Monday, 26 February 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.02.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 26 February 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २फेब्रुवारी २०१ दुपारी १.०० वा.

****



राज्यपालांच्या अभिभाषणाच्या मराठी अनुवादाची प्रत मिळाली नाही, तसंच अभिभाषणाचा मराठी अनुवादही ऐकू येत नसल्याचं सांगत, विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, सभात्याग केला. मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर हा मराठी भाषेचा अपमान असल्याचं, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना सांगितलं.

 दरम्यान, मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना, मराठी अनुवादक उपस्थित नसल्यानं, हा प्रकार घडला असून, या प्रकाराची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं.

 विधानसभेचं कामकाज सुरू होताच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झाल्या प्रकाराबद्दल सदनाची माफी मागितली. मात्र जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यासह विरोधी पक्षांनी या मुद्यावर नाराजी व्यक्त केली.

 दरम्यान, राज्यपालांच्या अभिभाषणानं राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला. २०१८- १९ या आर्थिक वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प येत्या नऊ मार्चला सादर होईल. या अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेत एकूण सोळा विधेयकांसह, राज्यातल्या सध्याच्या समस्या आणि त्यावरचे उपाय, यासंदर्भात प्रामुख्यानं चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे.

****

 पंजाब नॅशलन बँकेत झालेला आर्थिक घोटाळा, हे बँक प्रशासनाचं अपयश असल्याचं, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज पंतप्रधान श्रम पुरस्कार नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्यानंतर ते बोलत होते. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी व्यवस्थापन यंत्रणेत सुधारणा करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. चांगल्या उत्पादन क्षमतेसाठी संघटीत आणि असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांसाठी एक निरोगी वातावरण निर्माण करण्यावरही उपराष्ट्रपतींनी यावेळी भर दिला. कामगारांना आधुनिक आणि शास्त्रोक्त उपकरणं आणि योग्य प्रशिक्षण द्यावं, असं ते म्हणाले. उपराष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी देशभरतल्या ३३८ कामगारांना पंतप्रधान श्रम पुरस्कार प्रदान करण्यात आले.

****

 पंजाब नॅशनल बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणात नीरव मोदी आणि गितांजली जेम्सचे मालक मेहुल चोकसी यांच्या परदेशातील व्यवहार, व्यवसाय आणि मालमत्ता यांविषयी माहिती मिळवण्यासाठी सक्तवसूली संचालनालय लवकरच डझनभर देशांना कायदेशीर विनंतीपत्र पाठवणार आहे. यामध्ये बेल्जियम, हाँगकाँग, स्वित्झर्लंड, अमेरिका, इंग्लंड, संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर आणि दक्षिण आफ्रिका, आदी देशांचा समावेश आहे. पंजाब नॅशलन बँकेव्यतिरीक्त अन्य १६ बॅकांकडेही नीरव मोदी, चोकसी आणि अन्य सहयोगी उद्योग कंपन्यांच्या व्यवहारांची चौकशी करण्यात येत आहे.

****

 सीमा सुरक्षा दलानं आज जम्मू काश्मीरमध्ये सांभा क्षेत्रात सीमेपलिकडून होणारा घुसखोरीचा प्रयत्न मोडून काढला. पहाटे पाच वाजेच्या सुमारास सीमेवर हालचाल दिसून आल्यानं, सैनिकांनी गोळीबार केला, त्यामुळे संशयित अतिरेकी पसार झाल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

 दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यात आज सकाळी पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत, उखळी तोफगोळ्यांचा मारा तसंच गोळीबार केल्याचं वृत्त आहे.

****

 गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर असल्याचं, गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी म्हटलं आहे. पर्रिकर यांना काल पुन्हा गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पर्रिकर यांची प्रकृती उत्तम असली तरी, त्यांना काही दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचं, राणे यांनी सांगितलं.

****

 माजी केंद्रीय सचिव टी एस आर सुब्रह्मण्यम यांचं आज नवी दिल्लीत निधन झालं, ते एकोणऐंशी वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय प्रशासकीय सेवा क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याची भावना, प्रशासकीय अधिकारी संघटनेनं व्यक्त केली आहे.

****

 प्रख्यात सिने अभिनेत्री श्रीदेवी यांचा पार्थिव देह आज दुपारी दुबईतून विशेष विमानानं मुंबईत आणण्यात येईल. परवा रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं दुबईत त्यांचं निधन झालं, श्रीदेवी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी तसंच सिनेसृष्टीतल्या कलावंतांनी शोक व्यक्त केला आहे.

****

 बल्गेरियात सोफिया इथं सुरू असलेल्या ६९ व्या स्ट्रँड्जा स्मृती मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या विकास कृष्ण आणि अमित पंघाल यांनी सुवर्णपदक पटकावलं. विकास कृष्ण यानं ७५ किलो वजन गटात अमेरिकेच्या ट्रॉय इस्ले याचा तर अमित पंघाल यानं ४९ किलो वजन गटात मोरक्कोच्या सैद मोरदाजी याला पराभुत करून सुवर्ण पदक पटकावलं. एम.सी.मेरिकोम, सीमा पुनिया आणि गौरव सोलंकी यांना मात्र रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेत भारतानं दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि सहा कांस्य पदकासह एकूण अकरा पदकं पटकावली आहेत.

*****

***

No comments: