Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 22 February 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ फेब्रुवारी २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø जात, धर्म आणि
भाषा यामुळे समाजात निर्माण होणारी तेढ ही चिंतेची बाब- शरद पवार
Ø कर्मचाऱ्यांच्या
भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात कपात
Ø मराठवाडा वॉटर
ग्रीड योजना राबवण्यासाठी, इस्त्रायलच्या कंपनीशी सामंजस्य करार
आणि
Ø बारावीच्या परीक्षेला
सुरुवात; सोलापूर जिल्ह्यात प्रश्नपत्रिका फुटली
*****
जात, धर्म आणि भाषा यामुळे समाजात निर्माण होणारी
तेढ ही चिंतेची बाब असल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी
व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पुण्यात
शोध मराठी मनाचा या कार्यक्रमात पवार यांची प्रकट मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
तुमच्यासमोरील चिंतेची सर्वात मोठी बाब कोणती असा प्रश्न विचारला असता, राज्याचं सामाजिक
ऐक्य असं पवार यावेळी म्हणाले. जातीय वादामुळे राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे,
फुले शाहू आंबेडकर यांचे विचारच राज्याला एकसंध ठेवू शकतील असा विश्वास पवार यांनी
व्यक्त केला. ठाकरे यांनी विचारलेल्या विविध सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातल्या
प्रश्नांना पवार यांनी दिलखुलास उत्तरं दिली.
****
राज्य सरकारनं भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन
महासंघ- नाफेडकडून हरभरा खरेदीसाठी येत्या दोन ते तीन दिवसात अनुमती देण्याचं आश्वासन,
केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दिलं आहे. परवानगी मिळाल्यानंतर
लगेचच खरेदी सुरु होईल, असं त्यांनी सांगितलं.
कृषीमाल दर पॅनेलचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी ही माहिती दिली आहे.
देशातल्या हरभऱ्याची निर्यात व्हावी, यासाठी आंतरराष्ट्रीय
पातळीवरच्या दरांनुसार स्पर्धा निर्माण करण्याच्या उद्देशानं, निर्यातीवर विशेष प्रोत्साहन
निधी देण्याचा सरकारचा विचार आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची भेट
घेऊन या प्रोत्साहन निधीबाबत चर्चा करण्याचं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलं
आहे.
****
केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह
निधीच्या व्याजदरात पुन्हा एकदा कपात केली आहे. सलग तिसऱ्यांदा कपात करताना सरकारनं
हा व्याजदर आता ८ पूर्णांक ६५ टक्क्यां वरून ८ पूर्णांक ५५ टक्क्यांवर आणला आहे. केंद्रीय
कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी काल नवी दिल्लीत याबाबत वार्ताहरांना माहिती दिली.
****
मराठवाड्याची पाण्याच्या टंचाईतून कायमस्वरूपी मुक्तता
करण्यासाठी, गावं, आणि शहरांना पाणीपुरवठा
करणारी, वॉटर ग्रीड योजना राबवण्यासाठी, महाराष्ट्र शासन, आणि इस्त्रायल सरकार अंगीकृत कंपनी यांच्यामध्ये काल
सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. पाणी पुवठामंत्री बबनराव लोणीकर, तसंच, पाणी
पुरवठा, आणि स्वच्छता राज्यमंत्री, सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.
मेकोरोट, ही
इस्त्रायल कंपनी, मराठवाड्यातले उपलब्ध पाणी साठे, पर्जन्य वृष्टी, भुस्तर रचना,
भुजलाची पातळी, वाहून जाणारं पाणी, उपलब्ध पाणी याचा समग्र अभ्यास करून, शाश्वत पाणी
पुरवठा करण्याचा आराखडा तयार करून, त्याबाबतचा प्राथमिक संकल्प अहवाल सादर करणार आहे.
ग्रीड मध्ये मराठवाड्यातली सर्वच धरणं, जोडण्यात येतील, असं लोणीकर यांनी सांगितलं
आहे..
****
‘मॅग्नेटिक महाराष्ट्र जागतिक परिषद’ही आगामी निवडणुकांवर
लक्ष ठेऊन आयोजित केली होती, अशी टीका, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष,
अशोक चव्हाण यांनी केली आहे. या परिषदेवर झालेल्या खर्चाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात श्वेत पत्रिका
काढावी, अशी मागणी त्यांनी केली. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्य
सरकार केवळ घोषणा करतं, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करत नाही, अशी टीका ही त्यांनी
यावेळी बोलताना केली.
****
मराठवाड्यात येत्या शनिवारी २४ फेब्रुवारीला गारपिटीसह
अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्यानं वर्तवली आहे. या काळात शेतकऱ्यांनी
कापलेल्या पिकांची तसंच इतर पिकांची योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं
आहे.
****
बीड जिल्ह्याचं विभाजन करतांना परळी वैजीनाथ तालुका
हा स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनं
करण्यात आली आहे. परळी इथलं वीज निर्मिती केंद्र, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं
तीर्थक्षेत्र यासह जिल्ह्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा या ठिकाणी आहेत असं पक्षाच्यावतीनं
तहसिलदारांकडे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं
आहे.
****
विविध शासकीय कार्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीनं
काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित न करण्याचा शासनानं नुकताच दिलेला आदेश रद्द
करावा, अशी मागणी औरंगाबाद आणि जालन्याच्या शासकीय कंत्राटी कर्मचारी समन्वय समितींनी
केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचं
योगदान लक्षात घेत, हा आदेश रद्द करावा, अशा मागणीचं निवेदन या समितीनं जिल्हाधिकाऱ्यांना
सादर केलं आहे.
लातूर इथंही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याच मागणीसाठी
धरणं आंदोलन करण्यात आलं.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
*****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
शिक्षण महामंडळाच्या बारावीच्या परीक्षेला कालपासून सुरुवात झाली. काल पहिल्याच दिवशी
परीक्षा सुरू झाल्यावर तासाभरातच, प्रश्नपत्रिका फुटण्याची घटना घडली. सोलापूर जिल्ह्यातल्या
भातंबरे गावातल्या तांबेवाडी तांडा इथल्या वसंत कनिष्ठ महाविद्यालयातून ही प्रश्नपत्रिका
व्हॉट्सअॅपवरून फिरल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे सायबर कायद्याअंर्गत दोषींविरुद्ध
गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी सांगितलं. राज्याच्या अनेक परीक्षा केंद्रांवर नकलाचे
प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित परीक्षार्थ्यांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यात भोकरदन इथं काल सकाळी ट्रक
आणि दुचाकीच्या अपघातात बारावीची परीक्षा देण्यासाठी जात असताना, दोन विद्यार्थ्यांचा
मृत्यू झाला, तर एक विद्यार्थी जखमी झाला आहे. भोकरदन कृषी कार्यालयासमोर ट्रकनं दुचाकीला
धडक दिल्यानं हा अपघात घडला.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचा
उपकुलसचिव, ईश्वर मंझा याच्या विरुद्ध नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी,
आणखी दोन जणांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे काल तक्रारी दाखल केल्या. मंझा याला मंगळवारी
आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. दरम्यान, मंझा याच्या ईटखेडा आणि सातारा परिसरातल्या
दोन घरांची झडती घेऊन पोलिसांनी काही महत्वपूर्ण कागदपत्र जप्त केली आहेत.
****
सेंच्युरीयन इथं खेळल्या गेलेल्या, दुसऱ्या टी
-२० क्रिकेट सामन्यात काल दक्षिण आफ्रिकेनं भारताचा सहा गडी राखून पराभव केला. भारतीय
संघानं प्रथम फलंदाजी करत विजयासाठी १८९ धावांचं आव्हान यजमान संघा समोर ठेवलं होतं.
आतापर्यंत झालेल्या सामन्यांपैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे.
दुसरीकडे महिला संघाचा चौथा टी-२० सामना पावसामुळे
काल रद्द करण्यात आला.
****
तुळजापूर नगर पालिकेच्या उपाध्यक्षपदी चंद्रकांत
काणे यांची काल बिनविरोध निवड झाली. या पदासाठी काणे यांचा एकमेव अर्ज आला होता.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथल्या दीपस्तंभ प्रतिष्ठाणच्यावतीनं
काल घेण्यात आलेल्या मोफत स्त्रीरोग तपासणी शिबिरात एक हजार १५३ महिलांची आरोग्य तपासणी
करण्यात आली.
****
परभणी जिल्ह्यातल्या ७३ ग्रामपंचायतीमधल्या ९९ रिक्त
पदांसाठी येत्या २५ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक होणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी मतमोजणी
होणार आहे.
****
जिलेटीन कांड्या विक्री प्रकरणात मुंबई पोलिसांनी
काल जालना इथून तीन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. या तिघांनी काही दिवसांपूर्वी डोंबिवली
भागात जिलेटीनच्या दोनशे कांड्या विकल्या होत्या. याप्रकरणी डोंबिवली पोलिस ठाण्यात
गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल झाला होता. चौकशीअंती या प्रकरणात जालन्याच्या तीन तरुणांचा
सहभाग स्पष्ट झाल्यानं, पोलिसांनी ही कारवाई केली.
****
मराठवाड्याच्या
पाणी प्रश्नांसदर्भात मराठवाडा अनुशेष निर्मुलन आणि विकास मंचच्या वतीनं समाजातल्या
विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असल्याचं मंचचे संस्थापक
अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील यांनी काल औरंगाबादमध्ये वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
औरंगाबाद इथल्या एमजीएम संस्थेच्या आईन स्टाईन सभागृहात येत्या रविवारी २५ तारखेला
सकाळी ११ वाजता या बैठकीचं अयोजन करण्यात आलं.
*****
***
No comments:
Post a Comment