Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 20 February 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० फेब्रुवारी २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स जागतिक गुंतवणुकदार
परिषदेत विविध ४३ सामंजस्य करारावर सह्या; राज्यात १२ लाख कोटी रूपयांची गुंतवणूक होणार
Ø तीन हजार ६९५ कोटी रूपयांच्या बँक कर्ज फसवणूक प्रकरणी
रोटोमॅक पेन कंपनीचा मालक विक्रम कोठारी आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल
Ø राज्यात सर्वत्र
शिवजयंती उत्साहात साजरी
आणि
Ø रेल्वेमध्ये
‘क’ श्रेणीतल्या कर्मचारी पद भरतीसाठी उमेदवारांच्या वयोमर्यादेत वाढ
*****
मॅग्नेटिक
महाराष्ट्र कन्व्हर्जन्स २०१८ या जागतिक गुंतवणुकदारांच्या
परिषदेत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध ४३ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात
आल्या. या करारांमुळे राज्यात १२ लाख
कोटी रूपयांची गुंतवणूक होणार आहे. या
सामंजस्य करारात देश विदेशातल्या नामांकित
उद्योग समूहांचा समावेश आहे. राज्याचा सध्या असलेला ९ पूर्णांक ४ दशांश टक्के विकास दर १५
पूर्णांक ४ दशांश टक्क्यांपर्यंत नेल्यास, ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं स्वप्न साकार
करता येईल, त्यासाठी सेवा क्षेत्रांवर भर द्यावा लागेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी यावेळी बोलताना सांगितलं. उद्योगपती रतन टाटा, गौतम सिंघानिया, यांच्या उद्योग
क्षेत्रातल्या योगदानाबद्दल त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी पुरस्कार देऊन
गौरवण्यात आलं. औरंगाबादच्या एक्सपर्ट ग्लोबल सोल्युशन आणि मेटलमॅन या दोन कंपन्यांना
मराठवाडा विभागात सर्वात वेगानं प्रगती करणाऱ्या कंपन्या म्हणून मुखमंत्र्यांनी गौरवलं.
****
केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं पंजाब नॅशनल बँक
घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या मुंबई इथल्या ब्रॅडी हाऊस शाखेला टाळं आहे. हिरे व्यापारी
नीरव मोदी याच्या कंपनीनं याच शाखेतून ११ हजार ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे. पंजाब नॅशनल बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग
- सीबीआयनं पुणे, ठाणे, मुंबईसह देशातल्या अन्य ठिकाणी छापे घातले. नीरव मोदीच्या फायर स्टार डायमंड कंपनीच्या मुख्य
आर्थिक अधिकारी विपुल अंबानी यांचीही याप्रकरणी चौकशी सुरू आहे.
****
केंद्रीय तपास संस्था – सीबीआयनं तीन हजार ६९५ कोटी
रूपयांच्या बँक कर्ज फसवणूक प्रकरणी रोटोमॅक पेन कंपनीचा मालक विक्रम कोठारी आणि त्याच्या
कुटुंबियांविरोधात काल गुन्हा दाखल केला. कोठारीसह कंपनीच्या तीन संचालकांविरूद्ध बँक
ऑफ बडोदानं दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. कंपनीचे संचालक आणि काही
बँक कर्मचाऱ्यांनी कट रचून ६१६ कोटीहून अधिक रकमेस बँकांना फसवल्याचं या तक्रारीत म्हटलं
आहे. सात बँकांना या संचालकांनी फसवलं असून ही रक्कम तीन हजार ६९५ कोटी रूपये असल्याचं
वृत्त संस्थेनं म्हटलं आहे. आरोपींच्या कानपूरमधल्या कार्यालय आणि निवासस्थानांवर धाडी
घालण्यात आल्या असून त्यांना टाळं ठोकण्यात आलं आहे.
****
बँकांमधले आर्थिक घोटाळे उघडकीस आणता यावेत याकरता,
यंत्रणांची कार्यक्षमता तपासावी, असं केंद्र सरकारनं भारतीय रिझर्व बँकेला लेखी कळवलं
असल्याचं, अर्थ मंत्रालयातल्या सूत्रांनी सांगितलं. पंजाब नॅशनल बँकेच्या आर्थिक घोटाळ्याच्या
पार्श्वभूमीवर सरकारनं हे आदेश दिले आहेत.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती काल सर्वत्र उत्साहात
साजरी झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचं
जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत शिवजन्म सोहळा साजरा झाला. राज्यपाल
सी विद्यासागर राव यांनी मुंबईत शिवाजी पार्क इथं, विधानभवन परिसरात विधान परिषदेचे
सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी तर मंत्रालयात कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर
आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण
करून अभिवादन केलं.
नवी
दिल्ली इथं संसद परिसरातल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला
पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. महाराष्ट्र सदनात शिवजन्म सोहळा साजरा झाला, त्यानंतर परिसरातून शोभायात्रा
काढण्यात आली. मल्लखांब, दोर मल्लखांबासह मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं यावेळी दाखवण्यात
आली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर असलेल्या
सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंती उत्साहात साजरी झाली. औरंगाबाद इथं, क्रांती चौकातल्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यांवर हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात
आली. महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामाला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे,
महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत काल प्रारंभ करण्यात आला. विविध संघटना तसंच
शैक्षणिक संस्थांच्या वतीनं काल पोवाडे गायन कथाकथनासह वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन
करण्यात आलं.
परभणी इथं शिवजयंतीच्या निमित्तानं वारकरी मंडळ आणि
शिवजयंती महोत्सवाच्यावतीनं टाळ- मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. जिल्ह्यातल्या
पाथरी, मानवत, जिंतूर आदी तालुक्यांमध्येही या निमित्तानं विविध उपक्रम राबवण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातही विविध उपक्रम आणि मिरवणुकांचं आयोजन करुन शिवजयंती साजरी करण्यात
आली. उस्मानाबाद इथं शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीचं उद्घाटन, आमदार
सुजितसिंग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. उस्मानाबाद इथं रक्तदान शिबीरासह
अनेक उपक्रम शिवजयंतीच्या निमित्तानं राबवण्यात आले. हिंगोली आणि बीड जिल्ह्यातही उत्साहपूर्ण
वातावरणात, समाजोपयोगी उपक्रम आयोजित करुन काल शिवजयंती साजरी झाली.
लातूर इथं यानिमित्त दुचाकी फेरी काढण्यात आली. या
फेरीत महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. जालना शहरातून काढण्यात आलेल्या दुचाकी
फेरीत युवकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीनं
सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
राज्यात सातारा, कोल्हापूर, रायगड, पालघर, धुळेसह
राज्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात
आली.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
*****
रेल्वेमधल्या ‘क’ श्रेणीतल्या पहिल्या
आणि दुसऱ्या स्तरावरच्या पद भरतीसाठी रेल्वे मंत्रालयानं उमेदवारांच्या वयाची मर्यादा
वाढवली आहे. सहाय्यक लोको पायलट आणि तंत्रज्ञ या पदासाठी सामान्य वर्गवारीतल्या उमेदवारांसाठी
ही वयोमर्यादा ३० वर्ष, मागासवर्गीयासाठी ३३ वर्ष तर अनुसूचित जाती जमातीसाठी ३५ वर्ष
असेल. ट्रॅक मेंन्टेनर, पाँईट मॅन. गेटमॅन, पोर्टर यासारख्या पदांसाठी सामान्य वर्गवारीतल्या
उमेदवारांसाठीची वयोमर्यादा ३३ वर्ष, इतर मागासवर्गीयांसाठी ३६ वर्ष तर अनुसूचित जाती
जमातीसाठी ३८ वर्ष असेल. रेल्वे मंत्रालयानं अलिकडेच ८९ हजार ४०९ पदं भरण्याची घोषणा
केली आहे.
****
परभणी महापालिकेच्यावतीनं स्वच्छ भारत सर्वेक्षण
मोहीम काल राबवण्यात आली. पालिका उपायुक्त
डॉक्टर विद्या गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांनी या मोहिमेत सहभाग घेतला. शहरातले
भाजी विक्रेते तसंच व्यापाऱ्यांनी या मोहिमेस उत्स्फूर्त सहकार्य केलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथं बळीराजा राज्यस्तरीय
कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते काल करण्यात आलं. शेतकऱ्यावर
शासनानं अन्याय केला असून केंद्र आणि राज्यशासनाच्या धोरणावर त्यांनी यावेळी टीका केली.
****
कोल्हापूर जिल्ह्यात पुणे - बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर
काल पहाटे एका ट्रकला झालेल्या अपघातात पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर २५ जण
जखमी झाले. सांगलीच्या वालचंद महाविद्यालयातले हे विद्यार्थी, शिवजयंती निमित्त पन्हाळगडाहून
सांगलीला शिवज्योत घेऊन जात होते. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
शिर्डीच्या
साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष आणि अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार
जयंत ससाणे यांचं काल पहाटे श्रीरामपूर इथं निधन झालं, ते
६० वर्षांचे होते. साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात
त्यांनी अनेक लोकाभिमुख कामं केली. १५ वर्ष श्रीरामपुरचं नगराध्यक्षपद
भुषवलेले सासणे यांनी, विधानसभेत दोन वेळा श्रीरामपूरचं प्रतिनिधीत्व केलं होतं. श्रीरामपूर नगरपालिकेला त्यांनी जिल्ह्यात सर्व योजना राबवणारी
आणि सक्षम नगरपालिका अशी ओळख मिळवून दिली होती. त्यांच्या पार्थिव देहावर काल श्रीरामपूर
इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
*****
***
No comments:
Post a Comment