Thursday, 14 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 14.12.2017 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१४ डिसेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

****



नौदलाची ‘आयएनएस कलवरी’ ही पाणबुडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत राष्ट्राला अर्पण केली. डिझेल-इलेक्ट्रिकवर चालणारी ही पाणबुडी असून, अशा प्रकारच्या आणखी काही पाणबुड्या नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. दोन दशकांनंतर अशी पाणबुडी नौदलात दाखल झाली असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, या पाणबुडीच्या विकासासाठी हातभार लावणाऱ्या सगळ्यांचे आभार मानले. संरक्षण मंत्री निर्मला सितारामन, नौदल प्रमुख एडमिरल सुनिल लांबा, राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते.  

****

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान आज होत आहे. एकूण १८२ जागांपैकी उत्तर आणि मध्य गुजरातमधल्या ९३ जागांसाठी मतदान हाणार असून, ८५१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पहिल्या  टप्प्यातलं ८९ जागांसाठीचं मतदान नऊ डिसेंबरला झालं होतं. येत्या १८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

****

उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या अधिवेशनात तिहेरी तलाक संबंधी आणि मागासवर्गीय आयोगाच्या घटनात्मक स्थितीबाबतची विधेयकं मंजुरीसाठी येण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनीही सभागृहाचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी आज संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

****

डिजिटल तंत्रज्ञानामुळे मुलांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारत असल्या तरी याच माध्यमामुळे लहान मुलांचं शोषण होत आहे त्यामुळे शाळा, आश्रमशाळा, अनाथालयं या ठिकाणी मुलांच्या सुरक्षेसाठी संस्थात्मक व्यवस्था निर्माण करण्याची गरज राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी व्यक्त केली आहे. युनिसेफच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या ‘जगातल्या लहान मुलांची सद्यस्थिती २०१७’ या अहवालाच्या डिजिटल आवृत्तीचं अनावरण राज्यपालांच्या हस्ते काल मुंबईत झालं, त्यावेळी ते बोलत होते. लहान मुलांना सकारात्मक, योग्य आणि सुरक्षित डिजिटल माहिती उपलब्ध व्हायला हवी असंही राज्यपालांनी यावेळी सूचित केलं.     

****

राज्यातल्या १० नगरपरिषदा आणि  नगरपंचायंतीच्या निवडणुकीसाठी काल झालेल्या मतदानाची मतमोजणी आज होत आहे. दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

*****




No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 26 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...