Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 26 February 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ फेब्रुवारी २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून
प्रारंभ; नऊ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार
Ø सर्व क्षेत्रांमध्ये
महिलांना सहभागी करून घेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन
Ø लातूर इथं आज
तर, उस्मानाबाद इथं उद्या मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाची खुली जन सुनावणी
आणि
Ø औरंगाबाद शहरातला
नारेगाव कचरा डेपो हटवण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी सुरु केलेलं आंदोलन दहाव्या
दिवशीही सुरुच
*****
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून
मुंबईत सुरू होत आहे. २०१८- १९ या आर्थिक वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प येत्या नऊ
मार्चला सादर होणार असून, राज्यातल्या सध्याच्या समस्या आणि त्यावरचे उपाय, यासंदर्भात
या अधिवेशनात प्रामुख्यानं चर्चा होईल, अशी अपेक्षा आहे.
या अधिवेशनात ११ विधेयकं प्रस्तावित आहेत. विधानपरिषदेत
आणि विधानसभेत एकूण १६ विधेयकं मांडण्यात येतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
शेतकरी कर्जमाफी योजना अतिशय पारदर्शकपणे राबवण्यात येत असून कर्जमाफीसाठी ज्यांना अर्ज भरता आला नाही, अशा शेतकऱ्यांना येत्या १ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत आणखी संधी दिली जाणार असल्याचंही फडणवीस म्हणाले.
शेतकरी कर्जमाफी योजना अतिशय पारदर्शकपणे राबवण्यात येत असून कर्जमाफीसाठी ज्यांना अर्ज भरता आला नाही, अशा शेतकऱ्यांना येत्या १ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत आणखी संधी दिली जाणार असल्याचंही फडणवीस म्हणाले.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं
काल बोलावलेल्या
चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. शेतकऱ्यांच्या अडचणी, वाढती महागाई, बेरोजगारी,
बँकांचे समोर आलेले घोटाळे, या पार्श्वभूमीवर चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचं, विधानसभेतले
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं
आहे. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह रिपब्लीकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे, आमदार
कपिल पाटील यांच्याही या पत्रावर सह्या आहेत.
****
जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये
महिलांना सहभागी होण्याची संधी मिळवून देणं, हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य असल्याचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीच्या मन की बात या
कार्यक्रमातून देशवाशियांशी संवाद साधताना काल ते बोलत होते. विकासामध्ये महिलांची
मजबूत, सक्षम आणि समान भागीदारी, हेच नव्या भारताचं स्वप्नं असल्याचं त्यांनी यावेळी
सांगितलं. महिला सक्षमीकरणामध्ये अंतर्गत मजबुती आणि आत्मविश्वासावर भर देण्यात आला
असून, देश , महिला विकासाकडून महिलांच्या नेतृत्वाखाली विकासाकडे वाटचाल करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
परवा, अठ्ठावीस
तारखेला साजरा होत असलेल्या विज्ञान दिनाच्या अनुषंगानं त्यांनी भारतरत्न सी व्ही रमण,
हरगोविंद खुराना, जगदीशचंद्र बोस, सत्येंद्रनाथ बोस आदी शास्त्रज्ञांच्या कार्याचं
स्मरण केलं.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत
सुरू करण्यात आलेल्या गोबर धन, या योजनेबद्दल सांगताना, ग्रामीण भागातल्या लोकांनी
शेतीतला कचरा आणि शेण याकडे टाकाऊ वस्तू म्हणून नव्हे तर उत्पन्नाचे मार्ग म्हणून पहावे,
असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.
स्वातंत्र्याच्या सत्तर
वर्षांनंतर मुंबईपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या घारापुरी लेण्यांच्या बेटावर
वीज पोहोचल्याबद्दल पंतप्रधानांनी त्या भागातल्या नागरिकांचं अभिनंदन केलं.
****
राज्यात सर्व बाजार
समित्यांमध्ये ई-नाम योजना राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला असून पहिल्या टप्यात ३० आणि दुसऱ्या
टप्यात ३० बाजार समित्यांमध्ये या
योजनेची तातडीनं राबवण्यात येईल, असं पणनमंत्री सुभाष देशमुख सांगितलं.
शेतकऱ्यांची माल विक्री करतांना होणारी फसवणूक रोखण्यासाठी
आणि भाजीपाल्याच्या ठोक बाजारातल्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारनं
खाजगी ठोक बाजाराची कार्यपद्धतीचं अंकेक्षिकीकरण - डिजीटाईज करण्याचा निर्णय घेतला
आहे. यासाठी सरकारनं शेतकरी, व्यापारी, खरेदीदार, निर्यातदार आणि प्रक्रिया करणाऱ्यांसाठी
इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रीकल्चर मार्केट - इ - नाम ही कार्यप्रणाली सुरू केली आहे. या
कार्यप्रणालीनुसार बाजार समितीच्या आवारात शेतमालाचा ई-लिलाव करण्यात येईल, असं ते म्हणाले. योजना राबवतांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहनपर
बक्षीसं, तर समाधानकारक काम नसलेल्या बाजार समित्यांवर कारवाईचा इशाराही देशमुख यांनी
दिला आहे.
****
साखरेचा घाऊक बाजारातला दर घसरल्यानं आणि विक्रीत
घट झाल्यानं राज्यभरातल्या ऊस उत्पादकांचे सुमारे अडीच हजार कोटी रुपये साखर कारखान्यांकडे
अडकून पडल्याची माहिती राज्य सहकार खात्याच्या सूत्रांनी दिली आहे. साखर कारखान्यांकडून
उत्पादकांना रास्त आणि किफायतशीर दर मिळणं शक्य होत नसल्याचं या सूत्रांनी सांगितलं.
