Thursday, 22 February 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 22.02.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 22 February 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ फेब्रुवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

जम्मू-काश्मीरच्या बांदिपुरा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी हाती घेतलेल्या शोध मोहिमेदरम्यान अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत सैन्यदलाचा एक कमांडो जखमी झाल्याचं वृत्त आहे. सैन्यदलानं घातलेल्या वेढ्यातून निसटण्यात अतिरेकी यशस्वी झाल्याचंही पीटीआयच्या याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयातून आज सुटी मिळाली आहे. स्वादुपिंडाच्या आजारामुळे ते गेल्या पंधरा तारखेपासून या रुग्णालयात भरती होते. पर्रीकर गोव्याला पोचल्याची माहिती गोवा विधानसभेचे उपाध्यक्ष मायकल लोबो यांनी दिली.

****

राज्यातल्या ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या ग्राम पाणीपुरवठा आणि स्वच्छता समितीकडे तसंच जिल्हा परिषदेकडे यासंदर्भात असणाऱ्या अधिकारामध्ये बदल करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आता, समितीकडे यापूर्वी असलेले दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कामांचे अधिकार रद्द करण्यात आले असून, जिल्हा परिषदेकडे पाच कोटी रुपयांपर्यंतच्या कामाचे अधिकार ठेवण्यात आले आहेत. पाच कोटींहून जास्त रकमेच्या कामांच्या अंमलबजावणीचे अधिकार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सोपवण्यात आले आहेत. समितीमार्फत अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या या कामांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी आल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र परिचर्या परिषदेची निवडणूक विहित मुदतीत न झाल्यास परिषदेवर प्रशासकाची नेमणूक करता यावी, यासाठी महाराष्ट्र परिचारिका अधिनियम - १९६६ मध्ये सुधारणा करण्यालाही आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. शेतरस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यालाही आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

****

राजकारणी हे देव नसतात, आणि कायद्याच्या वरही नसतात, अशा शब्दात फटकारत, मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्य पोलिसांना, मुंबईच्या दोन नगरसेवकांवर पर्यावरण संरक्षण कायद्याचं उल्लंघन केल्याचे गुन्हे नोंदवण्याचे आदेश दिले. भाजपचे पुरुषोत्तम म्हात्रे आणि शिवसेनेच्या अनिता पाटील यांनी, आपल्या बांधकामांकरता मॅनग्रोव्ह जंगलं तोडून टाकली, असा आरोप करणाऱ्या एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे वक्तव्य करत, या दोघांवर एका आठवड्यात गुन्हे नोंदवावेत, असं पोलिसांना सांगितलं.

****

औरंगाबाद इथल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं औरंगाबाद महापालिकेच्या एका अभियंत्याच्या घरावर अपसंपदा प्रकरणी छापा घातला. बाबुलाल गायकवाड असं या अभियंत्याचं नाव असून, उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता आढळल्यानं, गायकवाड आणि त्याची पत्नी मंदाबाई गायकवाड या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड याचं घर, शेती, भूखंड इत्यादी मालमत्तांची तपासणी सुरू असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

****

महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळांतर्गत येणाऱ्या जालना जिल्ह्यात घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक वीज ग्राहकांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ती वसूल करण्यासाठी महावितरणनं धडक मोहीम सुरू केली आहे. यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून वीज बिलं न भरलेल्या दोन हजार दोनशे पंचेचाळीस ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे जालना जिल्ह्यातल्या पंचेचाळीस गावांचा वीजपुरवठा संपूर्णपणे खंडित झाला आहे. या थकबाकीदार ग्राहकांनी लवकरात लवकर वीज बिलं भरून महावितरणला सहकार्य करावं, असं आवाहन परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केलं आहे.

****

मराठी भाषा विभागातर्फे देण्यात येत असलेल्या पुरस्कारांची घोषणा झाली असून, यावर्षीचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ प्रसिद्ध साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे. ‘श्री.पु.भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन’ पुरस्कार पुण्याच्या वरदा प्रकाशनाला, आणि ‘डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार’ अविनाश बिनीवाले यांना तर ‘कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार’ मराठी विज्ञान परिषद या संस्थेला जाहीर करण्यात आला आहे. येत्या २७ तारखेला या पुरस्कारांचं वितरण होणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

****

मुखेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष बाबुराव देबडवार यांनी आज आपल्या सहकाऱ्यांसह नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं. देबडवार हे थेट जनतेतून नगराध्यक्षपदी निवडले गेले असून, शहराच्या कामांमध्ये सभागृहातल्या नगरसेवकांचं सहकार्य मिळत नसल्याचं सांगत त्यांनी लाक्षणिक उपोषणाद्वारे निषेध व्यक्त केला.

****

परभणी जिल्हा क्रीडा संकुलात गेल्या सतरा आणि अठरा तारखेला पार पडलेल्या १३व्या राज्यस्तरीय म्युझिकल चेअर स्केटींग स्पर्धेत जालना जिल्ह्यातल्या खेळांडूनी नऊ सुवर्ण, तीन रौप्य आणि सहा कांस्य पदकं मिळवली. या स्पर्धेमध्ये राज्यभरातल्या दोनशे वीस खेळाडूंनी भाग घेतला होता.

****

No comments: