Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 27 February 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ फेब्रुवारी २०१८ दुपारी १.०० वा.
****
मराठी भाषा गौरवदिनानिमित्त आज विधान भवनाच्या प्रांगणात
झालेल्या कार्यक्रमात ध्वनीक्षेपण यंत्रणेत बिघाड झाल्यानं, मराठी अभिमान गीत पूर्ण
वाजवलं गेलं नाही, तसंच या गीतातून शेवटचं एक कडवं वगळलं गेल्याच्या कारणावरून विधानसभेत
आज विरोधी पक्ष आणि सरकार पक्षात आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. विरोधी पक्षनेते
राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, जयंत पाटील यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त
केली. राज्यशासनाच्या या कृतीमुळे मराठीच्या अस्मितेला धक्का पोहोचल्याचं सांगत, सरकारनं
महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अखेरच्या कडव्याचा
उल्लेख करत, कोणाच्या कार्यकाळात मराठी भाषेच्या स्थितीचं वर्णन त्या कडव्यात करण्यात
आलं आहे, असा प्रश्न विचारला. मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण
देताना, या गाण्याचे गीतकार सुरेश भट यांनी, अभिमान गीतातून शेवटचं कडवं गाळलं असल्याचं
सदनाला सांगितलं.
मात्र त्यानंतरही गदारोळ वाढत गेल्यानं, अध्यक्ष
हरिभाऊ बागडे यांनी सदनाचं कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केलं.
दरम्यान, या मराठी अभिमान गीताचे संगीतकार गायक कौशल
इनामदार यांनीही, विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना, हे अभिमान गीत असल्यामुळे, स्वत:
सुरेश भट यांनी मूळ कवितेतून हे कडवं वगळल्याची माहिती दिली.
****
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज औरंगाबादच्या सरस्वती
भुवन शिक्षण संस्थेच्या वतीनं मराठी भाषा आणि कवितेची परंपरा या विषयावर व्याख्यानाचं
आयोजन करण्यात आलं होतं. साहित्य अकादमीचे क्षेत्रीय सचिव कृष्णा किंबहुने यांनी उपस्थितांना
मार्गदर्शन केलं.
औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकावरही मराठी भाषा गौरव
दिन उत्साहात साजरा झाला. पाच फेब्रुवारीपर्यंत मराठी वाचन सप्ताह साजरा होत असून,
या निमित्तानं या परिसरात सवलतीच्या दरात पुस्तक प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे.
****
****
राज्यातल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी
सेविकांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधन वाढीसह त्यांच्या भाऊबीज भेट रक्कमेतही वाढ करण्याचा
शासन निर्णय जाहीर झाल्याची माहिती महीला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली
आहे. एक ऑक्टोबर २०१७ पासून सेवाज्येष्ठतेनुसार मानधन वाढ देण्याचा निर्णय झाला असून,
भाऊबीज भेट दोन हजार रुपये करण्यात आली आहे. सेविका आणि मदतनीसांच्या सेवा समाप्तीचं
वय येत्या एक एप्रिल २०१८ पासून ६५ वरुन ६० वर्षे करण्याचा निर्णयही झाला असल्याचं
मुंडे यांनी सांगितलं.
****
डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या
पिकाची भरपाई नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातल्या
दीड हजाराहून अधिक शेतकऱ्यांच्या बाराशे हेक्टर वरील शेतपिकाचं नुकसान झालं असून, त्यासाठी
दोन कोटी ३३ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.
****
राज्यात दोन वेगवेगळ्या अपघातात आज नऊ जणांचा मृत्यू
झाला.
सोलापूर तुळजापूर रस्त्यावर दोन चारचाकी गाड्यांची
धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण जागीच ठार झाले. आज पहाटे हा अपघात झाला. औरंगाबाद
इथं झालेल्या इज्तेमामध्ये सहभागी होऊन हे सर्वजण सोलापूर तसंच कर्नाटकात जात होते.
मृतांमध्ये महमूद पाटील या पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
दुसरा अपघात बुलडाणा मलकापूर रस्त्यावर चिंचपूर फाट्याजवळ
झाला. मध्यरात्रीनंतर ट्रक आणि ऑटोची धडक होऊन झालेल्या या अपघातात एका लहान मुलासह
तीन जण जागीच ठार झाले, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
****
धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातल्या विखरण
इथले शेतकरी धर्मा पाटील आणि त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांच्या बॅंक खात्यात प्रत्येकी
सरासरी २४ लाख रुपयेप्रमाणे एकूण ४८ लाख रुपये निधी वीजमहानिर्मिती कंपनीने वर्ग केला
आहे. धर्मा पाटील यांनी भूसंपादनात फळबागेच्या मोबदलाप्रश्नी मंत्रालयात २२ जानेवारीला
विष प्राशन केलं होतं, त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
****
‘प्रीपेड
वॉलेट’ द्वारे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना उद्यापर्यंत के वाय सी
अर्थात ग्राहक ओळखीसंबंधीची औपाचारिकता पूर्ण करावी लागणार आहे. यासंदर्भात
या आधी दिलेली ३१ डिसेंबर २०१७
ची मुदत २८ फेब्रुवारी
२०१८ पर्यंत वाढवण्यात आली होती. त्यामुळे
आता यापुढे मुदतवाढ मिळणार नाही, असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे.
****
देशातल्या तुरूंगांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त असणारी
कैद्यांची संख्या, याकडे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणानं लक्ष घालावं, असे आदेश सर्वोच्च
न्यायालयानं दिले आहेत. सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशातल्या तुरूंगांमध्ये
किती पदं रिकामी आहेत, तसंच महिला कैदी आणि त्यांच्या लहान मुलांचं पुनर्वसन कशा प्रकारे
करता येईल, यासंबधीच्या सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं मागवल्या आहेत. या प्रकरणाची
पुढील सुनावणी २७ मार्च रोजी होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment