Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 21 February 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ फेब्रुवारी २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेमध्ये एकूण चार हजार १०६ सामंजस्य करार; बारा
लाख, दहा हजार ४६४ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार
Ø मराठवाड्यात लातूरला
रेल्वे डबे निर्मितीचा कारखाना तर औरंगाबादच्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीत कोरियन कंपनी
साडेबाराशे कोटी रूपयांची गुंतवणूक करणार
Ø बारावीच्या परीक्षेला
आजपासून सुरुवात
आणि
Ø डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव ईश्वर मंझा आणि परभणीचे उपजिल्हाधिकारी सुदर्शन
गायकवाडला लाच घेतल्या प्रकरणी अटक
*****
मॅग्नेटिक महाराष्ट्र या जागतिक गुंतवणूक परिषदेमध्ये एकूण चार हजार १०६ सामंजस्य
करार झाले असून त्यातून राज्यात बारा लाख, दहा हजार ४६४ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार
आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबई इथं आयोजित या परिषदेचा
समारोप काल झाला. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल, राज्याचे
उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, मुख्य सचिव सुमित
मल्लिक, उद्योग विभाग अपर मुख्य सचिव सुनील
पोरवाल यांसह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. मराठवाड्यातही मोठ्या प्रमाणावर गुंतवूणक
होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, या परिषदेत रेल्वेसोबत झालेल्या ६०० कोटी रुपयांच्या सामंजस्य
करारामुळं लातूर इथं साडेतीनशे एकर जागेवर रेल्वे डबे निर्मिती कारखाना पहिल्या
टप्प्यात सुरू होणार आहे. यामुळे या भागात पंधरा
हजार जणांना थेट रोजगार मिळेल तर त्याच्या तिप्पट अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती
होईल. औरंगाबाद नजिक शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये दक्षिण कोरियाची ह्युसंग कंपनी साडेबाराशे
कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. नांदेड इथं इंडिया ॲग्रो अनाज लिमिटेड कंपनी दोनशे
कोटी रुपये तर, शिऊर ॲग्रो लिमिटेड कंपनी हिंगोली इथं सव्वाशे कोटी रुपयांची औद्योगिक
गुंतवणूक करणार आहे.
****
गारपिटीमुळं नुकसान झालेल्या द्राक्ष उत्पादकांसह शेडनेटमध्ये पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष पॅकेज
अंतर्गत भरपाई देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं केली जाईल, असं
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. जालना तालुक्यातल्या वंजार उम्रद इथल्या नुकसानग्रस्त
द्राक्ष बागांची खोत यांनी काल पाहणी केली त्या वेळी ते बोलत होते. मृत शेतकरी नामदेव
शिंदे यांच्या कुटुंबीयांची खोत यांनी भेट घेवून सांत्वन केलं. बहुतांश द्राक्ष बागायतदार
शेतकऱ्यांनी पीकविमा काढलेला नसल्यामुळं त्यांना अधिकाधिक मदत देण्यासाठी पाठपुरावा
केला जाईल, असं आश्वासन खोत यांनी यावेळी दिलं. गारपिटीमुळं जिल्ह्यातल्या ३७ हजार
हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून, पन्नास टक्के पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती
त्यांनी दिली.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण
महामंडळाच्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. औरंगाबाद, लातूरसह राज्यातील
नऊ विभागिय मंडळांतर्गत ही परीक्षा होत आहे. राज्यातल्या दोन हजार ८२२
परीक्षा केंद्रांमधून १४ लाख ८५ हजार
१३२ विद्यार्थी या परिक्षेसाठी बसले आहेत.
****
शेतकरी आत्महत्या आणि शेतमाल हमी भावाबाबत सरकार
असंवेदनशील झालं असल्याची टीका करत, शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीनं पुन्हा आंदोलनाचा
इशारा दिला आहे. काल नंदुरबार इथं, सुकाणू समितीच्या आढावा बैठकीनंतर, संघटनेचे नेते
रघुनाथ दादा पाटील यांनी आंदोलनाची दिशा जाहीर केली. २३ मार्च या हुतात्मा दिनापासून
राज्यभर शेतकरी जागर यात्रा काढली जाणार असून ३० एप्रिलला राज्यभरात २५ लाखांहून अधिक
शेतकरी जेलभरो आंदोलन करणार आहेत. या नंतरही सरकारला जाग आली नाही तर, एक जूनपासून
पुन्हा शेतकरी संप पुकारला जाणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला. आज २१ फेब्रुवारी
रोजी जळगाव इथं सुकाणू समितीच्या सदस्यांची आढावा बैठक होणार आहे.
****
शेतकऱ्यांची क्षमता बांधणी करणारा
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प उपयुक्त असून या योजनेमुळं गावांचा कायापालट होईल,
असं मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी येथे व्यक्त केलं. कृषी विभागाच्यावतीनं
औरंगाबाद इथं आयोजित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी
ते काल बोलत होते. निसर्गाच्या अनियमतेमुळं शेतीवर होणारे दुष्परिणाम आणि त्यातून शेतकऱ्यांचं
होणारं नुकसान थांबवण्यासाठी राज्य शासनानं ही योजना सुरु केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
जालना जिल्ह्यातल्या वाटूर इथंही या प्रकल्पांतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत बोलतांना जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी, शेतकऱ्यांचं
जीवनमान उंचावण्यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प संजीवनी ठरेल, असा विश्वास
व्यक्त केला.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
*****
औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात विद्युत
देयकांची ३७८ कोटी रूपये थकबाकी असून जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी आणि मंठा तालुक्यातल्या
१५ गावांची वीज जोडणी खंडीत करण्यात आली असल्याची माहिती मुख्य अभियंता सुरेश गणेशकर
यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना दिली. अजिंठा तसंच वेरुळ लेण्यांची नोव्हेंबर
महिन्यापासून विद्युत देयकाची ९६ लाख रुपये थकबाकी असल्यानं, वीज पुरवठा खंडीत केल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे
उपकुलसचिव ईश्वर मंझा यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. औरंगाबाद पोलिस आयुक्त
कार्यालयांतर्गत आर्थिक गुन्हे शाखेनं काल सकाळी ही कारवाई केली. मंझा यांनी, नोकरी
लावून देण्याचं आमिष दाखवून तक्रारदाराकडून लाच घेतली होती, या रकमेचा धनादेश मंझा
यांनी संबंधिताला परत केला, मात्र तो वटला नाही, त्यानंतर हे प्रकरण समोर आलं. या संदर्भात
आर्थिक गुन्हे शाखेकडे आणखी काही तक्रारी आल्या असून, अशी आणखी काही प्रकरणं असण्याची
शक्यता सहायक पोलिस निरीक्षक अमोल सातोदकर यांनी व्यक्त केली. मंझा यांना काल न्यायालयासमोर
हजर केलं असता, त्यांना येत्या २४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
परभणीचे उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाडला काल एक
लाख रुपये लाच स्विकारताना लाचलुचपत विभागानं अटक केली. पाझर तलावामध्ये जमिन गेलेल्या
प्रकल्पग्रस्ताचा अहवाल पाठवण्यासाठी गायकवाडनं लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी
शहरातल्या नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
****
वेतन पडताळणी करून घेतल्याचे बक्षीस म्हणून शिपायाकडून
दीड हजार रूपयांची लाच घेताना औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या कालीमठ इथल्या
स्वामी प्रणवानंद सरस्वती हायस्कूलचे मुख्याध्यापक कैलास आमले याला अटक करण्यात आली
आहे. शिपायाची सेवापुस्तिका वेतन पथकाकडे पाठवून वेतन पडताळणी करून घेतल्यानंतर बक्षीस
म्हणून त्यानं लाच मागितली होती.
****
येत्या २४ फेब्रुवारीपासून औरंगाबाद इथं येणाऱ्या
राज्यस्तरीय इज्तेमाला जाण्याऱ्या भाविकांसाठी
सोलापूर रेल्वे विभागाकडून विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. गुलबर्गा
स्थानकातून येत्या शुक्रवारी दुपारी १ वाजता ही रेल्वे सुटेल. सोलापूर दौंड, मनमाड
मार्गे ती औरंगाबादला येईल. तीन दिवसांच्या इज्तेमानंतर २६ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद
रेल्वेस्थानकावरुन रात्री ९ वाजता ती परतीच्या प्रवासासाठी सुटेल.
****
बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणाऱ्या एका टोळीला
कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं काल अटक केली आहे. विश्वास कोळी आणि जमीर
अब्दुल कादर पटेल, अशी या दोघांची नावं असून, या दोघांकडून दोन हजार रूपयांच्या ७५,
दोनशे रूपयांच्या १७७, आणि शंभर रूपयांच्या ६३८ अशा, एकूण दोन लाख ४९ हजार रूपये दर्शनी
मूल्याच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. नोटा छपाईसाठी वापरलं जाणारं साहित्यही
जप्त करण्यात आलं आहे.
****
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी कालपासून बीड जिल्ह्यातल्या
अंबाजोगाई इथं धरणे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. अंबाजोगाईच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर
पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून
केल्या जात असलेल्या या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी, येत्या २६ तारखेपासून
सुरू होत असलेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन
पुकारण्यात आलं आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघादरम्यान
चौथा टी-ट्वेंटी क्रिकेट सामना आज खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे
चार वाजता या सामन्याला सुरुवात होईल. पुरुष क्रिकेट संघादरम्यानही दुसरा टी-ट्वेंटी क्रिकेट सामनाही आज सेंच्यूरियन इथं होणार आहे.
रात्री साडे नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल.
*****
***
No comments:
Post a Comment