Saturday, 24 February 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 24.02.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 24 February 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ फेब्रुवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दमनमध्ये एक हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी दमन आणि दीव दरम्यानच्या हेलिकॉप्टरसेवेचा प्रारंभ देखील केला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ‘उडान’ योजनेअंतर्गत दीवला ओडिशा - अहमदाबाद विमानसेवा जोडणीचा प्रारंभ केला. तसंच दमन आणि दीवमध्ये अनेक प्रकल्पाचे भूमीपुजन केले. यावेळी त्यांनी दिव्यांगाना स्कूटर तर महिलांना इ-रिक्षांचं वाटप केलं. त्यानंतर त्यांनी दमनमध्ये एका सभेला संबोधित केलं.

****

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल सात वर्ष सुरु असलेला ११ हजार ४०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड होऊ न शकल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी बँक नियंत्रकांची खरडपट्टी काढली आहे. नवी दिल्लीत आयोजित इकॉनॉमिक टाईम्स जागतिक व्यापार परिषदेत आज ते बोलत होते. अशा घोटाळ्यांमध्ये फसवणूक करणाऱ्यांना बँकेच्या कर्मचाऱ्यांनी साथ देणं ही चिंतेची बाब असल्याचं ते म्हणाले. व्यापार जगतानं व्यवसाय करताना तो नैतिकतेला धरुन असावा याची काळजी घेणं गरजेचं असल्याचं, जेटली म्हणाले. अशा प्रकारच्या घोटाळ्यांमुळे आर्थिक सुधारणांना खीळ बसत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी बँक अधिकाऱ्यांनाही त्यांचं काम चोख न बजावल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

****

अंमलबजावणी संचलनालयानं पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी प्रमुख आरोपी नीरव मोदीच्या ५२३ कोटी रुपये किंमतीच्या २१ अचल मालमत्तांवर आज टाच आणली आहे. या मालमत्तांमध्ये नीरव मोदीच्या सदनिका आणि फार्म हाऊसचा समावेश आहे. तसंच यामध्ये त्याचं अलीबागचं फार्म हाऊस, सौर ऊर्जा प्रकल्प, अहमदनगरमधली १३५ एकर जमीन, पुणे आणि मुंबईतल्या कार्यालयांबरोबरच निवासी मालमत्तांचा समावेश आहे.

****

ज्येष्ठ पत्रकार आणि नॅशनल हेराल्डचे मुख्य संपादक नीलभ मिश्रा यांचं आज चेन्नई इथं रुग्णालयात निधन झालं. ते ५७ वर्षांचे होते. यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शरीराचे विविध अवयव निकामी झाल्यानं त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचं निधन झालं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा एक्केचाळीसावा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

महाराष्ट्र वैभवशाली करण्यासाठी सहकार क्षेत्र सक्षम करणं आवश्यक असल्याचं सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी म्हटलं आहे. वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या लिलाव शेडच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी काल ते बोलत होते.
शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा म्हणून शेतमालाची खुली लिलावपद्धती शासनानं सुरू केली असून, शेतकऱ्यांना द्यावी लागणारी अडत आता अडत्यांनीच देण्यासाठी नवीन शासन निर्णय जारी केला असल्याचं त्यांनी सांगितलं. बाजार समितीच्या निवडणुकीत आता शेतकऱ्यांना थेट मतदान करण्याचा अधिकार दिला असून भविष्यात या शेतकऱ्यांमधूनच नेतृत्व निर्माण होऊन बाजार समितीचं अध्यक्षपद त्यांना मिळेल असं ते म्हणाले. मात्र, यासाठी शेतकऱ्यांनी ५ वर्षात किमान ३ वेळा शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीत विकावा, असं आवाहनही सहकारमंत्र्यांनी यावेळी केलं.

****

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहनावर आज दगडफेक केली, या कार्यकर्त्यांनी खोत यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवत त्यावर गाजर, तूर, मका फेकून रोष व्यक्त केला. सोलापूर मधल्या कुर्डुवाडीजवळच्या रिधोर नजीक ही घटना घडली. कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ, शेतकऱ्यांसमोरच्या विविध समस्यांचा निषेध म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं असल्याची शक्यता आहे. दरम्यान, दगडफेक करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

****

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी देण्यात येणारे यशवंतराव चव्हाण वाङमय आणि नटवर्य लोटू पाटील नाट्यपुरस्कार पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. यशवंतराव चव्हाण वाङमय पुरस्कार प्रसिद्ध विचारवंत, लेखक आणि पत्रकार प्राध्यापक सुरेश द्वादशीवार यांना देण्यात येणार आहे. नटवर्य लोटू पाटील नाट्यपुरस्कार पुरस्कार यंदा अभिनेते आणि दिग्दर्शक दिलीप घारे आणि रंगकर्मी प्राध्यापक यशवंत देशमुख यांना विभागून देण्यात येणार आहे. ११ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्कारांचं स्वरुप असून, येत्या १२ मार्चला प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

****

No comments: