Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 25 February 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ फेब्रुवारी २०१८ दुपारी १.०० वा.
****
आरोग्य, कृषी, आपत्ती व्यवस्थापन, दिव्यांग विकास आदी क्षेत्रात
कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्याबाबत शास्त्रज्ञांनी विचार करावा, असं आवाहन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज मन की बात या आकाशवाणीच्या कार्यक्रम मालिकेच्या
४१ व्या भागात बोलत होते. अहमदाबाद इथं झालेल्या आय क्रिएट या संमेलनात, एका युवकानं
कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर करून, मूक व्यक्तीचं लिहीणं, बोलण्यात रूपांतरित
केल्याच्या प्रयोगाचा उल्लेख करत, पंतप्रधानांनी, अशा प्रकारे विविध क्षेत्रात विज्ञानाचा
वापर, मानवी जीवनाची प्रत सुधारत, सर्वोच्च उंची गाठण्यासाठी करावा, असं आवाहन केलं. येत्या अठ्ठावीस
तारखेला साजरा होत असलेल्या विज्ञान दिनाच्या अनुषंगानं त्यांनी भारतरत्न सी व्ही रमण,
हरगोविंद खुराना, जगदीशचंद्र बोस, सत्येंद्रनाथ बोस इत्यादी शास्त्रज्ञांच्या कार्याचं
स्मरण केलं.
स्वातंत्र्याच्या सत्तर
वर्षांनंतर मुंबईपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या घारापुरी लेण्यांच्या बेटावर
वीज पोहोचल्याबद्दल पंतप्रधानांनी त्या भागातल्या नागरिकांचं अभिनंदन केलं.
दरवर्षी चार मार्चला
साजरा होणाऱ्या, भारतीय राष्ट्रीय सुरक्षा दिनासंदर्भात मार्गदर्शन करताना, दैनंदिन
जीवनातच सुरक्षिततेबाबत अत्यंत सतर्क राहिलं, तर मानवी चुकांमुळे होणाऱ्या दुर्घटना
टळून सुरक्षिततेची प्रत वाढेल, असं पंतप्रधानांनी म्हटलं. नैसर्गिक आपत्तीसंदर्भात
योग्य प्रशिक्षण आणि दक्षता, यांची भूमिका महत्त्वाची ठरते, असं सांगतानाच त्यांनी,
स्थानिक स्वराज्य संस्थांनी शालेय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचं अभिरूप प्रशिक्षण
द्यायला हवं, असं नमूद केलं.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत
सुरू करण्यात आलेल्या गोबर धन, या योजनेबद्दल सांगताना, ग्रामीण भागातल्या लोकांनी
शेतीतला कचरा आणि शेण याकडे टाकाऊ वस्तू म्हणून नव्हे तर उत्पन्नाचे मार्ग म्हणून पहावे,
असं पंतप्रधानांनी सांगितलं. आठ मार्चला येणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाबद्दल बोलताना
पंतप्रधानांनी, देशाच्या, मातेवरून पुत्राला ओळखण्याच्या परंपरेचा उल्लेख करत, सबल आणि
देशाच्या विकासात समान भागीदार महिला, हेच नव भारताचं स्वप्न असल्याचं नमूद केलं. पंतप्रधानांनी
जनतेला येत्या होळीच्या सणाच्या शुभेच्छाही दिल्या.
****
उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू आज वर्धा इथं सेवाग्राम आश्रमाला भेट
देत आहेत. सेवाग्राम मधल्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेत आयोजित एका कार्यक्रमामध्ये
ते यंदाचा ‘आंतरराष्ट्रीय गांधी कुष्ठ निर्मूलन पुरस्कार‘ डॉक्टर एम.डी.गुप्ते आणि
डॉक्टर अतुल शाह यांना प्रदान करणार आहेत. गांधी कुष्ठ निर्मूलन फाऊंडेशनचा हा पुरस्कार
कुष्ठरोग्यांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती तसंच संस्थांना देण्यात येतो.
****
कोट्यवधी रुपयांचं बँक कर्ज बुडवल्याप्रकरणी
अटकेत असलेला रोटोमॅक पेन कंपनीचा मालक विक्रम कोठारी आणि त्याचा मुलगा राहुल, याला
लखनौच्या एका विशेष न्यायालयानं अकरा दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. बँक ऑफ बडोदानं
केलेल्या तक्रारीवरून विक्रम कोठारी, त्याचा मुलगा राहुल आणि पत्नी साधना, या तिघांवर
कारवाई सुरू आहे.
****
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. 2018-19 या आर्थिक वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प
येत्या नऊ मार्चला सादर होणार असून, राज्यातल्या सध्याच्या समस्या आणि त्यावरचे उपाय,
यासंदर्भात या अधिवेशनात प्रामुख्यानं चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे.
****
प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाबद्दल
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला आहे. श्रीदेवींचा अभिनय हा अन्य अभिनेत्यांसाठी
प्रेरणादायी असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनीही श्रीदेवी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं असून, आपल्या दीर्घ कारकीर्दीत
अनेक अविस्मरणीय भूमिका करणाऱ्या श्रीदेवींच्या निधनाच्या या दु:खद प्रसंगी आपल्या
भावना त्यांच्या कुटुंबीय आणि चाहत्यांसोबत असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनीही श्रीदेवी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, चित्रपटसृष्टीतलं
त्यांचं योगदान चिरकाळ स्मरणात राहील, असं म्हटलं आहे.
****
कोल्हापूर इथल्या लक्ष्मीपुरी भागातल्या एका लाकडी
इमारतीला आज सकाळी लागलेल्या आगीमुळे सुमारे दहा लाख रुपयांच्या साहित्याचं नुकसान
झालं आहे. या ठिकाणी रविवारचा आठवडी बाजार भरत असल्यानं आगीमुळे काही काळ गोंघळाचं
वातावरण पसरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment