Tuesday, 27 February 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 27.02.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 27 February 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ फेब्रुवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढवणार असून, पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असल्याचं, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात पारनेर इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा सहकारी बँकांना टाळे लावायला निघालेलं सरकार, दुसरीकडे बँका ओरबाडून पळून जाणाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप, ठाकरे यांनी केला. केंद्र सरकार लोकांचे प्रश्न सोडवायला तयार नाही. अच्छे दिन आले नाहीत, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना, हे देशाला मिळालेलं फसवं नेतृत्व असल्याचं, ठाकरे म्हणाले.

****

मराठी भाषा ही जास्तीत जास्त लोकाभिमुख होऊन ज्ञान भाषा व्हावी याकरता सरकारनं भाषेच्या विकास प्रक्रियेला अधिक चालना द्यावी अशी शिफारस करणारा ठराव आज मराठी भाषा गौरव दिनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी एकमतानं मंजूर केला. विधानपरिषदेत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा ठराव मांडला. मराठी विषय बारावी पर्यंत सक्तीचा करण्याबद्दल, अभ्यास मंडळाला सूचना करण्याची ग्वाही मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी दिली. मराठीचा राज्य कारभारात जास्तीत जात उपयोग करण्याबद्दल पावलं उचलली जात आहेत असं ते म्हणाले. आज सकाळी विधिमंडळ प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात ध्वनीक्षेपक बंद पडल्याचा तसंच मराठी गौरव गीतात सातवं कडवं गायल गेलं नसल्याचा मुद्दा विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासापूर्वी विरोधी पक्षांनी उपस्थित केला.
सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसून सरकार तुघलकी वागणूक देत असल्याचा आरोप करत विधानपरिषेत विरोधकांनी घोषणाबाजी केली, त्यामुळे परिषदेचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित करत स्थगन प्रस्ताव मांडला.

****

मराठी भाषा विद्यापीठ उभारण्यासाठी ग्रंथाली प्रकाशनाला मुंबईत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आज विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ग्रंथालीचे संस्थापक दिनकर गांगल यांच्याकडे या जागेची करारप्रत सोपवण्यात आली. वांद्रे पश्चिम मतदार संघात हे विद्यापीठ उभारलं जाणार आहे.

****

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातल्या एका न्यायालयात आज संपूर्ण युक्तिवाद मराठी भाषेतून करण्यात आला. न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती एस.एम.गव्हाणे यांनी कामकाज मराठीतून करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयातल्या सगळ्या विधीज्ञांनी मराठीतून युक्तिवाद करुन हा दिवस साजरा केला.

****

औरंगाबाद इथं आज मराठी भाषा दिनानिमित्त बहुभाषिक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. महापौर नंदकुमार घोडले यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. या बहुभाषिक संमेलनामध्ये २४ भाषांचे प्रतिनिधी, पंधरा महाविद्यालयं, आठ शाळा सहभागी झाल्या होत्या.
शहरातल्या वसंतराव नाईक महाविद्यालयात डॉ.महेश खरात यांचं ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यातल्या अडचणी’ या विषयावर व्याख्यान झालं.

****

मराठा आरक्षणा संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगानं आयोजित केलेली जनसुनावणी आज उस्मानाबाद इथं घेण्यात आली. यावेळी विविध संस्था संघटनांकडून निवेदनं स्वीकारण्यात आली. ही सुनावणी पाच ते नऊ मार्च या कालावधीत अनुक्रमे नांदेड, परभणी, हिंगोली, बीड आणि जालना या ठिकाणी होणार आहे.

****

आगामी होळीचा सण साजरा करताना वीजेसंबंधी अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन महावितरणतर्फे करण्यात आलं आहे. होळी पेटवताना सभोवताली वीज वाहिन्या किंवा वीजवितरण रोहित्र नाहीत, याची खात्री करावी, असं औरंगाबादच्या महावितरण कार्यालयाचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील जाधव यांनी सांगितलं आहे.

****

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूमागे कोणताही घातपात नसून, त्यांचा मृत्यू शुद्ध हरपल्यानंतर, स्नानगृहातल्या टबमध्ये अपघातानं बुडून झाल्याचं, दुबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे त्यांच्या मृत्यूचा तपास थांबवण्यात आल्याचं, दुबई पोलिसांनी सांगितल्याचं, पीटीआयचं वृत्त आहे. दरम्यान, श्रीदेवी यांचा मृतदेह भारतात आणण्यासंबंधी दुबई पोलिसांनी आवश्यक कागदपत्रं कपूर कुटुंबीयांकडे सोपवली आहेत. दुबईतल्या भारतीय दुतावासातून ही माहिती देण्यात आली. श्रीदेवी यांच्या मृतदेहावर रसायनांचं लेपन करून, त्यांचा मृतदेह भारतात आणला जाणार आहे. श्रीदेवी यांचा शनिवारी मध्यरात्रीनंतर दुबईत एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला.

****

येत्या सहा मार्च रोजी होणाऱ्या पैठण इथल्या नाथषष्ठी सोहळ्यात येणाऱ्या भाविकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना, एकनाथ महाराज विश्वस्त संस्थानचे कार्यकारी विश्वस्त तथा अप्पर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे यांनी दिल्या आहेत. आज पैठण इथं झालेल्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यात्रा उत्सवाच्या व्यवस्थापनासाठी स्वयंसेवकांनी पैठण नगर परिषदेत नाव नोंदणी करण्याचं आवाहनही सोरमारे यांनी केलं आहे.

****

No comments: