आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१८ फेब्रुवारी
२०१८ सकाळी ११.००
****
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज सर्वत्र उत्साह
आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी होत आहे. औरंगाबाद इथं क्रांती चौकातल्या छत्रपती
शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यांवर हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
या परिसरात विद्युत रोषणाई, भगवे झेंडे यांसह फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
विविध संघटना तसंच शैक्षणिक संस्थांच्या वतीनं आज पोवाडे गायन कथाकथनासह वेगवेगळ्या
कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तरुणांच्या वाहनफेऱ्यांमुळे वातावरणातल्या उत्साहात
भर पडत आहे.
****
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र
मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना
अभिवादन केलं आहे. शिवाजी हे भारतातल्या प्रमुख लढवय्या राजांपैकी एक होते, त्यांचं
कार्य प्रत्येक भारतीयाला प्रेरणादायी असल्याचं, नायडू यांनी आपल्या ट्वीट संदेशात
म्हटलं आहे.
नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र भवनासह विविध ठिकाणी
आज सकाळी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरता मराठवाडा जनता
विकास परीषदेला आवश्य क
सहकार्य करण्याची ग्वाही पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली
आहे. परिषदेच्या वतीनं आयोजित ‘जालना विकास परिषदेत’ ते काल बोलत होते. मराठवाड्यातल्या
राष्ट्रीय आणि राज्य रस्त्यांसाठी केंद्र सरकारनं प्रथमच ४९ हजार कोटी रुपये निधी दिल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी
दहा हजार रुपये वसतीगृह अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री
सुभाष देशमुख यांनी दिली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं छत्रपती
राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानांतर्गत सोलापूर इथं आयोजित मेळाव्यात
ते काल बोलत होते.
****
केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं पंजाब नॅशनल बँक
घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या मुंबई इथल्या ब्रॅडी हाऊस शाखेला सील ठोकलं आहे. हिरे व्यापारी
नीरव मोदी याच्या कंपनीनं याच शाखेतून ११ हजार ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, सक्तवसुली संचालनालयानं काल नीरव मोदीच्या गीतांजली ब्रँडच्या
कोलकाता इथल्या पाच दुकानांवर छापा घालून शोधमोहीम राबवली.
*****
***
No comments:
Post a Comment