Friday, 23 February 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 23.02.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 23 February 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ फेब्रुवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

भारत आणि कॅनडानं दहशतवादाविरोधात एकत्रितपणे काम करण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. आज कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्याशी चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कॅनडासोबत शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा इत्यादी क्षेत्रात सहा करार करण्यात आले. दरम्यान, ट्रुडो यांनी आज दिल्लीत राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली.

****

स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मुंबईत वर्षा निवासस्थानी गाडगे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे यांनी, जालना इथं जिल्हा पुरवठा अधिकारी राजीव नंदकर यांनी, बीड इथं निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी, तर परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

****

राज्य शासनानं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या युवकांमध्ये उद्योजकता वाढवण्यासाठी सुरू केलेल्या, छत्रपती राजाराम महाराज अभियानाअंतर्गत, तीन नवीन योजना सुरू केल्या आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या या योजनांचा पात्र इच्छुकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन महामंडळाच्या व्यवस्थापकीसंचालक सुचिता भिकाणे यांनी केलं आहे. वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, तसंच गट प्रकल्प कर्ज योजना अशी या योजनांची नावं आहेत.

****

मराठवाड्यात २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्यानं, वर्तवला आहे. या कालावधीत शेतकऱ्यांनी दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत शेतात जाणं टाळावं, कापणी झालेलं धान्य तसंच दुभती जनावरं सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

नाशिक महापालिकेनं मालमत्ताकरात केलेल्या वाढीच्या निषेधार्थ आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं महापालिका मुख्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. महापालिकेच्या महासभेनं मालमत्ताकराच्या घरगुती दरात ३३ टक्के, व्यावसायिक दरात ६४ टक्के, तर औद्योगिक दरात ८२ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

****

वाशिम जिल्ह्यात मंगळूर पीर इथं एका ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ला स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. जी.टी.शिंदे असं या ग्रामसेवकाचं नाव असून, त्यानं, मृत्यू प्रमाणपत्रासाठी एक हजार रुपये लाच मागितली होती.

****

धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यात आज दोन तोतयांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. साक्री तालुक्यात भोणगाव इथल्या स्वस्त धान्य दुकानदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचं भासवत, हे भामटे पैशाची मागणी करत होते. ग्रामस्थांनी या टोळीतल्या दोघांना पकडलं, मात्र त्यांचा तिसरा साथीदार पसार झाला. या तोतयांची एक गाडीही जप्त करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

धुळे इथं बारावी परीक्षेच्या एका केंद्रचालक तसंच पर्यवेक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. कॉपी प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात सहा परीक्षा केंद्रांचे संचालक देखील बदलण्यात आले आहेत.

****

लातूर इथं मंजूर झालेलं पारपत्र कार्यालय चालू आर्थिक वर्षात मार्च महिन्यात सुरू होणार आहे. खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी ही माहिती दिली.

****

लिंबे जळगाव इथे उद्यापासून आयोजित तीन दिवसीय इज्तेमाच्या तयारीची, पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी पाहणी केली. आयोजन समितीचे अधिकारी, इज्तेमासाठी आलेले धर्मगुरु आणि भाविकांशी लोणीकर यांनी संवाद साधला. सोहळ्यासाठी उभारण्यात आलेल्या सोयीसुविधांचा लोणीकर यांनी आढावा घेतला.

****

जिल्हा एड्समुक्त करण्यासाठी जनजागृतीवर अधिक भर द्यावा. एचआयव्ही - एड्स तपासणी संचासाठी रुग्णालयांना आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण समितीच्या त्रैमासिक बैठकीत ते बोलत होते.

****

No comments: