Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date - 20 February
2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० फेब्रुवारी २०१८
दुपारी १.०० वा.
****
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे
उपकुलसचिव ईश्वर मंझा यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. औरंगाबाद पोलिस आयुक्त
कार्यालयांतर्गत आर्थिक गुन्हे शाखेनं आज सकाळी ही कारवाई केली. मंझा यांनी नोकरी लावून
देण्याचं आमीष दाखवून तक्रारदाराकडून लाच घेतली होती, मंझा यांनी या रकमेचा धनादेश
संबंधिताला परत केला, मात्र तो वटला नाही, त्यानंतर हे प्रकरण समोर आलं. या संदर्भात
आर्थिक गुन्हे शाखेकडे आणखी काही तक्रारी आल्या असून, अशी आणखी काही प्रकरणं असण्याची
शक्यता सहायक पोलिस निरीक्षक अमोल सातोदकर यांनी व्यक्त केली.
****
औरंगाबाद इथं आज पहाटेच्या सुमारास चारचाकी
गाडी झाडाला धडकून झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. सुमारे २५
ते २६ वर्ष वयाचे हे तिघे डॉक्टर जालन्याहून औरंगाबादला परत येत असताना हा अपघात झाल्याचं,
पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आलं. यापैकी दोघे औरंगाबाद इथलेच तर मयत एक डॉक्टर मूळ
हरियाणा इथले रहिवासी असल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जनता दलाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी
आमदार कमल देसाई यांचं आज मुंबईत वार्धक्यानं निधन झालं, त्या ९७ वर्षांच्या होत्या.
महागाई विरोधात महिलांनी सुरु केलेल्या आंदोलनाचं त्यांनी नेतृत्व केलं होतं. त्यांच्यावर
आज दुपारी ओशिवरा इथल्या विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार केले जातील.
****
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याची विशेष तपास पथकामार्फत
चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय येत्या शुक्रवारी सुनावणी
घेणार आहे. याप्रकरणी पंजाब नॅशलन बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी
या याचिकेत करण्यात आली आहे. हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोकसी हे दोघे या प्रकरणातले
मुख्य आरोपी असून, पंजाब नॅशनल बँकेच्या
एका शाखेकडून परदेशात कर्जपुरवठा करण्यासाठी बनावट करारपत्र मिळवून सुमारे ११
हजार पाचशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी देशभरात अनेक ठिकाणी धाडसत्र सुरू असून, सक्तवसुली
संचालनालयामार्फत कारवाई सुरू असल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सकल
राष्ट्रीय उत्पादनात जागतिक व्यापाराचा वाटा ४० टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी सरकार
लवकरच एक सर्वसमावेशक धोरण आणणार आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री
सुरेश प्रभू यांनी दिली. मुंबईत मॅग्नेटिक महाराष्ट्र जागतिक गुंतवणूकदार परिषदेत ते
काल बोलत होते. सध्या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात निर्यातीचा वाटा केवळ १८ टक्के
असून, भारत दोन पूर्णांक सहा दशांश ट्रिलियन डॉलर्स किमतीची निर्यात करतो, अशी
माहिती त्यांनी दिली. ही निर्यात वाढवण्यासाठी नवे व्यापार आणि बाजारपेठेत प्रवेश करण्याचा
प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
माहिती
आणि दूरसंचार तंत्रज्ञानामध्ये देशाच्या आरोग्य सेवांमध्ये सुधारणा घडवून
आणण्याची क्षमता असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे.
ते काल ऑस्ट्रेलियामध्ये कॅनबेरा इथं ग्लोबल डिजिटल हेल्थ पार्टनरशिप समिटमध्ये बोलत
होते. खासगी क्षेत्रात काम करणारे आरोग्यसेवा पुरवठादार, शिक्षण
संस्था उद्योग आणि नियामक संस्थांनी भागीदारी करून डिजिटल आरोग्य सेवा प्रणाली निर्माण
करायला हवी, असं ते म्हणाले. आरोग्य सेवांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी
भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नांबद्दल नड्डा यांनी यावेळी माहिती दिली.
****
सात
दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचं आज मुंबईत आगमन
झालं. मुंबईतल्या ताजमहाल हॉटेलमध्ये ट्रुडॉ कॅनडा- भारत उद्योग परिषदेत सहभागी होत आहेत. उद्योगजगत आणि चित्रपट
सृष्टीतल्या काही नामवंत व्यक्तींशी ते आज भेट घेणार आहेत.
****
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गासाठी वाशिम जिल्ह्यातल्या
६३ टक्के जमिनीचं भूसंपादन पूर्ण झालं आहे. यासाठी संबंधित शेतकर्यांना २६० कोटी रुपये
इतका मोबदला देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे. हा महामार्ग वाशिम जिल्ह्यातल्या
५४ गावातून जात आहे.
****
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी आजपासून
अंबाजोगाई इथं धरणे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. अंबाजोगाई इथं उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर
पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून
केल्या जात असलेल्या या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी, येत्या २६ तारखेपासून
सुरू होत असलेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन
पुकारण्यात आलं आहे.
****
पुण्यात आजपासून आंतरविभागीय बिलियर्ड्स आणि स्नुकर
अजिंक्यपद स्पर्धा सुरु होत आहे. जागतिक विजेता पंकज अडवाणी, अर्जुन पुरस्कार विजेता
देवेंद्र जोशी, सौरव कोठारी यांच्यासह युवा खेळाडू एस श्रीकृष्णा, ध्वज हरिया, लक्ष्मण रावत हे खेळाडू या स्पर्धेत
सहभागी होत आहेत. २४ फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment