Saturday, 24 February 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.02.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४ फेब्रुवारी २०१८ सकाळी ११.००

****

जम्मू काश्मीरमध्ये राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर काल पाकिस्तानी फौजांनी पुन्हा उखळी तोफांचा जोरदार मारा केला. नौशेरा सेक्टर आणि राजौरी जिल्ह्यात संध्याकाळी पाच वाजता आणि बालकोटे सेक्टरमध्ये रात्री आठ वाजता पाकिस्तानी फौजांनी काही भारतीय चौक्या आणि नागरी भागांना लक्ष्य केलं. यावेळी सीमेवर तैनात असलेल्या लष्कराच्या तुकड्यांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार सुरू होता. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.

****

एचआयव्ही – एड्स तपासणी संचासाठी रुग्णालयांना आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण समितीच्या त्रैमासिक बैठकीत ते बोलत होते. औरंगाबाद जिल्हा एड्समुक्त करण्यासाठी जनजागृतीवर अधिक भर द्यावा, असंही ते यावेळी म्हणाले.

****

मराठी आणि तेलगु भाषेतल्या साहित्याची आदान- प्रदान करणारे ज्येष्ठ कवी, लेखक लक्ष्मीनारायण बोल्ली यांचं काल सोलापुरात हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. मराठी काव्य आणि लेखन क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं. तेलगु भाषेतलं उत्तम साहित्य मराठीत आणि मराठी भाषेतलं उत्तम साहित्य तेलगु भाषेत नेण्याचं विशेष कार्य त्यांनी केलं.

****

पालघर इथं पहिलं जिल्हास्तरीय महिला साहित्य संमेलन उद्या होणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषद पालघर जिल्हा मंडळाच्या वतीनं आयोजित हे संमेलन जिल्ह्यातल्या नालासोपारा इथं मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ.स्नेहलता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे . एकूण पाच सत्रात हे साहित्य संमेलन होणार असून यात आजची स्त्री : दशा आणि दिशा या  विषयावर परिसंवाद ,वेगवेगळ्या वाटेवरून चालताना या विषयावर मुलाखत , साहित्य पंचारती या विषयावर चर्चा, आदी उपक्रमांचा समावेश आहे.

****

 भारत आणि दक्षिण आफ्रिका पुरुष आणि महिला संघांदरम्यानचे सुरू असलेले टी ट्वेंटी मालिकेतले अखेरचे सामने आज होणार आहेत. पुरुषांच्या संघात तिसरा सामना रात्री साडे नऊ वाजता, तर महिलांच्या संघात पाचवा टी ट्वेंटी सामना दुपारी साडे चार वाजता सुरू होईल. पुरुष संघ मालिकेत एक एकनं बरोबरीत आहेत, तर भारतीय महिलांचा संघ, मालिकेत दोन एकनं आघाडीवर आहे.

*****

***

No comments: