आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२२ फेब्रुवारी २०१८ सकाळी
११.००
****
भ्रष्टाचाराच्या तक्रारी संबंधित विभागाकडे पाठवण्याच्या लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाच्या प्रथेबाबत मुंबई उच्च न्यायालयानं प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबतच्या
एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान, संबंधित विभागानं तक्रारीची सखोल चौकशी करावी,
मात्र, गुन्हा झाला किंवा नाही, याचा निर्णय न्यायालयानं घेतला पाहिजे, असं मत काल
न्यायालयानं नोंदवलं.
****
पीएनबी घोटाळा प्रकरणात
विपुल अंबानी आणि अन्य पाच जणांना मुंबईच्या
एका विशेष न्यायालयानं येत्या पाच मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. विपुल
अंबानी हे नीरव मोदीच्या फायरस्टार इंटरनॅशनल या कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी आहेत.
दरम्यान, सक्त वसुली संचालनालयानं नीरव मोदी आणि
त्याच्या कंपन्यांच्या नउु लक्झरी कार्स जप्त केल्या आहेत.
****
रेल्वे भरती परिक्षेसाठी
उमेदवारांना भाषेचं कोणतंही बंधन नाही, असं केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी
काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. उमेदवार उत्तरं लिहिण्यासाठी
आपल्या पसंतीच्या भाषेचा उपयोग करू शकतो, असं गोयल यांनी सांगितलं.
****
भारतीय वायुसेनेतल्या
फ्लाईंग ऑफिसर अवनि चतुर्वेदी, लढाऊ विमान एकटीनं चालवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. त्यांनी गेल्या
सोमवारी मिग ट्वेंटी वन हे लढाऊ विमान एकटीनं चालवल्यानंतर हा मान मिळवला आहे. भारतीय
वायुदलाच्या लढाऊ विमानांच्या पथकात २०१६ साली नियुक्ती झालेल्या पहिल्या महिला तुकडीतल्या
त्या एक आहेत.
****
पाकिस्ताननं आज सकाळी
पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असून, जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या
ऊरी सेक्टरमध्ये गोळीबार सुरू केला आहे. भारतीय सेना चोख प्रत्युत्तर देत आहे. दुसरीकडे
उत्तर काश्मीरच्या बांदिपुरा जिल्ह्यातल्या हाजिम भागात केंद्रीय राखीव पोलिस दल, सैन्य
दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या विशेष पथकानं एक शोधमोहीम सुरू केली आहे. गुप्तचर
यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर या परिसराला वेढा घालण्यात आला असून, त्यात तीन
अतिरेकी अडकले असल्याचं तसंच दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याचं वृत्त आहे.
*****
***
No comments:
Post a Comment