Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 18
February 2018
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ फेब्रुवारी २०१८
दुपारी १.०० वा.
****
नवी मुंबई इथल्या नियोजित
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी दहा गावांतल्या तीन हजार पाचशे कुटंबांचं विस्थापन
होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उलवे परिसरातल्या कोंबडभुजे गावात
होत असलेल्या या विमानतळ भूमिपूजन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पग्रस्तांची
समन्वय बैठक घेऊन, तोडगा काढण्यावर चर्चा करण्यात आली. आजच्या भूमिपूजन कार्यक्रमात
कोणताही गोंधळ घालणार नसल्याचं, लेखी आश्वासन या प्रकल्पग्रस्तांनी प्रशासनाला दिल्याची
माहिती आमच्या वार्ताहरानं दिली. सुमारे १६ हजार कोटी रूपयांच्या खर्चातून उभारल्या
जात असलेल्या या विमानतळावर दोन समांतर धावपट्ट्या बांधल्या जाणार असून, दर तासाला
सुमारे ८० विमानांचं उड्डाण होऊ शकेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यात सहकारी तत्वावर सुरू
असलेले सुतकताई उद्योग तसंच यंत्रमागांचं खासगीकरण करण्याला परवानगी देण्याचा निर्णय
राज्य सरकारनं घेतला आहे. राज्याच्या नव्या वस्त्रोद्योग धोरणानुसार आता सुतकताई उद्योग
तसंच यंत्रमाग संस्थांना त्यांच्याकडच्या जागांचा औद्योगिक वापराशिवाय अन्य कारणांसाठी
वापर करता येणार आहे. पुढील पाच वर्ष अर्थात २०२३ पर्यंत हे धोरण लागू असेल. वीणकाम
तसंच वस्त्रोद्योग क्षेत्राच्या बळकटीकरणातून महिला सबलीकरण, तसंच महिला उद्योजकांना
प्रोत्साहन देऊन अधिकाधिक रोजगारांची निर्मिती करणं हा या धोरणाचा उद्देश आहे.
****
येत्या महिला दिनी आठ मार्चपासून,
राज्य सरकार किशोरवयीन मुलींसाठी अस्मिता योजना सुरू करत आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा
परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी पाच रुपयात तर ग्रामीण भागातल्या महिलांना
सवलतीच्या दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले जातील. ग्रामविकास मंत्रालयाकडून ही माहिती
देण्यात आली. राज्यात अकरा ते १९ वर्ष वयोगटातल्या किशोरवयीन मुली तसंच ग्रामीण भागातल्या
महिलांपैकी फक्त १७ टक्के महिला सॅनिटरी पॅडचा वापर करतात, हे प्रमाण वाढवण्यासाठी
ही योजना राबवली जात आहे. या योजनेची सुकाणू समिती म्हणून उमेद - महाराष्ट्र राज्य
ग्रामीण जीवनमान मिशनची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
वतीनं उत्तर महाराष्ट्रात पुकारण्यात आलेल्या हल्लाबोल आंदोलनात आज चौथ्या दिवशी नाशिक
जिल्ह्यात देवळा इथं जाहीर सभा घेण्यात आली. पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे
यांनी या सभेला संबोधित केलं. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उपमुख्यमंत्री
अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित
होते.
****
बडोदा इथं सुरू असलेल्या
एक्क्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे. आज सकाळच्या
सत्रात निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली, तर अनुवाद:
गरज, समस्या आणि उपाय तसंच राजकीय वास्तवाच्या समर्थ चित्रणापासून लेखक दूर का? या
विषयांवर परिसंवाद घेण्यात आले.
****
देशातल्या ११५
मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी नीती आयोगाच्या माध्यमातून विशेष उपक्रम राबवला जाणार
आहे. यामध्ये मानव निर्देशांक कमी असल्याच्या निकषावर वाशिम जिल्ह्याची निवड झाली आहे.
नीती आयोगामार्फत आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि संलग्न क्षेत्रं, आर्थिक समावेशकता,
कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांच्या विकासासाठी योजना आखल्या जाणार
आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणांच्या
क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा सक्रीय सहभाग असण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी राहुल
द्विवेदी यांच्या अध्यक्षतेत सर्व संबधित यंत्रणांच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची एक कार्यशाळा
नुकतीच घेण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मुंबई - अहमदाबाद
महामार्गावरील काशिमीरा घोडदेव नाक्यावरचा वसई खाडीपुल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचं
वर्षभरापूर्वी शासनाकडून जाहीर करण्यात आल्यानं, या पुलावरील वाहतूक काही दिवस बंद
ठेवण्यात आली होती. मात्र हलक्या वाहनांना या पुलावरून वाहतुकीची परवानगी देण्यात आली
आहे. या पुलाची पुनर्बांधणी करून, संभाव्य दुर्घटना टाळावी, अशी मागणी प्रवासी तसंच
वाहनचालकांकडून केली जात असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दक्षिण आफ्रिका
दौऱ्यात आज भारताच्या महिला तसंच पुरुष क्रिकेट संघांचे टी ट्वेंटी मालिकेतले सामने
होणार आहेत.
महिला क्रिकेट
संघांदरम्यान सुरू असलेल्या टी ट्वेंटी मालिकेतला तिसरा सामना आज होणार आहे. भारतीय
वेळेनुसार दुपारी सव्वा वाजता हा सामना सुरू होईल.
पुरुष संघादरम्यान
टी ट्वेंटी मालिकेतला पहिला सामना आज सायंकाळी सहा वाजता सुरू होईल.
//**********//
No comments:
Post a Comment