राज्यभरातल्या एकशे त्र्याऐंशी साखर कारखान्यांनी गेल्या नोव्हेंबरपासून गाळप सुरू
केलं असून, जानेवारीपर्यंत गाळप झालेल्या चारशे ऐंशी लाख टन उसासाठी एकूण दहा हजार,
पाचशे कोटी रुपये उत्पादकांना द्यायचे असताना, कारखान्यांनी आठ हजार, एकशे पन्नास कोटी
एवढीच रक्कम दिली असल्याचं पीटीआयच्या याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
प्रख्यात सिने अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव
आज दुबईतून विशेष विमानानं मुंबईत आणण्यात येईल. परवा रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं दुबईत त्यांचं निधन झालं होतं.
अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी तसंच सिनेसृष्टीतल्या कलावंतांनी शोक व्यक्त केला
आहे.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
*****
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्यावतीनं
आज लातूर इथं तर, उद्या २७ तारखेला उस्मानाबाद इथं मराठा आरक्षणासाठी जिल्हास्तरावर
खुली जन सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. यात लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातले नागरिक,
संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींकडून लिखित स्वरुपात निवेदनं स्वीकारण्यात येतील.
कोणा व्यक्ती किंवा शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात येणार नसल्याचं आयोगानं म्हटलं आहे.
****
औरंगाबाद शहरातला नारेगाव इथला कचरा डेपो हटवण्याच्या
मागणीसाठी ग्रामस्थांनी सुरु केलेलं आंदोलन काल दहाव्या दिवशीही सुरु होतं. या आंदोलनादरम्यान
महानगरपालिकेच्या एकाही वाहनाला नारेगाव कचरा डेपोत कचरा टाकता आलेला नाही, त्यामुळे
शहरात कचरा समस्या गंभीर बनली आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी काल या आंदोलकांची
भेट घेतली. महानगपालिकेनं कामाला वेगानं सुरुवात केली असून घनकचरा व्यव्स्थापन प्रकल्प
उभारण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, असं आवाहन त्यांनी आंदोलकांना केलं. मात्र
नारेगाव इथं या कचरा डेपो मुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवत असल्यानं आंदोलन
सुरुच ठेवणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं.
दरम्यान, या समस्येसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवरआज सुनावणी होणार आहे. महानगरपालिका प्रशासनानं घनकचरा
व्यवस्थापनाच्या रदतुदीनुसार या कचऱ्याची विल्हेवाट लावावी अशी मागणी याचिकेत करण्यात
आली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात लिंबेजळगाव इथं आयोजित मुस्लिम
धर्मियांच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय तब्लिगी इज्तेमाचा आज दुपारी समारोप होत आहे.
कालच्या दुसऱ्या दिवशी मुस्लिम धर्मगुरूंनी धर्माच्या आचरणाबाबत मार्गदर्शन केलं. नमाज –इ- झुर्र अदा केल्यानंतर
४७०० जणांचा सामुदायिक विवाह सोहळाही काल या ठिकाणी पार पडला.
****
परभणी शहराच्या स्वच्छतेसाठी नागरिकांनी सहकार्य
करावं असं आवाहन महापालिका आयुक्त राहुल रेखावार यांनी केलं आहे. शहरातल्या शिवाजी
महाराज पुतळा परिसर, वसमत रोड, राजगोपालचारी उद्यान या परिसरात आयुक्त राहुल रेखावार
यांनी काल स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी त्यांनी रहिवाशांना स्वच्छतेबाबत सुचना देत
मार्गदर्शन केलं.
***
नांदेड इथं आजपासून दोन दिवसीय
चौदाव्या शंकर दरबार या संगीतावर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. काल या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला प्रसिद्ध
गायिका उषा मंगेशकर यांनी मराठी-हिंदी लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम सादर केला.
****
लातूरच्या सिद्धेश्वर यात्रा महोत्सवामध्ये आज जिल्हास्तरीय
सामूहिक महिला भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेचं उद्घाटन सकाळी दहा
वाजता होणार आहे. या स्पर्धेमध्ये महिला भजन मंडळांनी सहभागी व्हावं, असं आवाहन महोत्सव
समितीनं केलं आहे.
****
भारताच्या पी. कश्यपनं ऑस्ट्रियन खुल्या बॅडमिंटन
स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं अजिंक्यपद मिळवलं आहे. त्यानं मलेशियाच्या जून वे चीम चा
सरळ पराभव करत हा मान मिळवला. त्याचा हा गेल्या तीन वर्षातला पहिला आंतरराष्ट्रीय किताब
आहे.
****
येत्या सहा मार्चपासून श्रीलंकेत सुरू होत असलेल्या
टी-ट्वेंटी तिरंगी क्रिकेट मालिकेसाठी कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यासह
काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेसाठी संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं असून शिखर धवन उपकर्णधार
असेल.
****
राज्यात जंगल वाढवणं हा मुख्य उद्देश असून जर स्वार्थासाठी कोणी झाडं तोडत असेल, तर त्यांच्यावर कायद्याच्या
चौकटीत राहुन कारवाई केली जाईल, असं राज्याचे वित्त, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. पुणे इथं काल
एका पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.
*****
***
No comments:
Post a Comment