Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 February 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ फेब्रुवारी २०१८ दुपारी १.०० वा.
****
पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी
सक्तवसूली संचालनालयानं नीरव मोदी समूहाची सुमारे ३० कोटी रुपयांची बँक खाती तसंच तेरा
कोटी शहाऐंशी लाख रुपये मूल्याचे विविध कंपन्यांचे शेअर्स गोठवले आहेत. याशिवाय परदेशी
बनावटीच्या घड्याळांचा संग्रह, १७६ लोखंडी कपाटं, १५८ खोकी तर ६० डबेही जप्त केले असल्याची
माहिती संबंधित अधिकाऱ्यानं दिली आहे.
****
दरम्यान, आपली
देणी फेडण्यासाठी आपल्याकडे पुरेसं भांडवल आणि मालमत्ता असल्याचं, पंजाब नॅशनल बँकेनं स्पष्ट केलं आहे. नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांचं थकीत कर्ज वसूल करण्यासाठी, सर्व कायदेशीर पद्धतींचा वापर
केला असल्याचं बँकेनं म्हटलं
आहे. याविषयी प्रसारित झालेल्या वृत्तांची दखल घेत बँकेनं हा खुलासा केला आहे.
****
भारत दूरसंचार प्राधिकरण - बीएसएनएल
आणि महानगर दूरसंचार प्राधिकरण - एमटीएनएलचं विलिनीकरण होणार नसल्याची माहिती दूरसंचार
मंत्री मनोज सिन्हा यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं, दूरसंचार विभागाच्या प्रादेशिक
विभागांमध्ये समन्वयासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेच्या शुभारंभप्रसंगी, ते वार्ताहरांशी
बोलत होते. या दोन्ही संस्थांच्या बळकटीकरणासाठी ही योजना बनवण्यात आली असल्याचं त्यांनी
सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी कॅनडाचे पंतप्रधान
जस्टिन ट्रुडो आणि त्यांच्या कुटुंबीयांचं नवी दिल्लीत स्वागत केलं. मोदी आणि ट्रुडो
यांच्यात आज शिष्टमंडळ स्तरावर चर्चा होणार असून, दोन्ही देशांदरम्यान अनेक सामंजस्य
करार होण्याची शक्यता आहे. ट्रुडो आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतील,
ट्रुडो कुटुंबीयांचं आज राष्ट्रपती भवनात पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात येईल.
****
सामाजिक भेदभाव, अज्ञान, अंधश्रद्धा
आणि अस्वच्छता यांचं उच्चाटन करण्यासाठी तळमळीनं कार्य करणारे समाजसुधारक राष्ट्रसंत
गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त, आज राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत
आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडगे महाराजांना एका ट्वीटर संदेशाद्वारे
आदरांजली वाहिली आहे. स्वच्छतेतून ग्रामसमृद्धीचा विचार रुजवणारे थोर संत श्री गाडगे
महाराज यांना जयंतीदिनी भावपूर्ण अभिवादन,
असं मुख्यमंत्र्यांनी या संदेशात म्हटलं आहे.
****
राज्यशासनाच्या, नव्यानं सुरू होत असलेल्या ‘अस्मिता’
या योजनेचं बोधचिन्ह, ॲप आणि वेब पोर्टलचा शुभारंभ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते काल मुंबईत झाला. महिलांमध्ये स्वच्छतेसंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी
राज्यसरकार येत्या पाच मार्चपासून ही योजना सुरू करत असून, याद्वारे, जिल्हा परिषद
शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना फक्त पाच रुपयांत आठ सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध
करून दिले जाणार आहेत.
****
मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात आलेल्या ओखी चक्रीवादळानं
प्रभावित झालेल्या राज्यातल्या शेतकरी आणि मच्छीमारांना, सुमारे सहा कोटी रुपयांची
नुकसानभरपाई देण्याची घोषणा राज्यसरकारनं केली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत
पाटील यांनी ही माहिती दिली. नाशिक जिल्ह्यातले दीड हजारहून जास्त शेतकरी आणि कोकणातले
सुमारे साडेसहा हजार मच्छिमार या वादळानं प्रभावित झाले होते. नुकसानभरपाईची रक्कम
लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये थेट जमा करण्याचे निर्देश पाटील यांनी दिले आहेत.
****
कोकणातला पहिला मोनोरेल प्रकल्प सावंतवाडी इथल्या शिल्पग्राम
मध्ये उभारणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी
दिली आहे. एक किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प येत्या मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे.
****
पालघर जिल्ह्यात वसई इथं अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी
गेलेल्या पथकावर दगडफेक प्रकरणी १८ जणांना अटक करण्यात आली आहे. तर संबंधित बांधकाम
व्यावसायिकाची नऊ वाहनं ताब्यात घेण्यात आली आहेत. काल सकाळी वसईच्या वाग्रालपाडा परिसरात
ही दगडफेक झाली होती. या परिसरात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला असून, अनधिकृत
बांधकामांवर पुढच्या आठवड्यात कारवाई केली जाणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात येलकी, इथल्या
भारती मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेत एक कोटी रुपयांहून जास्त रकमेचा अपहार झाल्याचं
वृत्त आहे. या प्रकरणी या संस्थेचा अध्यक्ष आणि संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
//***********//
No comments:
Post a Comment