Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 18 February 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ फेब्रुवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
हवाई
वाहतूक क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या विकासाचा वेग वाढवण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी व्यक्त केली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमीपूजन आणि जवाहरलाल
नेहरु पोर्ट ट्रस्टच्या चौथ्या टर्मिनल कंटेनरचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते आज
झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल सी विद्यासागर राव, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक
मंत्री अशोक गजपती राजू, केंद्रीय परिवहन तथा जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पहिलं आरमार उभारणारे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीचा संदर्भ देत पंतप्रधानांनी मालवाहतुकीसाठी
सागरीमार्गाचं महत्त्व यावेळी नमूद केलं. कमी प्रवासी क्षमतेची विमान सेवा सुरू करणं
आवश्यक असल्याचं, ते म्हणाले.
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना, या विमानतळामुळे महाराष्ट्राच्या सकल घरगुती
उत्पन्नात किमान एका टक्क्यानं वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला. डिसेंबर २०१९ पर्यंत
या विमानतळाचं एक टर्मिनल आणि एक धावपट्टी तयार करून, विमानांचं उड्डाण सुरू केलं जाईल,
असं ते म्हणाले.
मुंबईत
आयोजित मॅग्नेटिक महाराष्ट्र, या जागतिक गुंतवणूक परिषदेचं उद्घाटन, पंतप्रधानांच्या
हस्ते होणार असून, एमएमआरडीए मैदानावर आघाडीच्या उद्योजकांशीही पंतप्रधान संवाद साधतील.
दरम्यान,
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पायाभरणी समारंभातून आपल्याला जाणीवपूर्वक डावलण्यात
आल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार मनोज भोईर तसंच रायगडचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केला
आहे. यासंदर्भात एक पत्रक जारी करून, त्यांनी भाजपप्रणीत सरकारच्या या कृतीचा निषेध
केला.
****
मराठा
समाजातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दहा हजार रुपये वसतीगृह अनुदान देण्यात
येणार असल्याची माहिती, राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. अण्णासाहेब
पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या छत्रपती राजाराम महाराज
उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानानिमित्त सोलापूर इथं आयोजित मेळाव्याच्या उद्घाटन
प्रसंगी ते आज बोलत होते. मराठा क्रांती मोर्चा दरम्यान करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये
मराठा समाजाच्या मुलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वसतीगृह व्हावे अशी मागणी करण्यात
आली होती. यानुसार वसतीगृहाच्या बांधकामासाठी पाच कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून,
ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होवू नये, यासाठी वसतीगृह
अनुदान योजना राबवण्याचा निर्णय घेतला असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.
****
नांदेड
जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यात होट्टल इथल्या होट्टल सांस्कृतिक आणि पर्यटन महोत्सवाचं
खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं. होट्टल या पर्यटन स्थळाचे महत्व
लक्षात घेता ते जागतिक पातळीवर पोहोचवण्याचं आवाहन चव्हाण यांनी केलं. आमदार सुभाष
साबणे यांनी आपल्या भाषणात लिंगनकेरुर इथला तलाव जलपर्यटनासाठी विकसित करण्यात येणार
असल्याची माहिती दिली.
यावेळी
गायक संगीतकार बाबुराव उप्पलवार, शिल्पकार व्यंकट पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातल्या
कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
होट्टल
इथले भार्गव देशमुख यांचं तबलावादन, सिनेतारका आदिती भागवत आणि हर्षदा जांभेकर यांची
कथ्थक आणि लावणीची जुगलबंदी, औरंगाबादचे प्रसाद साडेकर आणि संचाचं सुगम गायन या सादरीकरणासह
“चालुक्यकालीन स्थापत्य कला” या विषयावर यावेळी चर्चासत्र घेण्यात आलं.
****
मराठवाड्याच्या
सर्वांगीण विकासाकरिता मराठवाडा जनता विकास परिषदेला आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही,
पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. परिषदेच्यावतीनं आयोजित
‘जालना विकास परिषदेत’ ते आज बोलत होते. मराठवाड्यातल्या राष्ट्रीय आणि राज्य रस्त्यांसाठी
केंद्र सरकारनं प्रथमच ४९ हजार कोटी रुपये निधी दिल्याचं त्यांनी सांगितलं.
****
छत्रपती
शिवाजी महाराज यांची जयंती उद्या सर्वत्र साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर लातूर इथं
शिवमहोत्सव समिती आणि अक्का फाऊंडेशन यांच्या पुढाकारातून जिल्हा क्रीडा संकुलावर अडीच
एकर क्षेत्रात साकारलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य रांगोळी चित्र नागरिकांना
पाहण्यासाठी खुलं करण्यात आलं आहे. मंगेश निपाणीकर आणि त्यांच्या समुहानं, ५० हजार
किलो रांगोळीचा वापर करुन काढलेलं हे चित्र येत्या बुधवारपर्यंत पाहता येईल.
शिवजयंतीनिमित्त
औरंगाबाद नजिक पिसादेवी इथं महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
शिवगाथा, बतावणी, शाहिरी, पोवाडा, आदीच्या सादरीकरणातून दिलीप खंडेराय आणि त्यांच्या
समुहाने शिवकालीन संस्कृतीचं दर्शन घडवलं.
****
दक्षिण
आफ्रिकेत महिलांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेत आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघानं
भारतीय संघावर पाच फलंदाज राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत, भारतीय संघ अठराव्या
षटकांत १३३ धावात सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिका संघानं हे आव्हान एकोणीसाव्या षटकात
साध्य केलं. मालिकेत भारतीय संघ दोन - एकनं आघाडीवर आहे.
दरम्यान,
पुरुष संघाच्या टी-ट्वेंटी मालिकेतल्या पहिल्या सामन्याला सायंकाळी सहा वाजता सुरुवात
होणार आहे.
****
No comments:
Post a Comment