आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२० फेब्रुवारी २०१८
सकाळी ११.००
****
भारतानं आज अण्वस्त्र वहनास
सक्षम असलेल्या अग्नि २ या क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. ओडीशातल्या
अब्दुल कलाम बेटावरुन आज सकाळी ही चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता
दोन हजार किलोमीटर पेक्षा जास्त असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
शेतकऱ्यांचं उत्पन्न २०२२ पर्यंत दुपटीनं
वाढवण्याविषयी नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या सांगता समारंभात आज
पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. केंद्रीय कृषीमंत्री
राधामोहन सिंह यांच्या हस्ते काल या दोन दिवसीय परिषदेचं उदघाटन झालं होतं. या
परिषदेत, कृषी शास्त्रज्ञ, तज्ञ आणि कृषी विभागाचे वरिष्ठ
अधिकारी सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या सरकारच्या
प्रयत्नात शास्त्रीय दृष्टीकोनाची मदत मिळावी, आणि
कृषी संबंधित विविध विभागांमध्ये समन्वय वाढावा, हे
या परिषदेचं उद्दिष्ट आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या रविवारी २५ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४१वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
केंद्रीय
औद्योगिक सुरक्षा बल - सी आय एस एफनं मुंबई विमानतळावर सात लाख रुपयांच्या सोन्याच्या
बिस्किटांची तस्करी करणाऱ्या तस्कराला अटक केली आहे. जमाल असं त्याचं नाव असून, तो
मंगलोरला जात होता. सोन्याची वाहतूक करण्यासाठी लागणारी वैध कागदपत्रं त्यानं सादर
केली नसल्यामुळे त्याला अटक करण्यात आली.
****
बीड जिल्ह्यातल्या भवानवाडी इथं शेतात मासे पकडण्यासाठी
गेलेल्या दोन भावंडांचा तलावातल्या विहिरीत काल बुडून मृत्यू झाला.
****
महाउद्योगरत्न हा राज्य शासनाचा प्रतिष्ठित
पुरस्कार ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते काल प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळणं मोठा बहुमान असल्याचं सांगत, रतन
टाटा यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. मॅग्नेटीक महाराष्ट्र या मुंबईत
भरलेल्या गुंतवणुकदारांच्या परिषदेत एका विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान
करण्यात आला.
*****
***
No comments:
Post a Comment