Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 19 February 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ फेब्रुवारी २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø ‘एक पद्म डॉलर्स’च्या
अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट महाराष्ट्र नक्की पूर्ण करेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना
विश्वास
Ø नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमिपूजन आणि जवाहरलाल
नेहरू पोर्ट ट्र्स्टच्या चौथ्या कंटेनर टर्मिनलचं लोकार्पण
Ø मराठा समाजातल्या
विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दहा हजार रुपये वसतीगृह अनुदान देण्याचा सरकारचा
विचार - सहकार मंत्री सुभाष देशमुख
Ø मराठीतून शिक्षणाचा कायदा करण्यासह १६ ठराव मंजूर करत बडोदा इथल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप
आणि
Ø दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या
टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांत भारताचा पुरूष संघ विजयी तर महिलांचा पराभव
*****
‘एक पद्म डॉलर्स’च्या अर्थव्यवस्थेचं महाराष्ट्रांनं
ठेवलंलं उद्दिष्ट नक्की पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
राज्य सरकारच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. मुंबईत मॅग्नेटिक महाराष्ट्र या जागतिक
गुंतवणूक परीषदेचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला
राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, केंद्रीय
राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, सुभाष देसाई,
विनोद तावडे, उद्योजक रतन टाटा, मुकेश अंबानी यांच्यासह जागतिक पातळीवरचे उद्योग क्षेत्रातले
मान्यवर उपस्थित होते. तीन वर्षांत महाराष्ट्र सरकारनं गुंतवणुकीसाठी अभुतपूर्व पावले
उचलली असून गेल्या दोन वर्षात जेवढी परदेशी गुंतवणूक देशात आली त्यापैकी ५१ टक्के ही
महाराष्ट्रात आल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राचा विकास हा भारताच्या वाढत्या सामर्थ्याचे
प्रतिक असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. केंद्र सरकारच्या साडेतीन वर्षांतल्या प्रयत्नांमुळे
आता देशाच्या पाच महापद्म डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेची चर्चा सुरु झाली, ही आश्वासक बाब
असल्याचं ते म्हणाले.
राज्यातला प्रस्तावित
समृद्धी महामार्ग आणि त्यालगतच्या स्मार्ट शहरांच्या माध्यमातून २० लाख नवे रोजगार
निर्माण होतील तसंच व्यापक वाढीसह कृषी आधारीत विकासाला चालना मिळेल, असं मोदी म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलतांना ‘सबका
साथ, सबका विकास’मध्ये महाराष्ट्र हे केंद्र सरकारचा विश्वसनिय भागीदार असल्याचं सांगितलं.
नवी मुंबई इथल्या
आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमिपूजन आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्र्स्टच्या
चौथ्या कंटेनर
टर्मिनलचं लोकार्पण इलेक्ट्रॉनिक पध्दतीनं कळ दाबून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल उलवे गावाजवळ कोंबडभुजे
इथं करण्यात आलं. यावेळी बोलतांना त्यांनी देशाच्या सागरी किनाऱ्याचा विकास करून सागरी
शक्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं शंभर हून अधिक जलमार्गाचं
नियोजन केलं असल्याचं
सांगितलं. सागरी क्षेत्रात महासत्ता होण्यासाठी सागरी शक्तींमध्ये वाढ करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं
पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.
२०१९ च्या डिसेंबरपर्यंत या विमानतळाचा
एक टर्मिनल आणि एक धावपट्टी तयार होऊन पहिलं विमान हवेत झेपावेल असं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी
बोलतांना सांगितलं.
मुंबई विद्यापीठात सुरू करण्यात आलेल्या कृत्रिम
बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाशी संबंधित वाधवानी
कृत्रिम बुद्धीमत्ता केंद्राचं उद्घाटनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते काल
झालं.
****
मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी
दहा हजार रुपये वसतीगृह अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री
सुभाष देशमुख यांनी दिली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं राबवण्यात
येणाऱ्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानानिमित्त सोलापूर
इथं आयोजित मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. मराठा क्रांती मोर्चा दरम्यान
करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये मराठा समाजाच्या मुलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र
वसतीगृह व्हावे अशी मागणी करण्यात आली होती. यानुसार वसतीगृहाच्या बांधकामासाठी पाच
कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून, प्रत्येक जिल्ह्यात जागेचा शोध सुरू आहे. ही प्रक्रिया
पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होवू नये, यासाठी वसतीगृह अनुदान
योजना राबवण्याचा निर्णय घेतला असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.
****
बडोदा इथल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा
काल समारोप झाला. अध्यक्षीय चार ठरावांसह १६ ठरात या संमेलनात संमत करण्यात आले. राज्य
शासनानं मराठीतून शिक्षणाचा कायदा करावा, महाराष्ट्राच्या गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगण,
कर्नाटक, आणि छत्तीसगड या सीमावर्ती राज्यांनी राज्य मराठी अकादमी स्थापन करावी, तसंच
शाळांमध्ये शिकवण्यात येणाऱ्या संगणक अभ्यासक्रमात युनिकोड वापरून मराठी प्रशिक्षण
अनिवार्य करावं या ठरांवासह मराठीच्या वापराबाबत श्वेतपत्रिका प्रकाशित करावी, बडोदा
विमानतळास महाराज सयाजीराव गायकवाड यांचं नाव द्यावं असे विविध ठराव संमत करण्यात आले.
दरम्यान, सरकारच्या अंसवेदनशीलतेबद्द्ल नाराजी व्यक्त करणारा ठरावही संमेलनाच्या समारोपप्रसंगी
मंजूर करण्यात आला. त्याआधी, काल
सकाळच्या सत्रात निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची प्रकट मुलाखत घेण्यात
आली, तर अनुवाद: गरज, समस्या आणि उपाय तसंच राजकीय वास्तवाच्या समर्थ चित्रणापासून
लेखक दूर का? या विषयांवर परिसंवाद घेण्यात आले. तर रोहिणी हट्टंगडी, भरत दाभोळकर आणि
उज्ज्वल निकम या मान्यवरांनी श्रोत्यांशी संवाद साधला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
राज्यात आज शिवजयंती उत्साह आणि
जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी होत आहे. यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या
परिसरात स्वच्छता करुन विद्युत रोषणाई, भगवे झेंडे यांसह सजावट करण्यात आली आहे. विविध
संघटनांच्यावतीनं वेगवेगळ्या कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे.
औरंगाबाद इथं काल या दिनाच्या पूर्वसंध्येला क्रांती चौकातल्या शिवाजी
महाराजांच्या पुतळ्याजवळ दहा हजार दिवे प्रज्वलीत
करुन दिपोत्सव साजरा करण्यात आला. आज सकाळी नऊ वाजता इथं ध्वजारोण केलं जाईल. शहरातल्या
विविध भागातल्या शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलीकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी केली जाणार
आहे. त्याचबरोबर शहराच्या विविध भागातून मिरवणुकाही काढल्या जाणार आहेत.
बीड इथं काल सार्वजनिक शिवजयंती समितीच्यावतीनं प्रख्यात
डॉक्टर विठ्ठलराव लहाने यांचं व्याख्यान झालं. या पार्श्वभूमीवर लातूर इथं शिवमहोत्सव
समिती आणि अक्का फाऊंडेशन यांच्या पुढाकारातून जिल्हा क्रीडा संकुलावर अडीच एकर क्षेत्रात
साकारलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य रांगोळी चित्र नागरिकांना पाहण्यासाठी खुलं
करण्यात आलं आहे. मंगेश निपाणीकर आणि त्यांच्या समुहानं, ५० हजार किलो रांगोळीचा वापर
करुन काढलेलं हे चित्र येत्या बुधवारपर्यंत पाहण्यासाठी खुलं राहील.
****
भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला
काल जोहान्सबर्ग इथं झालेला पहिला सामना भारतानं
जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं वीस षटकांत पाच बाद २०३ धावा केल्या.
मात्र विजयासाठी खेळतांना दक्षिण आफ्रिकेला वीस षटकांत नऊ बाद १७५ धावाच करता आल्या.
मात्र दुसरीकडे भारताच्या महिला संघाला पराभवाचा
सामना करावा लागला. महिलांच्या टी ट्वेंटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघानं भारतीय संघावर
पाच लंदाजी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत, भारतीय संघ अठराव्या षटकांत १३३
धावात सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिका संघानं हे आव्हान एकोणीसाव्या षटकात साध्य केलं.
मालिकेत भारतीय महिला संघ दोन – एकनं आघाडीवर आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळं झालेली पिकांची नुकसान भरपाई शासन देणार असल्याची
माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. ते काल उस्मानाबाद इथं
पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्ह्यातल्या अपूर्ण कामांना गती देणं, सिंचनाची रखडलेली
कामं, तसंच जिल्हा विकास निधीतली कामं वेळेत पूर्ण करण्यास आपण प्राधान्य देणार असल्याचं
त्यांनी यावेळी बोलतांना सांगितलं.
****
नांदेड
जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यात होट्टल इथल्या होट्टल सांस्कृतिक आणि पर्यटन
महोत्सवाला काल प्रारंभ झाला. खासदार अशोक चव्हाण यांच्याहस्ते या
महोत्सवाचं उद्घाटन झालं. होट्टल या पर्यटन स्थळाचे महत्व लक्षात घेता ते जागतिक
पातळीवर पोहोचवण्याचं आवाहन चव्हाण यांनी केलं. आमदार
सुभाष साबणे यांनी आपल्या भाषणात लिंगनकेरुर इथला तलाव जलपर्यटनासाठी विकसित करण्यात
येणार असल्याची माहिती दिली.
*****
***
No comments:
Post a Comment