Thursday, 21 December 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.12.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 December 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  २१  डिसेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****

बहुचर्चित टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी आज दिल्लीच्या विशेष न्यायालयानं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. दोन वेगवेगळ्या खटल्यांवर न्यायालयानं आज अंतिम निर्णय सुनावला. माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए. राजा आणि खासदार कनिमोझी यांच्यासह १७ जण या प्रकरणात दोषी होते.

दरम्यान, काँग्रेस आणि द्रमुकनं या निर्णयाचं स्वागत केलं असून, भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सरकार या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं सांगितलं.

****

पाणी टंचाई असलेल्या भागात संबंधित खासदारांनी पर्जन्य जल पुनर्भरणासाठी लोकचळवळ उभारावी, असं आवाहन केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत केलं. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये जल पुनर्भरणासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी यांनी, यासंदर्भात मार्गदर्शक तत्वं जारी करणार असल्याचं सांगितलं.  सार्वजनिक इमारतींवर पर्जन्य जलपुनर्भरण संबंधी कायदा करण्याची मागणीही शिंदे यांनी केली, मात्र ही बाब बंधनकारक करण्याऐवजी लोकचळवळीतून व्हावी, असं गडकरी यांनी नमूद केलं.

****

विमानप्रवास सामान्य नागरिकांना परवडेल, या दृष्टीनं एप्रिल २०१६ मध्ये केंद्र शासनानं जाहीर केलेल्या उडान कार्यक्रमात कोल्हापूरहून मुंबईला विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. हे विमान येत्या २४ तारखेपासून आठवड्यातून तीनच दिवस सुरु राहणार आहे, यावर कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी, हे विमान दररोज असावं आणि उड्डाणाची वेळ दुपारऐवजी सकाळी असावी, अशी मागणी आज लोकसभेत केली. या मागणीवर सकारात्मक विचार केला जाईल, अशी ग्वाही नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी दिली.

दरम्यान, या योजनेत नाशिकमधल्या ओझर इथून मुंबई आणि पुण्या करता, तर जळगाव इथून मुंबईकरता परवा २३ तारखेपासून विमानसेवा सुरु होणार आहे. ‘उडान’ योजनेसाठी नांदेडसह, अमरावती, गोंदिया, नाशिक, जळगाव, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही विमानतळं आरसीएस विमानतळं म्हणून अधिसूचित करण्यात आली असून, या विमानतळांवरुन टप्प्याटप्प्यानं विमानसेवा सुरु होणार आहे.

****

दरम्यान, लोकसभेत आजही कामकाज सुरु होताच काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरु केली. गुजरात इथं निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसच्या सदस्यांनी लावून धरली. यातच अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरु ठेवला.

****

राज्यसभेतही याच मुद्यावरुन विरोधकांनी गदारोळ केला. कामकाज सुरु होताच काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी, पंतप्रधानांनी सभागृहात येऊन आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. काँग्रेस सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोर हौद्यात उतरुन घोषणाबाजी सुरु केल्यानं सभापतींनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.   

****

मुस्लिम महिलांना विवाह संरक्षण आणि हक्क विधेयक २०१७ उद्या संसदेत मांडण्यात येणार असल्याचं संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी सांगितलं. ते आज संसद परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. तिहेरी तलाक हा गुन्हा असून, पतीला तीन वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद या विधेयकात आहे. तोंडी किंवा एस एम एस, ई-मेल, व्हॉट्सॲप यासारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दिलेला तलाक बेकायदेशीर ठरवण्याची तरतूदही या विधेयकात आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षानं कोणत्याही मुद्यावर गदारोळ न करता संसदेच्या कामकाजात सहभागी व्हावं, असं आवाहनही कुमार यांनी यावेळी केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३१ डिसेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३९वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, माय जी ओ व्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवाव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचं प्रतिनिधित्व नसलेलं राष्ट्र, अधिकारांच्या अभावी, जगापुढे उभी ठाकलेली आव्हानं हाताळायला असमर्थ ठरु शकतं, असं भारतानं म्हटलं आहे. भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातले स्थायी प्रतिनिधी सईद अकबरुद्दीन यांनी सुरक्षा परिषदेच्या एका विशेष बैठकीत हे मत मांडलं. सुरक्षा परिषदेचं स्थायी सभासदत्व भारताला अद्याप मिळालेलं नाही. परिषदेच्या पाच पैकी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया या चार सभासदांचा भारताच्या सभासदत्वाला पाठिंबा असला तरी चीननं मात्र त्याला विरोध दर्शवला आहे.

****

याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी.


No comments: