Thursday, 22 February 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.02.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 22 February 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २ फेब्रुवारी २०१ दुपारी १.०० वा.

****



 मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही राज्यांमध्ये प्रचारसभा घेत आहेत. त्यांनी काही वेळापूर्वी नागालँडमध्ये तुएनसांग इथे प्रचार सभेला संबोधित केलं. या राज्यातले लोक विकास होत नसल्यानं आणि  भ्रष्टाचारामुळे कंटाळले असून, आता स्थिर आणि विकास करणाऱ्या सरकारची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं. न्यू इंडियासोबतच न्यू नागालँडचं स्वप्नही प्रत्यक्षात उतरेल, असं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. मेघालयमधल्या फुलबारी इथेही आज पंतप्रधानांची प्रचार सभा होणार आहे.

****

 पीएनबी घोटाळ्याची चौकशी सरकारला मोकळेपणानं करता आली पाहिजे, अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली आहे. या घोटाळ्याचा तपास करण्यात तपास संस्था अपयशी ठरल्या, तरच न्यायालय त्यात लक्ष घालेल, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दरम्यान, सक्त वसुली संचालनालयानं आज म्युच्युअल फंड्स आणि शेअर्सच्या स्वरूपात असलेली, निरव मोदीची सुमारे आठ कोटी रुपयांची आणि मेहुल चोक्सीची शहाऐंशी कोटी रुपयांची संपत्ती गोठवली आहे. यामुळे नीरव मोदीच्या आजपर्यंत जप्त केलेल्या संपत्तीचं मूल्य साडेचौऱ्याण्णव कोटींवर पोचलं आहे. नीरव मोदीच्या नऊ महागड्या आणि आलिशान गाड्याही सक्त वसुली संचालनालयानं आज जप्त केल्या.

****

 प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या बांधकामासाठीच्या पर्यावरणसंबंधी मंजुरीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर प्रतिसाद द्यावा, अशी नोटिस मुंबई उच्च न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारला बजावली आहे. यासंदर्भात वनशक्ती या सामाजिक संस्थेनं याचिका दाखल केली असून, हे बांधकाम सुरू करण्याआधी तिथल्या पर्यावरणदृष्ट्या  संवेदनशील भागाची काळजी राज्यसरकारनं घेतली नसल्याचं या याचिकेत म्हटलं आहे.

****

 भ्रष्टाचार सूचकांकाच्या २०१७ या वर्षाच्या जागतिक यादीत भारत एकशे ऐंशी देशांमधून एक्क्यांऐंशीव्या स्थानावर  आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलनं ही यादी प्रकाशित केली असून, भ्रष्टाचार आणि माध्यम स्वातंत्र्या संदर्भात, आशिया पॅसिफिक विभागात भारताची गणना कमी दर्जाच्या देशांमध्ये होत असल्याचं म्हटलं आहे. या यादीत न्यूझीलंड आणि डेन्मार्क हे देश सर्वात कमी भ्रष्टाचार असलेले, तर सीरिया, दक्षिण सुदान आणि सोमालिया हे देश सर्वात जास्त भ्रष्टाचारग्रस्त असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

****

 प्रत्येक राज्याच्या जमिनीचा पोत वेगळा असतो आणि प्रत्येक राज्यात घेतली जाणारी पिकंही वेगवेगळी असतात, त्यामुळे प्रत्येक राज्यात कृषी मूल्य आयोग असावा आणि या आयोगाच्या अध्यक्षपदी शेतकरी व्यक्तीच असावी, अशी महत्त्वपूर्ण सूचना राज्याच्या कृषी आयोगाचे प्रमुख पाशा पटेल, यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर एका सादरीकरणातून मांडली. २०२० सालापर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रयत्नांसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या एका राष्ट्रीय परिषदेत हे सादरीकरण  करण्यात आलं. केंद्र सरकारनं दरवर्षी शेतकऱ्यांना किमान दहा मुख्य पिकं ठरवून द्यावीत, अशी सूचनाही पटेल यांनी यावेळी केली.

****

 सौरऊर्जेप्रमाणे कमी खर्चात अणुऊर्जा उपलब्ध व्हावी यासाठी अणुऊर्जेवर सबसिडी द्यावी, अशी संकल्पना अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी मांडली आहे. ते काल मुंबईत पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. अणुऊर्जा कार्बन्-मुक्त आहे, तसंच ती शाश्वत आणि स्वच्छ आहे, त्यामुळे अशी सबसिडी दिली जावी, असं त्यांनी म्हटलं आहे. देशात सध्या सहा हजार सातशे मेगावॅटहून जास्त उत्पादन क्षमतेच्या बावीस अणु वीज भट्ट्या असून, आण्विक वीज पाच रुपये प्रति युनिट दरानं, तर सबसिडी असल्यामुळे सौरऊजा तीन रुपये प्रति युनिट दरानं उपलब्ध आहे.

****

  जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यास आणि अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्क्षम अशा पृथ्वी दोन या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची काल घेतलेली चाचणी यशस्वी झाली आहे. ओडिशामधल्या चांदिपूर इथल्या परिक्षण केंद्रावर काल रात्री ही चाचणी पार पडली. एक टन युद्धसाहित्य वाहून नेण्याची क्षमता असलेलं हे क्षेपणास्त्र साडेतीनशे किलोमीटर्स अंतरापर्यंतच्या लक्ष्यावर अचूक मारा करू शकतं.

****

 मराठवाड्यात येत्या शनिवारी २४ फेब्रुवारीला गारपिटीसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्यानं वर्तवली आहे. या काळात शेतकऱ्यांनी कापलेल्या  तसंच इतर पिकांची योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

 परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथे काल दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित स्त्रीरोग निदान शिबिरामध्ये एक हजारहून जास्त महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी महिलांच्या आरोग्या संदर्भातल्या शासकीय योजनांची माहिती देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

*****

***

No comments: