Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 25 February 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ फेब्रुवारी २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø दिल्लीतल्या हिरे व्यापाऱ्याच्या कंपनी विरोधात ३९०
कोटी रुपये बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल;
Ø हिंदी चित्रपट सृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी
यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं दुबईत निधन
Ø लाखो मुस्लिम भाविकांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय तब्लिगी इज्तेमाला औरंगाबाद इथं सुरुवात
आणि
Ø भारतीय पुरूष आणि महिला क्रिकेट
संघांनी दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या
टी-ट्वेंटी क्रिकेट मालिका जिंकल्या
*****
केंद्रीय तपास विभागानं काल दिल्लीतल्या एका हिरे व्यापाऱ्याच्या कंपनी विरोधात ३९०
कोटी रुपये बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. द्वारकादास शेठ या आंतरराष्ट्रीय
खासगी कंपनीच्या विरोधात, ओरिएंटल बँकेनं सहा महिन्यांपूर्वी केंद्रीय तपास विभागाकडे तक्रार केली होती, कंपनीनं २००७ ते २०१२ या काळात
ओरिएंटल बँकेकडून वेगवेगळ्या माध्यमातून कर्ज घेतलं आहे.
****
पंजाब नॅशनल बँक घोटाळा
प्रकरणी सक्तवसुली संचलनालयानं प्रमुख आरोपी नीरव मोदीच्या ५२३ कोटी रुपये किंमतीच्या
२१ अचल मालमत्तांवर टाच आणली आहे. या मालमत्तांमध्ये नीरव मोदीचं अलिबाग इथलं फार्म
हाऊस, सौर ऊर्जा संयंत्र, अहमदनगर इथली १३५ एकर जमीन, तसंच पुणे आणि मुंबईतल्या कार्यालयांबरोबरच
निवासी मालमत्तांचा समावेश आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून
सुरू असलेल्या या कारवाईत नीरव मोदीच्या पाच हजार कोटी रूपयांपेक्षा
अधिक मालमत्तेवर टाच आणली असून, यामध्ये जडजवाहीर, अलिशान
चारचाकी गाड्या, परदेशी बनावटीची घड्याळं, बँक खाती तसंच विविध कंपन्यांचे भाग आदी
मालमत्तेचा समावेश आहे.
दरम्यान, केंद्रीय तपास विभाग – सीबीआयनं पंजाब नॅशनल बँकेच्या
वरिष्ठ अधिकाऱ्यांची काल चौकशी केली.
दरम्यान,
बँक कर्ज घोटाळ्यांसंदर्भात भारतीय रिझर्व्ह
बँकेमार्फत तपास करून साठ दिवसांत जबाबदारी निश्चित करावी, असं काँग्रेस पक्षानं म्हटलं
आहे. बँकिंग क्षेत्राची विश्वासार्हता कायम राहण्यासाठी, अशा घोटाळ्यांना जबाबदार असलेल्यांवर
गुन्हे दाखल होऊन कारवाई व्हायला हवी, असंही काँग्रेसनं म्हटलं आहे.
****
हिंदी चित्रपट सृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी
यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं दुबईत निधन झालं. त्या ५४ वर्षांच्या होत्या. नातेवाईकाच्या
विवाह समारंभास उपस्थित राहण्यासाठी त्या दुबईला गेल्या होत्या, रात्री साडे अकरा वाजेच्या
सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचं अभिनेते
संजय कपूर यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं. १९६९ साली तामिळ चित्रपट
थुनैवनमधून बालकलाकार म्हणून त्यांनी पदार्पन केलं. दक्षिण भारतीय
चित्रपटांमध्ये बाल कलाकार म्हणून काम करत असलेल्या श्रीदेवी यांचा जुली हा
पहिला हिंदी सिनेमा होता. या चित्रपटापासून हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश केलेल्या
श्रीदेवी यांनी त्यानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांचे सदमा, चांदनी, हिम्मतवाला,
तोफा, नगिना, मि.इंडिया, चालबाज, जुदाई, इंग्लिश-विंग्लिश आदी चित्रपट खूप गाजले. तामिळ,
कन्नड मल्यामळम, तेलगु भाषेतल्या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं होतं. त्यांना
२०१३ मध्ये भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. मॉम हा
त्यांचा शेवटचा चित्रपट होता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ८ मार्चला जागतिक
महिला दिनानिमित्त राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातून राष्ट्रीय पोषण अभियानाची सुरुवात
तसंच बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाचा विस्तार करणार आहेत. महिला आणि बालकल्याण विभागाचे
केंद्रीय सचिव राकेश श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत काल जयपूर इथं झालेल्या बैठकीत ही
माहिती देण्यात आली. यावेळी नारी शक्ती पुरस्कारांचं वितरण केलं जाणार असल्याचं आयोजकांनी
सांगितलं.
दरम्यान, पंतप्रधान आज आकाशवाणीवरच्या मन की बात
या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार
आहेत. या मालिकेचा हा एक्केचाळीसावा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
पंतप्रधान कार्यालय, माहिती अणि
प्रसारण मंत्रालय, डीडी न्यूज यांच्या यू ट्यूबवरच्या वाहिन्यांवरूनही हा कार्यक्रम
प्रसारित होईल. कार्यक्रमाच्या प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमधून या कार्यक्रमाचा
अनुवाद प्रसारित होणार असून, रात्री आठ वाजता या अनुवादाचं पुनःप्रसारण होईल.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
*****
औरंगाबाद नजीक लिंबेजळगाव इथं तब्लिगी
इज्तेमा या राज्यस्तरीय धार्मिक कार्यक्रमाला कालपासून सुरुवात झाली. देशासह राज्यभरातून
लाखो मुस्लिम बांधव यामध्ये सहभागी झाले आहेत. आज दुपारी तीन वाजता या कार्यक्रमात झुहर नमाजानंतर
५ हजार जोडप्यांचे सामुदायिक विवाह लावले जाणार आहेत. उद्या या कार्यक्रमाचा समारोप
होईल. दरम्यान, इज्तेमासाठी येणाऱ्या प्रवाशांची
गर्दी लक्षात घेऊन औरंगाबाद रेल्वे स्थानकावरील
फलाटाचा तिकिट दर १० रुपयांवरुन २० रुपये करण्यात आला आहे. हा दर आजपासून तीन दिवसांसाठी
राहील असं रेल्वेच्या सूत्रांनी सांगितलं.
****
कृषी
राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहनावर काल सोलापूर
जिल्ह्यात कुर्डुवाडीजवळ रिधोर परिसरात दगडफेक झाली. स्वाभिमानी
शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खोत यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवत त्यांच्या
वाहनावर गाजर, तूर, मका फेकून रोष व्यक्त केला. दगडफेक
करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दगडफेकीच्या घटनेनंतर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही
ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयांवर हल्ला करून तोडफोड केल्याचं वृत्त
आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या
वतीनं यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी देण्यात येणारे यशवंतराव चव्हाण
वाङमय आणि नटवर्य लोटू पाटील नाट्यपुरस्कार पुरस्कार काल जाहीर झाले. प्रसिद्ध विचारवंत,
लेखक आणि पत्रकार प्राध्यापक सुरेश द्वादशीवार यांना यशवंतराव चव्हाण वाङमय पुरस्कार
तर अभिनेते - दिग्दर्शक दिलीप घारे आणि रंगकर्मी प्राध्यापक यशवंत देशमुख यांना नटवर्य
लोटू पाटील नाट्य पुरस्कार विभागून देण्यात
येणार आहे. ११ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्कारांचं स्वरुप
असून, येत्या १२ मार्च ला हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
****
भारतीय
पुरूष आणि महिला अशा दोन्ही क्रिकेट संघांनी काल दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी-ट्वेंटी
क्रिकेट सामन्यात विजय मिळवत मालिकाही जिंकल्या.
महिला क्रिकेट संघानं, काल पाचव्या आणि अंतिम टी ट्वेंटी सामन्यात दक्षिण अफ्रिका
संघावर ५४ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत, वीस षटकात चार बाद
१६६ धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेचा संघ अठरा षटकात ११२ धावांवर सर्वबाद झाला. भारताच्या
मिताली राज हीला सामनावीरसह मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं.
पुरुष संघांन प्रथम
फलंदाजी करत वीस षटकांत १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल फलंदाजी करणाऱ्या दक्षिण
अफ्रिकेला भारतानं वीस षटकांत सहा बाद १६५ धावांवर रोखलं. सामनावीर म्हणून सुरेश रैना
तर मालिकावीर म्हणून भारताच्याच भुवनेश्वर कुमारला गौरवण्यात आलं .
****
औरंगाबादच्या
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पहिल्या प्र-कुलगुरुपदी डॉक्टर अशोक
तेजनकर यांची निवड झाली आहे. राज्यपाल कार्यालयानं याबाबतचं नियुक्तीपत्र जारी केलं
आहे.
****
भावनिक
आंदोलनांपेक्षा मराठा समाजातील प्रत्येकानं व्यवस्था बदलणाऱ्या आंदोलनांच्या माध्यमातून
समाज हितासाठी काम करावं, असं आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस
राजेंद्र कोंढरे यांनी केलं आहे. काल, जालना इथं मराठा महासंघाच्यावतीनं आयोजित विभागीय
मराठा प्रतिनिधी परिषदेत ते बोलत होते. बदलत्या परिस्थितीनुसार मराठा तरुणांनी संधी
मिळेल तिथं प्रामाणिकपणे काम करावं, उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून इतरांना रोजगार
मिळवून द्यावा, असं त्यांनी नमूद केलं.
या परिषदेत मराठा समाजानं सामुदायिक विवाह सोहळ्यांचा
पुरस्कार करावा, सामाजिक संपर्क माध्यमांचा वापर सकारात्मक कामासाठी करावा आदी सात
ठराव घेण्यात आले.
****
राष्ट्रीय अस्मितेच्या जागृतीसाठी इतिहासाचा अभ्यास
आवश्यक आहे असे मत जेष्ठ पत्रकार विवेक घळसासी यांनी व्यक्त केलं. लातूर इथं नवनिर्माण
प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित नवनिर्माण व्याख्यानमालेचं स्वातंत्र्यसंग्रामातील उपेक्षित
तारे या विषयावर दुसरं पुष्प गुंफताना ते बोलत होते. इतिहासात रमणे वेगळे, मात्र त्याचा
अभ्यास करणे ही वेगळी बाब असल्याचं ते म्हणाले.
*****
***
No comments:
Post a Comment