मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई मेट्रोच्या दरवाढीचा प्रस्ताव फेटाळला आहे. मेट्रो रेल्वेचं तिकीट दर निश्चित करणाऱ्या समितीनं चार रुपये दरवाढीची शिफारस केली होती, मात्र उच्च न्यायालयानं ती अमान्य केली.

****

कारागृहात राहिल्यावर मोफत उपचार होतात, म्हणून सतत काही ना काही कारणानं कारागृहात जाणाऱ्या एका आरोपीला अहमदनगर पोलिसांनी अटक केली आहे. अमित कांबळे असं या आरोपीचं नाव असून, त्यानं कोपर्डी प्रकरणातल्या तिन्ही आरोपींना नागपूरच्या कारागृहात नको, तर पुण्यातल्या येरवडा कारागृहात न्यावं, असा नगर कारागृहात दूरध्वनी केला होता. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी आज ही माहिती दिली. याआधीही त्याने असे फोन करून कारागृहात मोफत उपचार घेतले असल्याचं उघड झालं आहे.

****

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेच्या पदवीधर गटातल्या दहा जागांसाठी आज ५० टक्के मतदान झालं. यात खुल्या गटात पाच आणि राखीव प्रवर्गातल्या पाच जागांसाठी शहरातल्या १० केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती. मात्र, मतदारांच्या यादीत आदला- बदल झाल्यामुळे दुपार नंतर मतदान प्रक्रिया थंडावल्याचं दिसून आलं.

****

महावितरणच्या कृषीपंप वीजतोडणी विरोधात गंगापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज संताप व्यक्त करत तहसिल कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडलं असल्याची माहिती गंगापूर पोलिसांनी दिली.

****

अहमदनगर इथल्या  समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना  शिष्यवृत्तीचं निवेदन देतांना त्यांच्या तोंडावर शाई फेकण्यात आल्याच्या निषेधार्थ हिंगोली इथल्या समाज कल्याण विभागात आज कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं. शाई फेकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. गेल्या शनिवारी ही घटना घडली होती.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर बाजार समितीच्या विशेष मासिक सभेत आज शिवसेनेच्या सदस्यांनी गोंधळ घातल्याचं वृत्त आहे. बाजार समितीच्या हिशोबावरुन सभापती काकासाहेब पाटील आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये वादावादी झाली. या वदावरुन शिवसेनेच्या सदस्यांनी सभापतींच्या अंगावर शाई  फेकल्याचं वृत्त आहे. 

****

भारत आणि श्रीलंकेदरम्यान दिल्ली इथं सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवस अखेर श्रीलंकेच्या नऊ बाद ३५६ धावा झाल्या. रविचंद्रन अश्विननं तीन, तर मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी दोन गडी बाद केले. भारत १८० धावांनी आघाडीवर आहे.

****


No comments: