Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 19 February 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ फेब्रुवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
छत्रपती
शिवाजी महाराज यांची जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. राज्यपाल सी विद्यासागर
राव यांनी मुंबईत शिवाजी पार्क इथं महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन
केलं.
विधानभवन परिसरात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर
यांनी तर मंत्रालयात कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ
खोत यांनी, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
लातूर इथं यानिमित्त दुचाकी फेरीचं आयोजन करण्यात आलं
होतं. या फेरीत महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी चंद्रकांत
सूर्यवंशी यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
जालना शहरातही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध
कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी शहरातून काढण्यात आलेल्या दुचाकी
फेरीत युवकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीनं
सायंकाळी सहा वाजता गांधीचमन चौकापासून शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मुख्य मिरवणूक
काढण्यात येणार आहे.
औरंगाबाद इथं क्रांतीचौकात शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ
पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामाला आज विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार
घोडेले यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार सतीश चव्हाण, शिवजयंती
समितीचे अध्यक्ष विनोद पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर असलेल्या सिंधुदुर्ग
किल्ल्यावर शिवजयंती उत्साहात साजरी झाली, यावेळी शिवरायांचा हात तसंच पावलाची प्रतिकृती
आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते मंदिराला अर्पण करण्यात आली.
राज्यात सातारा, कोल्हापूर, रायगड, पालघर, धुळेसह सर्वच
जिल्ह्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
****
राज्य सरकारचं धोरण सर्व बाबतीत कुचकामी ठरलं असल्याचा
आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केला आहे. ते आज धुळे
इथं वार्ताहरांशी बोलत होते. सरकार जाहिरातबाजीवर कोट्यवधींची उधळण करून मॅग्नेटिक
महाराष्ट्राचा देखावा करत असल्याचं ते म्हणाले. आगामी विधीमंडळाच्या अधिवेशनात धर्मा
पाटील आत्महत्या, भूसंपादनातील गोंधळ आणि अनुषंगिक विषय उपस्थित करणार असल्याचं त्यांनी
यावेळी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल यात्रा आज धुळे तालुक्यातल्या फागणे
इथून जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेरकडे रवाना झाली.
****
मुंबईत सुरू असलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या परिषदेत
आज इमर्जिंग टेक्नॉलॉजी इन सेक्टर्स या विषयावर चर्चासत्र घेण्यात आलं. आघाडीचे अनेक
उद्योजक या चर्चासत्रात सहभागी झाले.
****
शिक्षण हे विद्यार्थ्यांना कणखर बनवणारं, तसंच
त्यांच्यामध्ये नैतिक मूल्य रुजवणारं असावं, असं
प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते आज मुंबईतल्या
आर.ए.पोदार वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयाच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या
उद्घाटन प्रसंगी बोलत होते. शिक्षण हे युवकांचं सशक्तीकरण होण्याचं एक माध्यम बनलं
पाहिजे, असं ते म्हणाले.
****
जागतिक तापमानवाढ आणि हवामान
बदल या देशापुढल्या सर्वात महत्वाच्या समस्या असल्याचं केंद्रीय पर्यावरण आणि वन
मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. येत्या पाच जून रोजी नवी दिल्ली इथं
जागतिक पर्यावरण दिवस आयोजित करण्यासंदर्भात संयुक्त राष्ट्रांबरोबरच्या संकल्प पत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर ते आज बोलत होते. प्लास्टीक हा एक गंभीर विषय होत असल्यानं, यंदाच्या पर्यावरणदिनी
प्रामुख्यानं प्लास्टीकच्या नियंत्रित वापरावर चर्चा होईल, असं ते म्हणाले. भारत जागतिक
पर्यावरण दिवस २०१८चं जागतिक स्तरावर यजमानपद भूषवणार आहे.
****
केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह
यांनी, २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारचा मानस असल्याचा पुनरुच्चार
केला आहे. नवी दिल्ली इथं आज याविषयावर आयोजित राष्ट्रीय संमेलनाचं उद्घाटन करताना
ते बोलत होते. सरकार फळबागा आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रावर जास्त लक्ष देत असून, यातूनच
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्यास मदत मिळेल, असं ते म्हणाले.
****
संस्कृत भाषा ही, भारतीय ऐक्याचं
आधारसूत्र असल्याचं मत, यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांनी व्यक्त केलं आहे. संस्कृत
भारती तथा आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीनं यवतमाळ इथं आयोजित संस्कृत जनपद संमेलनाचं
उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यानिमित्तानं संस्कृतमधलं विज्ञान तसंच वस्तू प्रदर्शन
भरवण्यात आलं आहे.
****
पंजाब नॅशनल बँक आर्थिक गैरव्यवहार
प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं पुणे, ठाणे, मुंबईसह देशातल्या अन्य ठिकाणी
छापे घातले. दरम्यान, सीबीआयनं पंजाब नॅशनल
बँकेच्या मुंबईतल्या ब्रॅडी हाऊस शाखेला सील ठोकलं आहे. या प्रकरणातला आरोपी हिरे
व्यापारी नीरव मोदीच्या फायर स्टार डायमंड कंपनीच्या मुख्य आर्थिक अधिकारी विपुल
अंबानी यांची याप्रकरणी चौकशी सुरू आहे.
//*********//
No comments:
Post a Comment