Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 21 February 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ फेब्रुवारी २०१८ दुपारी १.०० वा.
****
महाराष्ट्र राज्य सरकारप्रमाणे उत्तर
प्रदेश सरकारनंही तीन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट निर्धारित करून, ते साध्य
करण्यासाठी प्रयत्न करावेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज उत्तर
प्रदेशात लखनौ इथं, उत्तर प्रदेश गुंतवणूकदार परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते.
विकासाच्या मुद्यावर राज्याराज्यांमध्ये निकोप स्पर्धा असावी, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी
व्यक्त केली. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह
देशभरातले आघाडीचे उद्योजक या परिषदेत सहभागी झाले आहेत.
****
पंजाब नॅशनल बँकेतला कोट्यवधी रुपयांचा घोटाळा तसंच
रोटोमॅक पेन कंपनी घोटाळ्याच्या मुद्यावरून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा
टप्पा वादळी ठरण्याची चिन्हं आहेत. देशातल्या बँकिंग क्षेत्राच्या सद्यस्थितीबाबत,
समविचारी पक्षांना सोबत घेऊन, सरकारला प्रश्न विचारणार असल्याचं काँग्रेस प्रवक्ते
मनीष तिवारी यांनी म्हटलं आहे. सरकारकडून समाधानकारक उत्तर येत नाही, तोपर्यंत हा प्रश्न
लावून धरण्याचा इशारा तिवारी यांनी दिला. अधिवेशनाचं दुसरं सत्र पाच मार्चपासून सुरू
होत आहे.
****
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयानं अकरा
हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी पंजाब नॅशनल बँकेच्या तीन अधिकाऱ्यांना
तीन मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बँकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेतले बेचू तिवारी,
यशवंत जोशी आणि प्रफुल्ल सावंत या अधिकाऱ्यांना परवा अटक करण्यात आली, दरम्यान, भारतीय
रिजर्व्ह बँकेनं, घोटाळ्यांच्या वाढत्या घटनांमागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी एक समिती
स्थापन केली आहे. बँकांमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्विफ्ट
या तंत्रज्ञानाच्या गैरवापराच्या धोक्याबद्दल ऑगस्ट २०१६ पासून सगळ्या बँकांना सावधगिरीच्या
सूचना दिल्या होत्या, असंही रिजर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.
****
दरम्यान, काल आयकर विभागानं काँग्रेसचे वरिष्ठ नेता
अभिषेक मनु सिंघवी यांच्या पत्नी अनिता सिंघवी यांना दागिने खरेदी प्रकरणी एक नोटीस
जारी केली आहे. सरकारी सूत्रांनुसार, हिरे व्यापारी नीरव मोदीच्या एका कथित शोरूममधून
सहा कोटी रुपयांची दागिने खरेदी केल्याबद्दल त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागण्यात आलं
आहे.
****
सात सरकारी बँकांची तीन हजार सातशे कोटी रुपयांची
फसवणूक केल्याप्रकरणी ताब्यात घेतलेले रोटोमॅक पेन कंपनीचे मालक विक्रम कोठारी यांची
केंद्रीय अन्वेषण विभागानं आज नवी दिल्लीत चौकशी सुरू केली आहे. तसंच, कोठारी कुटुंबाची
पंचवीस कर्जखाती सक्त वसुली संचालनालयानं तर अकरा बचत खाती आयकर विभागानं ताब्यात घेतली
असल्याचं, या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
एकवीस फेब्रुवारी, हा आजचा दिवस युनेस्कोनं ‘आंतरराष्ट्रीय
मातृभाषा दिवस‘ म्हणून जाहीर केलेला आहे. जगभरातील ६००० भाषांपैकी जवळ जवळ ३००० भाषा
नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याच्या पार्श्वभूमीवर, भाषिक विविधता आणि विपुलता ह्यांचं
जतन व्हावं आणि बोलीभाषा संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, हा यामागचा उद्देश
आहे. या दिनाच्या निमित्तानं पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड इथं विविध कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये,कुणबी, आगरी, भंडारी, आदिवासी अशा विविध बोलींभाषांमधून
कलाप्रकारांचं सादरीकरण होत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना भोकरदन मार्गावर भोकरदन कृषी कार्यालयासमोर
ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एक विद्यार्थी ठार झाला, तर अन्य दोन
जण गंभीर जखमी झाले. हे विद्यार्थी आज सकाळी भोकरदन इथं बारावीची परीक्षा देण्यासाठी
जात असताना, हा अपघात घडला. जखमी विद्यार्थ्यांवर औरंगाबाद इथं उपचार सुरु आहेत.
****
वाशिम जिल्हा कृषी महोत्सवाला आजपासून सुरुवात होत
आहे. या महोत्सवात शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री करता येण्याची
सुविधा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा - आत्मा- च्या वतीनं उपलब्ध करून देण्यात
आली आहे. यासह या प्रदर्शनात कृषी प्रदर्शन,पशु प्रदर्शन,शेतकरी प्रशिक्षण, सेंद्रीय
शेतमाल विक्री या उपक्रमांचाही समावेश आहे. सुंदर वाटिका इथल्या काटा कोंडाळा चौकात
हा महोत्सव होत आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघादरम्यान
चौथा टी-ट्वेंटी क्रिकेट सामना आज खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे
चार वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
*****
***
No comments:
Post a Comment