Wednesday, 28 February 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.02.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 February 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ फेब्रुवारी  २०१ सकाळी .५० मि.

****



Ø  मराठी भाषा गौरव दिन राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा; मराठी भाषेच्या विकासाला अधिक चालना देण्याचा ठराव विधीमंडळात मंजूर

Ø  आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक निकषांवर आरक्षण देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मागणी

Ø  औरंगाबाद शहरातला कचरा मर्यादित कालावधीकरता साठवण्यासाठी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांनी संयुक्तपणे तीन पर्यायी जागांची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

आणि

Ø  नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात जाणाऱ्या शेतजमिनीतल्या झाडांचं पुनर्मुल्यांकन वाढवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेतांना जालना तालुका कृषी अधिकारी रामेश्वर रोडगेसह तीन जणांना अटक

*****

 मराठी भाषा गौरव दिन काल राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषा ही जास्तीत जास्त लोकाभिमुख होऊन ज्ञान भाषा व्हावी याकरता सरकारनं भाषेच्या विकास प्रक्रियेला अधिक चालना द्यावी अशी शिफारस करणारा ठराव काल मराठी भाषा गौरव दिनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी एकमतानं मंजूर केला. विधानपरिषदेत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा ठराव मांडला. मराठी विषय बारावीपर्यंत सक्तीचा करण्याबद्दल, अभ्यास मंडळाला सूचना करण्याची ग्वाही मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी दिली. मराठीचा राज्य कारभारात जास्तीत जात उपयोग करण्याबद्दल पाऊलं उचलली जात आहेत असं ते म्हणाले.

 या दिनानिमित्त काल मुंबईत विधान भवनाच्या प्रांगणात मराठी अभिमान गीताचं सामुहिक गायन करण्यात आलं. गायक संगीतकार कौशल इनामदार आणि त्यांच्या संचानं हे गीत सादर केलं. या कार्यक्रमात ध्वनीक्षेपण यंत्रणेत बिघाड झाल्यानं, मराठी अभिमान गीत पूर्ण वाजवलं गेलं नाही, तसंच या गीतातून शेवटचं एक कडवं वगळलं गेल्याच्या कारणावरून विधानसभेत विरोधी पक्ष आणि सरकार यांच्यात काल आरोपप्रत्यारोपा झाले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, जयंत पाटील यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली.

****

 सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसून सरकार तुघलकी वागणूक देत असल्याचा आरोप करत विधानपरिषेत विरोधकांनी घोषणाबाजी केली, त्यामुळे परिषदेचं कामकाज काल दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित करत स्थगन प्रस्ताव मांडला.

****

 मराठी भाषा विद्यापीठ उभारण्यासाठी ग्रंथाली प्रकाशनाला मुंबईत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. काल विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ग्रंथालीचे संस्थापक दिनकर गांगल यांच्याकडे या जागेची करारप्रत सोपवण्यात आली. वांद्रे पश्चिम मतदार संघात हे विद्यापीठ उभारलं जाणार आहे.

****

 मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काल औरंगाबाद इथं विविध कार्यक्रम घेण्यात आले. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वतीनं मराठी भाषा आणि कवितेची परंपरा या विषयावर साहित्य अकादमीचे क्षेत्रीय सचिव कृष्णा किंबहुने यांचं व्याख्यान झालं, तर वसंतराव नाईक महाविद्यालयात डॉ. महेश खरात यांचं 'मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यातल्या अडचणी' या विषयावर व्याख्यान झालं.

 औरंगाबाद इथं काल बहुभाषिक संमेलनाचं अयोजन करण्यात आलं होतं. महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. या बहुभाषिक संमेलनामध्ये २४ भाषांचे प्रतिनिधी, पंधरा महाविद्यालयं, आठ शाळा सहभागी झाल्या होत्या.

           औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकावरही मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा झाला. पाच  मार्चपर्यंत मराठी वाचन सप्ताह साजरा होत असून, या निमित्तानं या परिसरात सवलतीच्या दरात पुस्तक प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे.
          मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातल्या एका न्यायालयात काल संपूर्ण युक्तिवाद मराठी भाषेतून करण्यात आला. न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती एस एम गव्हाणे यांनी कामकाज मराठीतून करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयातल्या सगळ्या विधीज्ञांनी मराठीतून युक्तिवाद करुन हा दिवस साजरा केला.

****

 शेतकऱ्यांना आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक निकषांवर आरक्षण द्यावं असं  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीत पवार यांनी हे आरक्षण आर्थिक निकषांवर द्यावं अशी मागणी केली होती, त्यामुळे पवार यांच्यावर टिका झाली. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली आरक्षणाबाबतची भूमिका काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना स्पष्ट केली. याशिवाय, अनुसूचित-जाती जमाती, आणि इतर मागासवर्गीय समाजाचं आरक्षण कायम ठेवावं असंही पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, नोटबंदीनंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे पडून असलेल्या जुन्या नोटा स्वीकारण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेनं नकार दिला असून या नोटांच्या बदल्यात बँकेच्या ताळेबंदात तोटा म्हणून नोंद घेण्यास सांगण्यात आलं आहे. सरकारच्या ह्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं.

****

 औरंगाबाद शहरातल्या कचऱ्याची मर्यादित कालावधीकरता साठवण करण्यासाठी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांनी संयुक्तपणे मिटमिटा, आडगाव आणि तीसगाव इथल्या पर्यायी जागांची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. या न्यायालयाच्या आदेशानंतर या तिन्ही अधिकाऱ्यांनी काल या पर्यायी जागांची पाहणी केली. पाहणी दरम्यान तिन्ही ठिकाणी स्थानिक रहिवाशांनी कचरा टाकण्यास जोरदार विरोध केला. या जनहित याचिकेवर आज होणाऱ्या सुनावणी दरम्यान हे अधिकारी आपला अहवाल न्यायालयाला सादर करण्याची शक्यता आहे.

*****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****

 सिनेअभिनेत्री श्रीदेवी यांचा मृतदेह काल रात्री दुबईतून मुंबईत आणण्यात आला. आज त्यांच्यावर मुंबईतल्या विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, काल दुबई पोलिसांनी अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूमागे कोणताही घातपात नसून, त्यांचा मृत्यू शुद्ध हरपल्यानंतर, स्नानगृहातल्या टबमध्ये बुडून झाला. यामुळे त्यांच्या मृत्यूचा तपास थांबवण्यात आल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांचा मृतदेह भारतात आणण्यासंबंधीची कागदपत्रं कपूर कुटुंबीयांकडे सोपवली. शनिवारी मध्यरात्रीनंतर दुबईत एका हॉटेलमध्ये श्रीदेवी यांचा मृत्यू झाला होता.

****

 मराठवाडा साहित्य परिषदेचे विशेष काव्य पुरस्कार काल औरंगाबाद इथं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष कवी फ.मुं.शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्कार डॉ. यशवंत मनोहर यांना, तर कवयित्री लीला धनपलवार काव्य पुरस्कार दासू वैद्य यांना देण्यात आला. कुसुमाग्रजांनी काव्य लेखनात जी उंची गाठली, तिथपर्यंत किमान आपली नजर पोहोचवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, असं मत ज्येष्ठ कवी यशवंत मनोहर यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केलं. दासू वैद्य यांनी पुरस्काराला उत्तर देताना आपल्या दोन कविता सादर केल्या.

****

 नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गात जाणाऱ्या  झाडांचं मूल्यांकन वाढवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेतांना जालना इथला तालुका कृषी अधिकारी रामेश्वर रोडगे याच्यासह तीन व्यक्तिंना लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं काल रंगेहाथ पकडलं. या प्रकरणातल्या  तक्रारदाराची अहंकार देऊळगाव इथली शेती समृद्धी महामार्गासाठी  संपादित झाली आहे. संपादित जमिनीवरच्या झाडांचं कृषी विभागानं तीन कोटी एक लाख रुपयांचं मूल्यांकन केलं. मात्र, रोडगे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी, ते दोन कोटी सतरा लाख एवढंच दाखवलं. त्यामुळे तक्रारदारानं झाडांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला असता या चौघांनी त्यांच्याकडे वीस लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी पाच लाख रुपये घेतांना रोडगे याच्यासह  अनंत नाल्टे, बालासाहेब वाघमारे आणि सुभाष खाडे यांना अटक करण्यात आली.

****

 मराठा आरक्षणा संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगानं आयोजित केलेली जनसुनावणी काल उस्मानाबाद इथं घेण्यात आली. यावेळी विविध संस्था संघटनांकडून निवेदनं स्वीकारण्यात आली. अशाच प्रकारची सुनावणी पाच ते नऊ मार्च या कालावधीत अनुक्रमे नांदेड, परभणी, हिंगोली, बीड आणि जालना याठिकाणी होणार आहे.

****

 २०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तीन अपत्ये असतांना  दोन अपत्ये असल्याचं खोटं शपथ पत्र दाखल केल्याच्या कारणावरुन, उस्मानाबादचे शिवसेनेचे जिल्हा परीषद सदस्य गौतम लटके यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा विभागीय आयुक्तांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं कायम ठेवला आहे. लटके हे परंडा तालुक्यातल्या अनाळा गटातून जिल्हा परीषद सदस्य म्हणून निवडून आले होते.

****

 बीड इथं जिल्हा शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीच्यावतीनं  राज्यातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावं यासह अन्य  मागण्यांसाठी काल आंदोलन करण्यात आलं. मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा देऊन अंदोलनकर्त्यांनी यावेळी शासनाच्या धोरणांचा निषेध केला.

****

 नांदेड इथं गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या १४ व्या संगीत शंकर दरबार महोत्सवाची सांगता काल ज्येष्ठ गायिका शुभा मुदगल यांच्या शास्त्रीय गायनानं झाली. त्याआधी विख्यात व्हायोलिनवादक डॉ. एन.एन राजम आणि त्यांची नात नंदिनी शंकर यांची जुगलबंदी रंगली.

****

 स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानाचं केंद्रीय पथक परभणी शहराची  पाहणी करण्यासाठी शहरात काल दाखल झालं आहे. हे पथक शहरात खतनिर्मिती, सार्वजनिक स्वच्छता गृह, घंटागाडी, तसंच विविध भागांची पाहणी करणार आहे.

*****

***

No comments: