आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२७ फेब्रुवारी २०१८ सकाळी
११.००
****
आज २७ फेब्रुवारी, कविवर्य कुसुमाग्रज उर्फ ज्येष्ठ
साहित्यिक वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिन. हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा
करण्यात येतो. या दिनानिमित्त आज सकाळी विधीमंडळ परिसरात ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो
मराठी’ या मराठी अभिमान गीताचं सामुहिक गायन
करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे,
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तसंच राधाकृष्ण
विखे पाटील यांच्यासह सर्व आमदार उपस्थित होते. तत्पूर्वी या सर्व नेत्यांनी विधीमंडळातल्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
यानिमित्त आज औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापिठात विविध क्षेत्रातल्या नामवंतांचा गौरव केला जाणार आहे. शहरातल्या
शैक्षणिक संस्थांमधूनही विद्यार्थी तसंच विद्यार्थिनी पारंपरिक वेशभुषेत भारुडं, पोवाड्यांसह
पारंपरिक मराठी गाणी सादर करत आहेत.
****
जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ
पाकिस्तानी सैन्यानं आज सकाळी मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. यावेळी लष्करी चौक्या
आणि नागरी भागांना लक्ष्य केल्याचं संरक्षण सूत्रांनी सांगितलं. हा गोळीबार अद्यापही
सुरुच असून, भारतीय सैनिकही या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर देत आहेत.
दरम्यान, पुंछ जिल्ह्यात सुरक्षा
दलांनी दहशतवाद्यांची दोन आश्रयस्थानांवर छापे घालून मोठ्या प्रमाणात
शस्त्रास्त्रं,
तसंच दारुगोळा जप्त केला आहे. जम्मू
भागात लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायात हा शस्त्रसाठा सापडला. पुंछ
जिल्ह्यातल्या सुरणकोट आणि मेंढार भागातल्या हारीबुढा आणि भाटीधार या ठिकाणीही मोठ्या
प्रमाणात शस्त्रास्त्रं आणि दारुगोळा आढळून आला.
****
नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार
समितीत काल कांद्याच्या भावात चारशे रूपयांची घसरण झाल्याचं वृत्त आहे. राज्यासह देशात
इतरत्र कांद्याचं विक्रमी उत्पादन झाल्यानं, दरात घसरण सुरू आहे. गेल्या पाच फेब्रुवारीच्या
तुलनेत तेराशे रुपयांनी घसरण होत आता कांद्याचा दर आता क्विंटलमागे पंधराशे रुपयांच्या
आत आल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
*****
***
No comments:
Post a Comment