आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२८ फेब्रुवारी २०१८
सकाळी ११.००
****
माजी
केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना केंद्रीय अन्वेषण
विभाग - सीबीआयनं अटक केली आहे. आय एन एक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तपासात
सहकार्य न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. ते लंडनहून चेन्नईला परतल्यानंतर विमानतळावरच
त्यांना अटक करण्यात आली असून, पुढच्या चौकशीसाठी दिल्लीत आणण्यात येणार आहे. चिदंबरम
अर्थमंत्री असताना विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळानं मंजुरी दिल्यानंतर आयएनएक्स
मीडिया या कंपनीनं २००७ मध्ये परदेशातून ३०५ कोटी रुपये मिळवले होते, याप्रकरणी १०
लाख रुपयांची लाच घेतल्याचा कार्तीवर आरोप आहे.
****
कांचि कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती
यांचं आज तामिळनाडूमधल्या कांचीपुरम इथं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. ते गेल्या
काही दिवसांपासून आजारी होते. कांची कामकोटी पीठाचे ते ६९वे शंकराचार्य होते.
****
अभिनेत्री
श्रीदेवी यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मुंबईत त्यांच्या निवासस्थानी चाहते तसंच सिनेसृष्टीतल्या
अनेकांनी गर्दी केली आहे. काल रात्री श्रीदेवी यांचं पार्थिव दुबईहून मुंबईत दाखल झालं,
त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
राष्ट्रीय
विज्ञान दिवस आज पाळण्यात येत आहे. भौतिकशास्त्रज्ञ सी व्ही रमण यांनी २८ फेब्रुवारी
१९२८ ला रमण प्रभावच्या सिद्धांताची घोषणा केली होती. विज्ञानाचं महत्व समाजाला पटवून
देण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. या अनुषंगानं आज शैक्षणिक संस्थांमधून विविध
कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या कचरा व्यवस्थापनासंदर्भातल्या
जनहित याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. कचऱ्याची मर्यादित कालावधीकरता साठवण करण्यासाठी
महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांनी संयुक्तपणे मिटमिटा, आडगाव आणि
तीसगाव इथल्या पर्यायी जागांची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. काल या पर्यायी जागांची पाहणी केल्यानंतर हे अधिकारी
आपला अहवाल आज न्यायालयाला सादर करण्याची शक्यता आहे.
*****
***
No comments:
Post a Comment