Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 24 February 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ फेब्रुवारी २०१८ दुपारी १.०० वा.
****
सार्वजनिक
पैशाची अफरातफर कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नसून सरकार आर्थिक अनियमिततेविरोधातली
कारवाई सुरूच ठेवणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सार्वजनिक पैशाची अवैध साठवणूक ही कोणत्याही परिस्थिती
स्वीकारली जाणार नसून तो नव्या अर्थव्यवस्थेचा नियमच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
पंजाब नॅशनल बॅंकेतल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली
आहे. यावेळी आर्थिक संस्थांच्या व्यवस्थापनाला आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या
संस्थांना त्यांनी आपलं काम चोखपणे बजावण्याचे निर्देश दिले. ‘सबका साथ, सबका विकास’
हे आपल्या सरकारचं उद्दिष्ट असून सरकार गरिबांना बळकट करण्यासाठी काम करत असल्याचंही
त्यांनी सांगितलं. वस्तू आणि सेवा करामुळे महसूलामध्ये वाढ झाली असल्याचंही त्यांनी
सांगितलं. तसंच अर्थव्यवस्थेमध्ये सकारात्मक बदलाचे स्पष्ट संकेत मिळत असल्याचंही त्यांनी
यावेळी नमूद केलं.
*****
पक्षकारांच्या
आशा जिवंत ठेवण्यासाठी आणि जलद न्याय मिळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी उच्च न्यायालयांमध्ये
रिक्त असलेल्या न्यायधिशांच्या जागा त्वरित भराव्यात, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं
आहे. या प्रक्रियेत उच्च न्यायालयातल्या मुख्य न्यायमूर्तींनी नावे पुढे पाठवण्यापासून
ते सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलिजियमकडून मान्यता, प्रशासकीय मान्यता या सर्व बाबींमुळे
ही सर्व प्रक्रिया अडखळून पडली आहे. एक वर्षापेक्षा जास्त उशीर झाल्यास उच्च न्यायालयात
बढतीसाठी पात्र असलेल्या कनिष्ठ न्यायव्यवस्थेतल्या न्यायाधिकाऱ्यांवर याचा वाईट परिणाम
होत असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं
वरील निरीक्षण नोंदवलं आहे.
*****
भारतीय रिझर्व्ह
बॅंकेनं बँकींग व्यवसायात नसलेल्या आर्थिक कंपन्यांसाठी लोकपाल योजना सुरू केली आहे.
या संस्थाविरोधात काही तक्रारी असल्यास त्यांचं निराकरण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात
आली आहे. या योजनेत अशा आर्थिक कंपन्यांविरोधात त्यांच्या सेवांबाबत काही तक्रार असल्यास
त्यांचं मोफत आणि जलदगतीनं निराकरण करण्यात येईल, असं आर बी आयनं याबाबत जारी केलेल्या
प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. ज्या आर्थिक कंपन्यांचा व्यवहार १०० कोटी रुपये आहेत
त्या कंपन्यांना ही योजना लागू राहणार आहे.
*****
केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सी बी आयनं
दिल्लीतल्या एका हिरे व्यापा-याविरोधात ३९० कोटी रुपये बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी
गुन्हा दाखल केला आहे. द्वारकादास शेठ आंतरराष्ट्रीय खासगी मर्यादित असं या
कंपनीचं नाव आहे. ओरियंटल बँकेनं सहा महिन्यांपूर्वी सी बी आय कडे या कंपनीची
तक्रार दिल्यानंतर सी बी आयनं या कंपनीच्या सर्वा संचालकांविरोधात गुन्हे दाखल
केले आहेत. कंपनीनं २००७ ते २०१२ दरम्यानच्या काळात या बँकेकडून वेगवेग़ळ्या
माध्यमातून कर्ज घेतलेले आहे.
*******
बायोमेट्रिक शिधापत्रिका
असलेल्या लाभधारकांनाच येत्या १ मार्च पासून स्वस्त धान्य दुकानांमधून शिधावाटप होणार
आहे. आधार ओळखपत्र संलग्न न केलेल्या लाभधारकांना स्वस्त धान्य मिळणार नाही, असंही
उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. संलग्नीकरण न झालेल्यांनाही स्वस्त धान्य वाटप व्हावं,
अशी राज्यसरकारनं दाखल केलेली जनहित याचिका निकाली काढत उच्च न्यायालयानं काल हे आदेश
दिले.
****
पुण्यातले बांधकाम व्यावसायिक
डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना येत्या १ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत
ठेवण्याचे आदेश पुणे इथल्या विशेष न्यायालयानं दिले आहेत. डी एस के यांची प्रकृती बिघडल्यानं
अटकेनंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयाचा अहवाल
आल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं, त्यावेळी काल न्यायालयानं हे आदेश दिले.
गुंतवणूकदारांना वेळेवर परतावा परत न केल्यामुळे डी एस कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हे
दाखल झालेले आहेत.
****
बल्गेरियामध्ये सोफीया
इथं सुरू असलेल्या स्ट्रँड्जास्मृती मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताची मेरी कोम अंतिम फेरीत
दाखल झाली आहे. महिलांच्या ४८ किलो वजनी गटात खेळणाऱ्या मेरी कोमनं चीनच्या ये ज्याली
हिला पराभुत करत अंतिम फेरी गाठली.
****
मध्य महाराष्ट्रासह
विदर्भ आणि मराठवाड्यात आज पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला
आहे. लक्षद्वीप परिसरामध्ये निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र कर्नाटकसह कोकणच्या
दक्षिण भागात दाखल झाल्यानं पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment